For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगार सुरक्षेला प्राधान्य का आणि कसे?

06:33 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
कामगार सुरक्षेला प्राधान्य का आणि कसे
Advertisement

कामगार सुरक्षेला प्राधान्य का आणि कसे?

Advertisement

सुमारे एक महिन्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील एका प्रक्रिया उद्योगात झालेला मोठा स्फोट व त्यानंतरच्या भीषण आगीत सात कामगारांच्या झालेल्या मृत्यूमुळे रायगड वा राज्य पातळीवरच नव्हे तर सारेच उद्योग क्षेत्र पुरतेपणी हादरुन गेले. या आणि अशा प्रकारच्या दुर्देवी-अपघाती व जिवघेण्या घटनांनंतर औद्योगिक क्षेत्रातील कामकाज-प्रक्रिया व कर्मचारी-कामगार सुरक्षेचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. मात्र त्याकडे कायमस्वरुपी गांभीर्याने पाहिले जाते का? प्रश्न मात्र त्याच्या प्रश्नचिन्हासह कायमच उरतो.

वरील घटनेपूर्वी सुमारे पाच महिने आधी अंबरनाथ औद्योगिक  परिसरात  सुद्धा मोठा व दुर्दैवी औद्योगिक अपघात घडला होता. त्याठिकाणी सुद्धा लागलेल्या भीषण आगीत होरपळल्याने सहा कामगार जखमी झाले. तर एका कंत्राटी कामगाराचा याच दुर्घटनेत मृत्यू झाला ही तशी ताजी वस्तुस्थिती आहे.

Advertisement

औद्योगिक अपघातांच्या संदर्भात स्थळ, काळ कुठलेही असो, अपघात, अपघातांची भीषणता व त्यांची धग मात्र कायम असते, हेच खरे. औद्योगिक  अपघातांच्या याच भीषण मालिकेत पुद्दुचेरी येथील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीतील मोठ्या व भीषण अपघाताचा उल्लेख करणे नव्या संदर्भात अपरिहार्य ठरते. त्या ठिकाणी आगीत होरपळून 14 कामगार मृत्युमुखी पडले. या आकडेवारीवरूनच अपघाताच्या दाहकतेची कल्पना सहजपणे येते.

संख्येच्या आधारे सांगायचे झाल्यास यावर्षीच्या दहा महिन्यांमध्ये  कारखान्यांमध्ये मोठ्या व गंभीर स्वरुपातील आगीच्या सुमारे 12 घटना घडल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही संस्था अर्थातच नोंद झालेल्या व मोठ्या आणि भीषण स्वरुपातील आगीच्या घटनांची आहे. यातून औद्योगिक क्षेत्रातील आगीच्या मोठ्या अपघातांची संख्या व त्यांची भीषणता स्पष्ट होते.

वरील प्रकारच्या गंभीर व जीवघेण्या अपघातांचा तपशील आणि त्यांची भीषणता याचे तपशीलवार विश्लेषण-विवेचन करणे अर्थातच आवश्यक ठरते. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या व देशपातळीवर सुमारे 2000 वर कंपन्यांना औद्योगिक व कामगार सुरक्षा या महत्त्वाच्या विषयात सल्ला-सेवा देणाऱ्या अपरिजीता समुहाचे व्यवस्थापकीय संचालक नागराज कृष्णन यांनी यावर गांभिर्याने विचार केला आहे. त्यांचा अभ्यास व अनुभव या आधारावर नमूद केल्यानुसार आज कामगार-कर्मचाऱ्यांपासून छोट्या-मोठ्या कारखानदारांपर्यंत औद्योगिक व कामगार सुरक्षेच्या संदर्भात प्रमुख व अत्यंत महत्त्वाच्या अशा औद्योगिक दृष्ट्या पर्यावरण रक्षण, आरोग्य व्यवस्थापन व मुख्य म्हणजे कर्मचारी-कंपनी यांची सुरक्षा यासंदर्भात पुरेशा व महत्त्वाच्या अशा कायदेशीर तरतुदी असतानादेखील त्यांचा आवश्यक असूनही अपेक्षित व पुरेशा प्रमाणात अवलंब होत नाही. परिणामी कुठल्या ना कुठल्या कारणाने औद्योगिक अपघातांचा सामना सर्वांना करावा लागतोच. अशाप्रसंगी अनेकांना दुर्देवाने आपले प्राणही गमवावे लागतात.

भीषण स्वरुपातील अपघातांच्या संदर्भात नागराज यांनी अनुभवसिद्ध अशी विशेष टिप्पणी केली असून, ती नेहमीच चिंतनीय ठरली आहे. त्यांनी विशेषत: औषध उत्पादक कंपन्यांमधील मोठ्या व गंभीर स्वरुपातील अपघातांचा अभ्यास करून नमूद केलेली बाब म्हणजे औषध निर्माण कंपन्या त्यांच्या उत्पादन पद्धत व प्रक्रियेचे पालन करण्यावर जेवढा आग्रही जोर देतात त्या तुलनेत या कंपन्या उत्पादनक्षेत्राशी निगडित व तेवढ्याच महत्त्वाच्या व अत्यावश्यक अशा उत्पादन-प्रक्रिया व मानवीय सुरक्षा या मुद्यांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. औषध निर्माण क्षेत्रात असणाऱ्या विविध प्रकारच्या गंभीर प्रक्रियांमुळे मशिन-माणूस या उभयतांचे मोठे नुकसान औषध उद्योगातील अपघातांमुळे होते.

तसे पाहता ‘श्रमिक क्षेत्र’ हे आपल्या घटनेनुसार केंद्र व राज्य अशा उभय सरकारांकडे असले तरी यासंदर्भातील कामगार कायद्यापासून, पर्यावरण संरक्षण, औद्योगिक सुरक्षा, आरोग्य व कामगार कल्याण या विषयाची अंमलबजावणी करण्याचे काम राज्य सरकारकडे असते. यासाठी प्रत्येक राज्य सरकारची आपापल्या गरजांनुसार स्वतंत्र यंत्रणा व व्यवस्था आहे. या व्यवस्थेतून विशेषत: कामगार आरोग्य व सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयावर प्रबोधन प्रशिक्षणापासून कायदेशीर कारवाई करण्यापर्यंतचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे जबाबदारीची जाणिव विविध स्तरांवर निर्माण झाली असली तरी औद्योगिक क्षेत्रात व त्यातही विशेषत: जोखमीच्या कामाच्या संदर्भातील कामगार सुरक्षेचे आव्हान मात्र आजही कायमच आहे.

उद्योग व कामगार क्षेत्रातील विषय तज्ञांनुसार कंपन्यांनी त्यांच्या व्यावसायिक उलाढालीपैकी दोन टक्क्यांपर्यंतची रक्कम आपल्या उद्योग-व्यवसायाशी संबंधित पर्यावण संरक्षण, कामगार आरोग्य व सुरक्षा या विषयावर प्रशिक्षण, संशोधन, सुधारणा इ. वर खर्च करणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र या मुलभूत व मुख्य तरतुदीची अंमलबजावणी होतेच असे नाही.

याचाच परिणामी उद्योग क्षेत्रातील कामाच्या संदर्भातील अपघात, अनारोग्य, जखमी होणे व प्रसंगी औद्योगिक अपघातातून  कायमचे अपंगत्व व मृत्यू या जोखीमभऱ्या स्थितीचा सामना अनेकांना करावा लागतो. यातच भर पडते ती आग आणि आगींमुळे होणाऱ्या विविध औद्योगिक अपघातांची. छोट्या-मोठ्या आगींमुळे होणारे अपघात सोडा, पण मोठ्या भीषण व कारखान्यात जीवघेण्या ठरलेल्या आगींमुळे गेल्या सहा महिन्यांमध्ये देशपातळीवर झालेल्या बहुचर्चित आगींच्या अपघातांचा गोषवारा पुढीलप्रमाणे मांडता येईल.

हे सर्वज्ञात आहे की रसायन उद्योगांतर्गत येणाऱ्या औषध प्रक्रिया उद्योगांमध्ये कच्चामाल संग्रह, हाताळणे, त्यावर प्रक्रिया करणे हे अत्यंत जिकिरीचे असते व त्यासाठी जाणकार अनुभवी व शिक्षित, प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी प्रक्रिया तज्ञांची आवश्यकता असते.

या मुद्याला अधिक गती मिळावी यासाठी संस्थागत स्तरावर 2020 मध्ये इंडियन फार्मास्युटिकल्सचे आपल्या सर्व सदस्य कंपन्यांसाठी कारखाने व औषध निर्माण प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्यांचा बारकाईने व तपशिलवार अभ्यास विचार करून विशेष मार्गदर्शन मुद्दे संकलित करून वितरित केले. त्याचा पुढे सदस्य कंपन्यांनी अवलंब करावा, यासाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शक सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्याचा काही प्रमाणात फायदा झाला. मात्र त्याला सातत्याने व्यापक स्वरुप देणे आवश्यक होते.

औद्योगिक अपघात व विशेषत: जीवितहानी होणाऱ्या अपघाताप्रसंगी अपघाताचे गांभीर्य पाहता शासन प्रशासनाची भूमिका सद्यस्थितीत कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्याची असते. मात्र या कठोर कायदेशीर कारवाईला विशेष प्रशिक्षण, सराव-अनुभव, सुरक्षेसह कामकाजाचा प्रसार-प्रचार करून ज्याप्रमाणे रसायन, औषध उद्योगात उत्पादनांच्या दर्जावर जेवढा भर दिला जातो. तेवढाच भर कामाच्या ठिकाणी कर्मचारी, कंपनीच्या सुरक्षेवर देणे हाच या प्रकरणी कायमस्वरुपी व परिणामकारक तोडगा ठरू शकतो.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.