विजय कोणाचा, हार कोणाची...
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिलला धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांनी निर्दोष आणि नि:शस्त्र पर्यटकांवर, त्यांचा धर्म विचारुन केलेल्या क्रूर हल्ल्यात भारताने जे प्रखर आणि पाकिस्तानचा विध्वंस करणारे प्रत्युत्तर दिले, त्यासाठी भारताचे कौतुक होत आहे. या संघर्षात निर्विवादपणे भारताचे वर्चस्व राहिले ही बाब तर नेहमी भारताचा द्वेष करणाऱ्या विदेशी वृत्तपत्रांनीही मान्य केली आहे. हा एक प्रकारे पाकिस्तानवर भारताचा पाचवा विजयच आहे. परिस्थिती एवढी स्पष्ट असतानाही भारतात आजही काही संशयात्मे विविध प्रकारच्या शंका काढीत आहेत. वास्तविक त्यांच्यापैकी बहुतेक शंका या उत्तर देण्याच्याही लायकीच्या नाहीत. तरीही काही मुद्द्यांचे निराकरण वेळीच करणे आवश्यक असते. 7 मे ते 10 मे असे चार दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो सशस्त्र संघर्ष झाला, त्याची तुलना काही महाभाग 1971 च्या युद्धाशी करीत आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळच्या नेत्या इंदिरा गांधी यांच्यात कोण अधिक कणखर, निडर आणि सक्षम यावरही काहीजण भाष्य करीत आहेत. ‘इंदिरा गांधी बनना आसान नही’ अशा प्रकारचे संदेश पसरविण्याचा प्रयत्नही या सशस्त्र संघर्षाला स्थगिती मिळाल्यानंतर केला गेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत इंदिरा गांधी अधिक सक्षम होत्या, अशा प्रकारचे निष्कर्षही काही विद्वानांनी काढले आहेत. असे वाद निर्माण करण्याच्या प्रयत्नामागे वस्तुस्थितीपेक्षा राजकारणच अधिक असते, हे स्पष्ट आहे. एकतर, 1971 चे युद्ध आणि हा सशस्त्र संघर्ष यात तुलना होऊ शकत नाही. तरीही ओढून ताणून ती करायची असे काही जणांनी ठरविले असले, तरी निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे काढले गेले आहेत. प्रत्येक युद्ध किंवा सशस्त्र संघर्ष जेव्हा होतो, तेव्हा त्यापाठी एक निश्चित उद्देश असतो. 1971 च्या आधी एकच पाकिस्तान होता. पश्चिम पाकिस्तानच्या प्रशासनाने आणि लष्कराने पूर्व पाकिस्तानातील (सध्याच्या बांगला देशातील) बंगाली संस्कृती नष्ट करण्यासाठी तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार चालविले होते. या अत्याचारांपासून सुटका करुन घेण्यासाठी पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत होते. त्यामुळे भारताच्या नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत होता. तो थांबावा म्हणून ते युद्ध करण्यात आले, असे त्यावेळी स्पष्ट केले गेले होते. ते युद्ध पंधरा दिवस चालले. पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. मात्र, त्या युद्धाचे मूळ कारण जे होते, ते दूर झाले काय? त्याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. उलट बांगलादेशच्या निर्मितीनंतर भारतात बांगलादेशातून होणारी घुसखोरी कमी न होता वाढली. पूर्वी अधिकतर हिंदू शरणार्थी येत होते. नंतरच्या काळात बांगलादेशी मुस्लीमांचे लोंढे येऊ लागले. ते प्रमाण इतके होते, की पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांमधील काही जिल्ह्यांच्या लोकसंख्येचा समतोलच बदलला. इंदिरा गांधी पुन्हा 1980 मध्ये देशाच्या नेत्या बनल्यानंतरही ही स्थिती कायम राहिली. त्यामुळे आसाम गणपरिषद आणि आसू या संघटनांना मोठे आंदोलन करावे लागले. त्यातून नंतर राजीव गांधी यांच्या काळात आसाम करार करण्यात आला. सांगण्याचा मुद्दा असा की, 1971 च्या युद्धाचा मूळ उद्देश अशा प्रकारे पराभूत झाला. या युद्धात पाकिस्तानची मोठी हानी झाली ही बाब सत्य आहे. तथापि, भारताची हानीही काही कमी झाली नाही. भारताने आपले जवळपास 3,500 सैनिक गमावले. तसेच युद्धसामग्रीचीही हानी झालीच. पुढे जवळपास एक वर्षाने सिमला करार करण्यात आला. युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानचा जो 13,000 चौरस किलोमीटरचा प्रदेश जिंकला होता, त्यातला 95 टक्के परत द्यावा लागला. पाकिस्तानचे 93 हजार सैनिक जे भारताने पकडले होते, तेही सोडावे लागले. ते सोडण्याच्या मोबदल्यात काश्मीर प्रश्नाची सोडवणूक करुन घेण्याची संधीही साधता आली नाही. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, त्या युद्धातून भारताचा कोणताही व्यावहारिक लाभ झाला नाही. हानी मात्र भारताचीही मोठी झाली. मग एवढे मोठे युद्ध करुन शेवटी मिळविले काय? हा प्रश्न उरतोच. या उलट, 2025 चा संघर्ष हा मर्यादित उद्दिष्टांसाठी आणि मर्यादित काळासाठी झाला. या संघर्षातही भारताने पाकिस्तानची मोठी हानी केली. 100 हून अधिक दहशतवादी, 40 ते 60 सैनिक आणि मोठ्या प्रमाणात सामरिक पायाभूत सुविधा पाकिस्तानला गमवाव्या लागल्या आहेत, हे आज पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्या तुलनेत भारताच्या सैनिकी सुविधांची कोणतीही हानी झालेली नाही. भारताचे पाच सैनिक हुतात्मा झाले आहेत. तर 20 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. याचाच अर्थ असा की हा संघर्ष मर्यादित स्वरुपाचा होता. यातून एक बाब स्पष्ट होते. ती अशी की, ते युद्ध आणि हा संघर्ष यांच्यातील तुलनाच चुकीची आहे. साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वगुण आणि इंदिरा गांधी यांचे नेतृत्वगुण यांची तुलनाही अनाठायी आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित अशीच आहे. पुढचा मुद्दा असा की, हा नवा संघर्ष केवळ स्थगित झाला आहे. थांबलेला आहे, अशी स्थिती नाही. पाकिस्तानने भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला केला, तर ते युद्धच मानले जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारताने एक ‘नवा सिद्धांत’ (न्यू नॉर्मल) रुढ केला आहे, असे दिसून येते. दहशतवादाला आणि दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत क्षमा केली जाणार नाही, हे भारताने उरी हल्ला, पुलवामा हल्ला आणि आता पहलगाम हल्ला या तीन्ही दहशतवादी घटनांच्या नंतर दाखवून दिले आहे. त्यांच्यापैकी यावेळी भारताने दिलेले प्रत्युत्तर हे पाकिस्तानच्या अपेक्षेपेक्षाही कितीतरी अधिक तीव्र होते. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामरिक सामर्थ्यातील अंतर किती मोठे आहे, याची ही एक झलक होती. या संघर्षात भारताने विजय मिळविला, हे स्पष्ट आणि सर्वमान्य आहे. तसेच या संघर्षाचा भारतावर आर्थिक ताणही पडलेला नाही, जो 1971 च्या युद्धामुळे पडला होता. तेव्हा निष्कर्ष काय, तर ते युद्ध आणि हा संघर्ष दोन्ही भिन्न परिस्थितीत घडले आहेत. समान बाब एवढीच आहे की, दोन्हीमध्ये भारतीय सेनेने आपल्या अत्युच्च रणकौशल्याचे दर्शन घडविले. यासाठी सेनादलांचे आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत, ही बाब सर्वांना मान्य होण्यासारखीच आहे.