For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जागा कोणाची उमेदवार कुणाचा ?

06:16 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागा कोणाची उमेदवार कुणाचा
Advertisement

विधानपरिषदेच्या  पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 6 ऑक्टोबर शेवटची मुदत आहे. विधान परिषदेच्या पाचपैकी पुणे आणि अमरावती शिक्षक या दोन जागांसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर पुणे पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. परंतु भाजपने  दोन्ही मित्र पक्षांची मागणी अमान्य केली. परिणामी शिंदे गटाला अमरावती शिक्षक आणि अजित पवार गटाला औरंगाबाद पदवीधर अशा एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीत उमेदवारीवरूनच मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यातही जागावाटपाचा तिढा कायम दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ आणि अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाने अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केल्याने, अमरावतीत ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने येत आहेत तर भाजपने जाहीर केलेल्या पुण्याच्या शिक्षक मतदार संघासाठी शिवसेना शिंदे गटाने दावा करताना उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. नागपूरातही भाजपमध्ये पक्षांर्तगत बंडखोरी उफाळून आल्याने जागा कुणाची? ‘आणि’ उमेदवार कोणाचा? हा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

तीन पक्षांची महायुती आणि महाविकास आघाडी झाल्यापासून प्रत्येक निवडणूकीत हेवेदावे होत आहेत. 23 ऑक्टोबरला विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र अद्याप कोणत्याही जागांवर कोणत्याही आघाडी युतीचे एकमत झाल्याचे दिसत नाही. भाजपने पाच पैकी तीन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले, पुणे पदवीधरसाठी डॉ. स्मिता जाधव, पुणे शिक्षक मतदार संघासाठी कौस्तुभ गावडे तर नागपूर पदवीधरसाठी सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे शिक्षक मतदार संघासाठी शिंदे गटाचे मंगेश चिवटे इच्छुक असताना, भाजपने येथे आपला उमेदवार जाहीर केला. शिंदे गटाचे चिवटे हे आज अर्ज भरण्याची शक्यता आहे,तर काल भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले, त्यावेळी मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचा कोणताही मोठा नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे भाजपने अशा निवडणूकीसाठी दिलेले नवीन चेहरे बघता, भाजपसाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी दिसत नाही. महाविकास आघाडीत पुणे पदवीधर मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसने पुणे शिक्षक मतदार संघातून पदवीधरांचे आमदार असलेल्या जयंत आसगावकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

Advertisement

अमरावती शिक्षक मतदार संघातून काँग्रेसने आदिती पोहरे तर ठाकरे गटाने दत्तात्रय लहाने यांना उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीतील मित्रपक्षच येथे आमने सामने येत असल्याने राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीत ही एकमेव जागा शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे, विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघातूनच भाजपला पक्षांर्तगत बडखोरांचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. सुधाकर कोहळे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने माजी आमदार अनिल सोले हे उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम आहेत. नागपूर पदवीधर मतदार संघावर भाजपचे वर्चस्व होते, मात्र सध्या हा मतदार संघ काँग्रेसकडे आहे, काँग्रेसने पुन्हा एकदा अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपला हा मतदार संघ पुन्हा मिळणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार सुशिक्षित, संघटित आणि आपल्या प्रश्नांबाबत जागरूक असतात. त्यामुळे पक्षाचा झेंडा पाहून मतदान करण्यापेक्षा उमेदवाराची प्रतिमा, त्याचे काम, शिक्षक-पदवीधरांचे प्रश्न आणि संघटनात्मक ताकद यांना या निवडणूकीत महत्त्व असते. लोकसभा विधानसभा निवडणूकीपेक्षा धक्कादायक निकाल या निवडणूकीत लागताना दिसतात. ज्या पक्षाची तसेच उमेदवाराची मतदारांची सर्वाधिक नोंदणी असते, उमेदवाराचा सातत्याने जनसंपर्क असतो. त्याला मोठ्या संख्येने मतांचे दान पडत असते, भाजपने मुंबईत विधानसभा, महापालिका आणि काही प्रमाणात लोकसभा निवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाला मागे सारत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजपला सपशेल पराभव पत्करावा लागला. शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब पदवीधर तर ज.मो.अभ्यंकर हे शिक्षक मतदार संघातून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले. पुणे पदवीधर मतदार संघ देखील कधी काळी भाजपचा बालेकिल्ला होता. प्रकाश जावडेकर, विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र 2020 ला राष्ट्रवादीच्या अरूण लाड यांनी भाजपकडून हा मतदार संघ हिरावून घेतला, भाजपने अरूण लाड यांचा मुलगा शरद लाड यांना डावलत डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्याने महविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे पहावे लागेल.राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीत छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदार संघाची जागा सूटल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलीय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारी घोषणेनंतर थेट दिल्ली गाठली आहे. दिल्लीत गेल्यानंतर अमित शहा यांची भेट घेऊनच शिंदे परततात. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजे 9 ऑक्टोबरपर्यंत या निवडणूकीमध्ये व्टीस्ट कायम असणार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील तीनही पक्षांचे उमेदवार अनिकेत तटकरे असो, रवींद्र बापट, प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंचे व्याही अरूण लाखाणी, विक्रम काकडे असो, महायुतीने आपल्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध केल्या होत्या. नाशिकच्या जागेवर भाजप बंडखोर उमेदवाराने उध्दव ठाकरेंच्या साथीने एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला गोदा घाट दाखवला, मात्र शिंदेंनी भाजपच्या या राजकीय खेळीवर मात करत, गोकुळ गितेंचा शिवसेनेत प्रवेश कऊन घेतला. आता महायुतीतील पाच पैकी तीन जागांवर भाजपने तर एका जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. आजपर्यंत केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मैत्रीपूर्ण निवडणूका वगळता शिंदे यांची शिवसेना आणि भाजप निवडणूकीसाठी आमने सामने आलेले नाहीत. या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे आणि भाजप समोरासमोर लढल्यास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

प्रवीण काळे 

Advertisement
Tags :

.