कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तामिळनाडू निवडणुकीतील ‘विजय’ कोणाचा?

06:12 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणूक येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहेत. याचदरम्यान अभिनेता व नेता म्हणून आपली छाप पाडणारा विजय थलपती सध्या तामिळनाडूच्या राजकारणात चर्चेत आला आहे. निवडणुकीची तयारी जोमाने करणाऱ्या विजय थलपतीच्या प्रचारसभेत चेंगराचेंगरीचा प्रकार घडून त्यात 41 हून अधिकांना जीव गमवावा लागला. आता याचेच राजकारण करत आपला फायदा करवून घेण्याच्या प्रयत्नात विविध राजकीय पक्षांची चढाओढ दिसू लागली आहे.

Advertisement

तामिळनाडूत आगामी विधानसभा निवडणूक येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होणार आहेत. स्वातंत्र्यानंतरचा तामिळनाडूचा राजकीय इतिहास पाहिल्यास राज्यावरील सत्ता प्रामुख्याने द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन पक्षांचीच राहिली आहे. केंद्रसत्तेतील काँग्रेस किंवा भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांना तामिळनाडूत कधीच एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. जाज्वल्य प्रादेशिक आणि भाषिक अभिमान, उत्तरेकडील प्रबळ राज्यांपेक्षा वेगळी संस्कृती व संस्कार ही त्याची प्रमुख कारणे आहेत. अशा या आगळ्या वेगळ्या राज्यातील राजकीय क्षितिजावर एक नवा तारा झळकू लागला आहे. तो म्हणजे तमिळगा वेत्री कळघम या अवघ्या दीड वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षाचा नेता थलपती विजय.

Advertisement

तामिळनाडूला चित्रपटातून राजकारणात आलेल्या आणि तेथे महत्त्वपूर्ण राजकीय कारकीर्द घडवलेल्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे. त्यातील सर्वात लक्षणीय उदाहरण महानायक एमजी रामचंद्रन अर्थात एमजीआर 1953 साली लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी राज्यातील तत्कालीन सत्ताधारी पक्ष द्रमुकमध्ये प्रवेश केला. 1972 साली त्यांचे द्रमुकशी मतभेद झाले आणि त्यांचा स्वत:चा

ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (अण्णा द्रमुक) पक्ष अस्तित्वात आला. 1977 ते 1987 सालच्या त्यांच्या मृत्यूपर्यंत रामचंद्रन तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांच्या सहकलाकार व उत्तराधिकारी दिवंगत जयललिता यांनी पक्षाची धुरा सांभाळली. सहा वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. तामिळ, हिंदी आणि अन्य भाषातील चित्रपटात उत्तम अभिनय करणारे तामिळ अभिनेते कमल हासन यांनी 2018 साली मक्कल निधी मय्यम पक्ष स्थापन करून द्रमुक व अण्णा द्रमुकच्या राजकारणास पर्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही. थलायवा म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांचाही राजकारणात येण्याचा विचार होता. पण तो प्रत्यक्षात आलेला नाही. याच मांदियाळीत टीव्हीके पक्ष प्रमुख थलपती विजय यांचा समावेश होतो. काही जाणकार तामिळ लोकांना त्यांची पडद्यावरची आणि राजकारणात आल्यानंतर लागलीच मिळणारी लोकप्रियता पाहून माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांची आठवण होत आहे.

तथापि विजय यांच्या लोकप्रियतेला वादात आणणारी त्याचप्रमाणे तामिळनाडूतील निवडणूक समीकरणे बदलू शकणारी एक दुर्घटना तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी घडली आहे. टीव्हीके पक्ष नेते विजय आगामी विधानसभा  निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरात जाहीर सभा घेत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्या व नेत्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जेथे तेथे त्यांच्या सभांना  अलोट गर्दी होत आहे. 27 सप्टेंबर रोजी करूर जिल्ह्यातील सभा मात्र त्यांच्या प्रचारास गालबोट लावणारी ठरली. सभेच्या ठिकाणी दहा हजारांचा जनसमुदाय अपेक्षित होता. परंतु प्रत्यक्षात सुमारे 25 हजारांहून अधिक लोक जमले. त्यातच विजय यांना सभास्थळी येण्यास उशीर झाल्याने अस्वस्थता वाढली. परिणामी सभेला ते संबोधित करतानाच चेंगराचेंगरी होऊन त्यात 41 जणांचा मृत्यू झाला तर 50हून अधिक जखमी झाले. प्रेम आणि श्रद्धा यामुळे भारतीय लोकांना अस्तित्वाचे भान राहात नाही. याचा आणखी एक विदारक प्रत्यय या घटनेतून आला. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप, मृतांच्या कुटुंबांना भरपाई, न्यायालयाचे प्रशासनावर ताशेरे, अटक कारवाई, चौकशी यंत्रणेची नेमणूक हे सोपस्कार नेहमीप्रमाणे पार पडले. परंतु  त्यातून गेलेले जीव परत येणार नाहीत की कुटुंबातील पोकळी भरून निघणार नाही.

अभिनेते विजय यांचा टीव्हीके पक्ष प्रामुख्याने राज्यातील सत्ताधारी पक्ष द्रमुकला पर्याय देण्यासाठी पुढे आलेला आहे. आतापर्यंतची त्यांची भाषणे व भूमिका मुख्यमंत्री स्टॅलीन आणि द्रमुकला लक्ष्य करणारी राहिली आहे. याच बरोबरीने त्यांनी मोदी आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले आहे. ‘टीव्हीके’ हा एक खरोखर धर्मनिरपेक्ष पक्ष असेल जो कधीही भाजपशी छुपा संबंध ठेवणार नाही’ असे म्हणत टीव्हीके अंतर्गत युतीमुळे भागीदारांना समान अधिकार मिळेल, असेही विजय म्हणाले होते. स्वत: मदुराई पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करताना, त्यांनी लोकांना असे गृहीत धरण्यास सांगितले की, ते स्वत: राज्यातील सर्व 234 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, असे मानून मतदान करावे. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेत घडलेली ताजी दुर्घटना टीव्हीकेसाठी दुधारी तलवार ठरण्याची शक्यता आहे. विरोधक दुर्घटनेचे भांडवल करून विजय यांचे नियोजन, प्रशासन, नेतृत्व प्रश्नांकित करत आहेत. त्यांच्या पक्षाकडून झालेल्या जलद मदत उपाययोजना आणि शोकाकुल कुटुंबांना मदत केल्याने सहानुभूती निर्माण होऊ शकते. परंतु झालेले मृत्यू हा सदैव टीकेचा विषय बनून राहिल. केवळ विजय यांच्या पक्षासाठीच नाही तर प्रस्थापित द्रमुक सरकारसाठी सदर दुर्घटना धोकादायक ठरणार आहे. न्यायालयाने नेमलेल्या एसआयटी चौकशीत जर पोलिसांचे अपयश उघडे पडले तर द्रमुकला अपुरी सुरक्षा, निरिक्षणाचा अभाव यासाठी जबाबदार धरले जाईल. दरम्यान अण्णा द्रमुक व भाजपप्रणित एनडीए युती या दुर्घटनेचा लाभ उठवत स्वत:स जबाबदार आणि नागरी सुरक्षेला प्राधान्य देणारे पक्ष म्हणून पुढे येऊ शकतात. अर्थात, विरोधकांकडे भाजप युतीविरुद्ध मणिपूर, लडाख येथील असुरक्षा, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी हे विषय असतीलच. एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे करूर दुर्घटनेने तामिळनाडूमधील राजकीय चर्चेस विजय यांच्या करिष्म्याकडून सार्वजनिक सुरक्षा, प्रशासन आणि विश्वासार्हता या मुद्यांकडे वळवले आहे.

संकटातून संधीचा शोध घेण्यात भाजपइतका वाक्बगार पक्ष देशाच्या राजकारणात दुसरा नाही. 27 सप्टेंबरच्या दुर्घटनेनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने त्यांचे शिष्टमंडळ करुरला पाठवले. तेव्हापासून भाजप सत्ताधारी, द्रमुकवर 41 जणांच्या मृत्यूस कारणीभूत सरकारी गैरव्यवस्थापनाचा आरोप करत आहेत. दुसऱ्या बाजूने विजय आणि त्यांच्या टीव्हीके पक्षास सांभाळून घेत आहेत. एकंदरीत टीव्हीकेशी संधान साधून अण्णा द्रमुक, टीव्हीके आणि एनडीए अशी आघाडी निर्माण करणे ही भाजपच्या प्रयत्नांची दिशा राहील. याचाच एक भाग म्हणून पुढील सभांच्या भवितव्याबद्दल चिंतीत असलेल्या विजय यांना भाजपने  संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे. भाजपशिवाय काँग्रेस नेतृत्वानेही विजयशी संपर्क साधून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

करूर सभेपूर्वी काही तास नमक्कल येथे आपल्या समर्थकांना संबोधित करताना विजय यांनी अण्णा द्रमुकवर भाजपशी युती केल्यावरून सडकून टीका केली होती. यामुळे अण्णा द्रमुकचे संस्थापक एमजी रामचंद्रन यांचे सच्चे अनुयायी नाराज आहेत, असा दावा त्यांनी केला होता. याचवेळी विजयनी भाजप आणि सत्ताधारी द्रमुक यांची छुपी युती असल्याचे मत मांडले होते. अशा परिस्थितीत ताज्या दुर्घटनेनंतर विजय आणि टीव्हीकेचे भाजपशी नवे नाते निर्माण होऊ शकेल काय? हा कळीचा मुद्दा बनला आहे. विजय यांनी या संकटकाळी आपणास पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. यातून मिळणाऱ्या संकेताचीही चाचपणी सुरु आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी घेण्यात आलेली सर्वेक्षणे दर्शवतात की, द्रमुक आघाडीस अधिक मते मिळतील आणि अण्णा द्रमुक व एनडीए आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहील. सर्वेक्षणातून मिळालेल्या अंदाजांनुसार विजय यांचा टीव्हीके हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास येईल. स्वतंत्रपणे उभा राहिला किंवा अन्य छोट्या पक्षांशी त्याने युती केली तर कदाचित विरोधी पक्ष अण्णा द्रमुकच्या जागांना धक्का देऊन तो विरोधी पक्षाची पोकळीही भरून काढू शकेल. जशी निवडणूक जवळ येईल तशी सर्वेक्षणे बदललेली दिसतील. एक गोष्ट मात्र निश्चित असेल, ती म्हणजे विजय आणि त्यांचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूचे राजकारण बदलणारा नवा खेळाडू म्हणून अस्तित्वात येईल.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article