For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्वल रेवण्णांच्या प्रकरणात भाजपचे मौन का?

11:09 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्वल रेवण्णांच्या प्रकरणात भाजपचे मौन का
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सवाल : कायद्याच्या चौकटीत प्रकरणाची चौकशी करणार

Advertisement

बेळगाव : खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने संपूर्ण देशाला मान खाली घालावी लागली आहे. या प्रकरणाबाबत भाजप नेत्यांचे मौन का? हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्या प्रकरणात पुढे झालेल्या भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आता अन्याय झालेल्या महिलांबाबत आवाज उठवावा. आता का मौन पाळले आहे?, असा सवाल महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. आपल्या गृह कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांवर कोठेही अन्याय झाल्यास त्याचे आपण खंडन करतो. त्यांच्या बाजूनेच उभे राहतो. आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आग्रही असतो. त्यामध्ये राजकारण करायला जात नाही. मात्र, हुबळी येथील प्रकरणामध्ये अतिउत्साहीपणा  दाखविलेल्या भाजप नेत्यांनी आता का मौन पाळले आहे? या ठिकाणीही शेकडो महिलांवर अन्याय झाला आहे. आता खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे. जगदीश शेट्टर यांनीही पुढाकार घेऊन याबाबत आवाज उठवावा, असा आग्रह त्यांनी केला.

प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबतच्या प्रकरणात कोणीच बोलायला तयार नाहीत. नारी शक्ती, नारी सन्मान, बेटी बचाव, बेटी पढाव अशा घोषणा देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी मौन पाळले आहे. वारंवार कर्नाटक सरकारवर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांची आता भूमिका काय असणार? अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळणार का? असे प्रश्न महिला आणि बाल कल्याण मंत्री या नात्याने आपण  उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे, नेहा हिरेमठ हिच्या प्रकरणामध्ये जगदीश शेट्टर यांनी ज्याप्रमाणे बोलले होते त्या प्रमाणे त्यांनी आता बोलावे, 16 वर्षांपासून ते 60 वर्षांच्या महिलांवर अन्याय झाला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणामध्ये अन्याय झालेल्या महिलांच्या बाजूने मैत्री नेत्यांनी थांबावे, असे त्यांनी सांगितले. प्रज्वल रेवण्णा यांच्याबद्दलचे प्रकरण माहीत असतानाही रेवण्णा यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे, हे कितपत योग्य आहे? याला भाजप नेत्यांनी उत्तर द्यावे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. नेहा हिरेमठ हिच्या हत्या प्रकरणामध्ये राज्यभरात भाजप नेत्यांनी आंदोलन केले आहे. त्या नेत्यांनी आता मौन पाळले आहे. अनेक प्रकरणांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग धावून येत होते. असे असले तरी राज्य सरकार अन्याय झालेल्या महिलांच्या बाजूने थांबणार आहे. त्यांचे संरक्षण करणार आहे. या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून कायद्याच्या चौकटीत चौकशी केली जाईल. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रकरणातील व्हिडीओ कोणीही फॉर्वर्ड करू नये, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.