For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश ना घर का ना घाट का!

06:11 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश ना घर का ना घाट का
Advertisement

भारतातच क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय हा आपला गोड गैरसमज आहे. आपल्यापेक्षा दुपटीने बांगलादेशात क्रिकेट हा खेळ कधी खांद्यावर तर कधी डोक्यावर घेऊन नाचवतात. भारताप्रमाणे बांगलादेशात क्रिकेट या खेळाकडे धर्म म्हणूनच बघितले जाते. आजही बांगलादेश म्हटलं की 2007 चा तो विश्वचषक आठवतो. या देशाने मला पुढील चार वर्षे वैफल्यग्रस्त केलं होतं. त्या चार वर्षात येणाऱ्या बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश आपल्या गटात तर नाही ना, ही आदरयुक्त भीती माझ्या मनात असायची. अशा या आदरयुक्त भीतीचा काल परवा त्यांनी खऱ्या अर्थाने पालापाचोळा केला. एवढी प्रचंड क्रेझ असणाऱ्या क्रिकेट खेळाची टी-20 विश्वचषकाच्या निमित्ताने बांगलादेशची कीव करावाशी वाटते. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया जसा वेगाने कोसळतो, तसा बांगलादेशला आयसीसीने काल-परवा कोसळवलं. बांगलादेश क्रिकेटला अक्कल कधी येणार हाच मोठा प्रश्न पडला आहे. बांगलादेशने कारण नसताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बीसीसीआय आणि आयसीसीला पोकळ धमकी देण्याचा प्रयत्न केला. काही जणांचा चुकून कुऱ्हाडीवर पाय पडतो. इथे कुऱ्हाड प्रत्यक्ष दिसत असतानासुद्धा पाय ठेवून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेतलंय.

Advertisement

1971 मध्ये भारताने मदत करत देश स्वतंत्र करून दिला. याउलट ज्या देशाने बांगलादेशवर अत्याचार केले त्याच पाकिस्तान देशाशी त्यांनी हात मिळवणी केली. अर्थात या कृतीला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असेच म्हणावे लागेल. 2026 च्या आयपीएलच्या मोसमात अचानक एका बांगलादेशी खेळाडूला प्रवेश नाकारल्यानंतर उद्भवलेला हा चित्रपट. बांगलादेशने पुढे केलेले कारण हे हास्यास्पदच. म्हणे सद्य स्थितीत भारतात क्रिकेट खेळणं सुरक्षित नाही. अर्थात असं म्हणणं म्हणजे सुनील गावसकर सरांना क्रिकेटमधलं काही कळत नाही आणि शरद पवार साहेबांना राजकारणातले काही कळत नाही, असं म्हटल्यासारखं झालं. तीन मिलियन अधिकृत म्हणा किंवा अनधिकृत बांगलादेशी लोक भारतात राहतात. त्यावेळी तुम्हाला त्यांचा कळवळा आला नाही. बरं यांना माहेरी पाठवण्याचा प्रयत्न केला तरी ही मंडळी म्हणतात आम्ही सासरी सुरक्षित आहोत. काय हा कांगावा? आयसीसीने ही गोष्ट फार संयमाने हाताळली. एका नामांकित सुरक्षा एजन्सीला सुरक्षेचा आढावा घेण्यास सांगितलं. बांगलादेशला फूस होती ती पाकिस्तानची. परंतु 24 तासात पाकिस्तानी संघानं घुमजाव केलं. आणि बांगलादेश संघ एकाकी पडला. अर्थात या एकाकीपणाचा पुढे ‘विरहात’ रूपांतर झालं नाही म्हणजे मिळवलं. या अगोदर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाने यजमान संघाच्या भूमीत क्रिकेट खेळण्यास नकार दिला असं घडलं नाही का? असं मुळीच नाही. 1996 मध्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत वारंवार होणाऱ्या बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. 2003 मध्ये झिंबाब्वे इंग्लंडमध्ये गेला नव्हता. कारण होतं तत्कालीन स्थितीत दोन्ही देशांचे ताणलेले संबंध. न्यूझीलंडचा संघ केनियात गेला नव्हता कारण मुंबासामध्ये बॉम्बस्फोट झाले होते. परंतु इथे मात्र असं कुठलंच कारण नाहीये. ना बॉम्बस्फोट ना आत्मघातकी हल्ले.

कुणी काहीही म्हणा, भारतीय क्रिकेटची प्रगती आणि आर्थिक परिस्थिती पाहता सद्यस्थितीत भारतीय देश हा अव्वल मानांकित आहे. जगात 60 टक्के भारतीय वंशज प्रायोजक आहेत. त्यामुळे हे बऱ्याच देशांच्या डोळ्यातही खुपते. बांगलादेशच्या या असहकारामुळे भविष्यात ऐन बाजारात भीक मागण्यास प्रवृत्त न करावं म्हणजे मिळवलं. त्यांचा या वर्षातील टी-20 विश्वचषकावरील बहिष्कार हा बांगलादेशवासियांसाठी हॉरर चित्रपटातील बॅकग्राऊंड संगीतासारखा नसावा.

Advertisement

बांगलादेश, पाकिस्तान हे आर्थिकदृष्ट्या मागासलेले देश. असे देश जे आयसीसीच्या रूपातून येणाऱ्या पैशातून थोड्याफार प्रमाणात का होईना, आपल्या देशाच्या ईएमआयची तरतूद करत असतात. परंतु सध्या तरी ही परिस्थिती दुरापास्त झाली आहे. असो. संतांच्या तोंडी एक वाक्य मात्र नेहमी असतं ते म्हणजे नाठाळांच्या माथी हाणावी काठी. भविष्यात हीच काठी बांगलादेशच्या पाठीत बसली तर आश्चर्य मानून घेऊ नका.

थोडक्यात काय ‘हम साथ साथ है’ म्हणणाऱ्या बांगलादेशची काल-परवा ‘हम आपके है कौन’ म्हणण्याची वेळ आलीये एवढं मात्र खरं,! बांगलादेश संघ हा परदेशात क्रिकेटरुपी खेळाच्या निमित्ताने सासरी छान नांदत होता. त्यांच्या या अशा अति आत्मघातकी निर्णयामुळे कायमचं माहेरी रहावं लागेल, एवढं मात्र निश्चित.

Advertisement
Tags :

.