अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक ही यावेळी कमालीची रंगली, गाजली आणि गांजलीसुद्धा. यावेळी पुरोगामी डाव्या विचाराच्या कमला हॅरिस विजयी होतील की सनातनी विचारांचे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होतील असा प्रश्न मतदारांसमोर आहे. तेथील चतुर, चाणाक्ष मतदार योग्य निर्णय करतील. प्रगतीशील तरुण तुर्क कमला हॅरिस आणि अनुभवी मुरब्बी म्हातारे अर्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढाई आहे. मतदार विजयाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे सांगता येत नाही.
प्रा. हेन्री बॅम्फोर्ड पार्क म्हणतात, अमेरिका हे जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे. अनेक देशांचा एक देश, विविध लोकसमूहांनी बनलेला एकसंघ लोकसमूह अशी अमेरिकेची ओळख आहे. 250 वर्षाच्या इतिहास प्रवाहातून ‘अमेरिकन सेल्फ’ ही स्वत:शी ओळख अमेरिकने विकसित केली आहे. त्यामुळे ट्रम्प ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणतात तर हॅरिस स्वतंत्र व मुक्त लोकशाहीचे गोडवे गातात. गेल्या सहा महिन्यापासून अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. दर चार वर्षांनी येणारा हा अमेरिकेतील लोकशाहीचा उत्सव जगात एक कुतूहलाचा आणि आकर्षणाचा विषय असतो. त्याचे कारण असे, की अमेरिकेचे अध्यक्षपद हे जगातील सर्वश्रेष्ठ शक्तिमान पद मानले जाते.
अमेरिकेच्या अध्यक्षांकडे राज्य चालविण्याचा व शासन चालविण्याचा असे दोन्हीही अधिकार असतात. त्यामुळे अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेसारख्या बलशाली महासत्तेचे महत्त्वपूर्ण सत्ताकेंद्र असल्यामुळे त्याचा जगाच्या राजकारणावरसुद्धा दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोण अध्यक्ष होणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. 5 नोव्हेंबर रोजी मंगळवारी लोकशाहीचा उत्सव होत आहे. यावेळची निवडणूक अनेक अर्थानी गाजत आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प जे मागील वेळी पराभूत झाले होते ते आता पुन्हा विजयी अविर्भावाने मैदानात उतरले आहेत. त्यांचा हा तराणा म्हणजे नवा आक्रमक पावित्रा पाहून डेमोक्रॅट उमेदवार जो बायडेन यांनी त्यांच्या गाजलेल्या व फसलेल्या डिबेटनंतर पक्षाच्या दबावामुळे त्यांनी अध्यक्षीय रणांगणातून पलायन केले आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची उमेदवारी जाहीर केली. कमला हॅरिस यांनी आपल्या आक्रमक प्रचाराने ट्रम्प यांना चांगलेच जेरीस आणले. फोर्ब्स पाहणीनुसार 3 टक्क्यानी हॅरिस पुढे आहेत, तर रॉयटर्स पाहणीनुसार ट्रम्प 1 टक्क्यानी हॅरिसपेक्षा पुढे आहेत. ही निवडणूक रंगत आहे, चुरशीची होत आहे आणि आता निर्णय काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कशी असते रचना?
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत 1776 पासून आजपर्यंतचा इतिहास पाहता, पक्ष आपल्या प्रायमरीमध्ये अध्यक्ष उमेदवाराची घोषणा करतात. पुढे होणाऱ्या डिबेटमध्ये पक्षाचे उमेदवार आपापल्या पक्षाच्या कार्यक्रमावर भर देतात आणि आमने सामने रुबरु अध्यक्ष उमेदवारांची जोरदार चर्चा होते. चित्रवाणी वाहिन्यांवरून ही सर्व चर्चा दाखविली जाते. प्रत्यक्ष लोकही या चर्चेत भाग घेतात. त्यातून अनेक मुद्दे समोर मांडले जातात. विचारमंथन होते आणि देशापुढे कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हेही कळून येते. इलेक्टोरल कॉलेजमध्ये 538 सदस्य असतात. त्यापैकी 270 जागांवर जो पक्ष विजय मिळवेल त्याची हुकमत व त्याचे प्रभुत्व सिद्ध होते. कॅलिफोर्निया राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कमला हॅरिस आणि फ्लॉरिडा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शर्थीची झुंज होत आहे. टपाली मतदान तर पार पडले. आता प्रत्यक्ष मतदान 5 नोव्हेंबरला होणार आहे. जून 2024 मध्ये झालेल्या डिबेटनंतर जो बायडेन यांनी नाट्यामय माघार घेतली आणि कमला हॅरिस यांच्या कुंडलीत अध्यक्षीय उमेदवारीचा योग चालून आला. जे.डी. व्हॅन्स हे गाजलेले लेखक ट्रम्प यांचे उपाध्यक्षीय उमेदवार आहेत, तर कमला हॅरिस यांचे उपाध्यक्षीय उमेदवार टीम वॉल्झ हे आहेत. डेमोक्रॅट उमेदवार कमला हॅरिस या पूरोगामी, प्रगतीशील, स्त्राr-पुरुष समानतेचा पुरस्कार करणाऱ्या नेत्या मानल्या जातात. त्या 60 वर्षाच्या असून कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या हेस्टिंग्ज लॉ कॉलेजच्या पदवीधर आहेत. त्यांनी 5 वर्षे अॅटर्नी म्हणून काम केले आहे तसेच त्या डेमोक्रॅटिक पक्षातर्फे सिनेटवर निवडून आल्या होत्या. स्वकर्तृत्वाने उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे चालून आले. आत्तापर्यंत त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे 78 वर्षांचे तरुण असून त्यांचा उत्साह व आत्मविश्वास दांडगा आहे. ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील अर्थशास्त्रात विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आहे. 1987 पासून ते अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय होते. ट्रम्प यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून ते व्हाइट हाऊसमध्ये पोहोचले. त्यांच्या नावावर 19 पुस्तके असून ‘द आर्ट ऑफ द डील’ हे पहिले पुस्तक बेस्ट सेलर म्हणून प्रसिद्धीस आले आहे. अमेरिकेतील धनाढ्या कुबेर एलॉन मस्क यांचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे.
ऐरणीवर आलेले मुद्दे?
बिघडलेली अर्थव्यवस्था, वाढती बेकारी, स्थलांतरीतांचा बिकट प्रश्न, लोकशाहीचे भवितव्य, बिघडलेली आरोग्य व्यवस्था, महागडे व खर्चिक शिक्षण, फसलेले परराष्ट्र धोरण असे कितीतरी पैलू अमेरिकन प्रसार माध्यमांनी जनतेसमोर ठेवले आहेत. अमेरिकेतील मतदान 50 टक्क्यापेक्षा पुढे जात नाही ही खरी शोकांतिका आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी?
अमेरिकेच्या संविधानात असे नमूद करण्यात आले आहे, की अध्यक्ष पदावर विराजमान होणारी व्यक्ती ही नैसर्गिकरित्या अमेरिकेची नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजे ती अमेरिकेत जन्मलेली असावी असे अभिप्रेत आहे. 35 वर्षाचे वय आणि किमान 14 वर्षे अमेरिकेतील वास्तव्य हे सुद्धा आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. दोन पेक्षा अधिक वेळा अध्यक्षपद भूषविता येत नाही. दोन वेळा महाभियोगाला सामोरे गेलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत. कॅपिटल हल्ला प्रकरणातून सिनेटने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यामुळे ट्रम्प पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष पदासाठी बोहल्यावर चढू शकले आहेत. अलीकडे अमेरिकेमध्ये चीन, रशिया, इराण इत्यादी देशांच्या हस्तक्षेपाचा कथित मुद्दाही निवडणूक काळात गाजत आहे. ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप आहेत. ट्रम्प यांच्या कलंकित प्रतिमेमुळे त्यांच्यावर न्यूयॉर्क टाइम्स, लॉसएंजिलिस टाइम्स या सारख्या वृत्तपत्रांनी टीकेची राळ उडवून दिली आहे. 35 टक्के रिपब्लिकन मतदार आणि 18 टक्के अपक्ष मतदार यांचा ट्रम्प यांना पाठिंबा आहे, असे पाहणीत आढळले आहे.
प्रचार मोहिमेतील घुसळण?
कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमातील मुद्दे व त्यावर झालेले विचारमंथन अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत जेवढे लोकशिक्षण होते तेवढे खचितच जगाच्या इतर देशात होत असेल. जात, प्रदेश, धर्म यापेक्षाही देशापुढील विकासाचे मुद्दे निवडणुकीत चर्चिले गेले पाहिजेत. वैचारिक मुद्यावर ऊहापोह झाला पाहिजे, ही भूमिका महत्त्वाची आहे. कमला हॅरिस यांनी स्वातंत्र्य आणि अराजकता यातील पर्याय काय निवडणार असा विषय मांडला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिलांना न्याय आणि राष्ट्राचे भविष्य घडविण्याची ग्वाही कमला हॅरिस वारंवार देत होत्या. मध्यम वर्गाच्या हिताचे रक्षण आणि छोट्या उद्योजकांचे संवर्धन आम्हीच करू यावरही हॅरिस यांनी आपल्या मोहिमातून जोरदारपणे भर दिला. आनंदी आणि आशावादी अमेरिकन जीवनाचे चित्र हॅरिस आपल्या प्रचार मोहिमेतून रंगवित होत्या. प्रतिशोध हा ट्रम्प यांचा सिद्धांत आहे. ते आपल्या भाषणात म्हणतात, मी तुमचा आवाज आहे. मी तुमचा योद्धा आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ज्यांचा विश्वासघात झाला आहे. त्यांच्यासाठी मी बदला घेणार. राजकीय प्रतिशोधासाठी अंतिम लढाई अशा पावित्र्यात ट्रम्प उभे आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा कानाजवळून रक्त गळत असतानाही ते हात उंच करून, भक्कम मूठ दाबून ‘लढा, लढा, लढा आणि लढत रहा’ असा संदेश देत होते. प्राणघातकीय हल्ल्यामुळे सुद्धा त्यांच्या विषयी सुप्त सहानुभूती अमेरिकन मतदारांच्या मनात आहे. पण ती मतपेटीत दिसेल काय? असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेच्या मते, ट्रम्प आपल्या रॅलीमधून ख्रिश्चन राष्ट्रवादावर भर देतात. तसेच ते आपल्या वत्तृत्वाने प्रेक्षकांवर मोहिनी टाकतात आणि आपला अंतर्गत व परराष्ट्र धोरणाचा अजेंडा आग्रहाने मांडतात. याउलट, हॅरिस यांना त्यांची विधाने खोटी, नाटकी आणि दिशाभूल करणारी आहेत असे वाटते. ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या धोरणावर टीका करावी, हॅरिस यांच्या भूमिकेवर टीका करावी, त्यांनी त्यांच्या महिला असण्यावर, वर्णद्वेषावर आधारित किंवा महिला धोरणावर आणि वैयक्तिक टीका करू नये असा सल्ला खुद्द रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना दिला होता.
गर्भपात हाही या प्रचार मोहिमातील एक कळीचा मुद्दा होता. कमला हॅरिस निवडून आल्या तर त्या गर्भपाताच्या हक्काविषयी मदत करतील असे चित्र आहे. हॅरिस यांनी मजबूत सीमा सुरक्षेसाठी अभिवचन दिले आहे. पण ट्रम्प स्थलांतरीतांच्या प्रश्नावर अधिक आक्रमक आहेत. या प्रचार मोहिमातून हवामान बदलाचा प्रश्न हाही एक कळीचा मुद्दा होता. कमला हॅरिस पर्यावरण समस्येवर अनुकूल भूमिका घेऊन पर्यावरण समतोलाची वकीली करतात तर ट्रम्प यांनी मानवनिर्मित हवामान बदलाची खिल्ली उडवली. आर्थिक आघाडीवर बायडेन यांच्या धोरणांचा आणि कामगार कल्याणाचा पुरस्कार हॅरिस करतात तर ट्रम्प यांना अमेरिकन अर्थकारण अधिक स्वयंपूर्ण करावयाचे आहे. त्यांना वाटते, की डेमोक्रॅटिक धोरणामुळे अमेरिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. शिक्षणात कट्टरपंथी आणि मार्क्सवादी घुसल्याबद्दल ट्रम्प यांना चिंता वाटते. परंतु हॅरिस मात्र विद्यमान व्यवस्थेचे समर्थन करतात. डोनाल्ड ट्रम्प यांचा युद्ध थांबविण्यावर भर आहे. पूर्व युक्रेनचा काही भाग रशियाला देऊन युद्ध टाळता आले असते, असे त्यांना वाटते. तसेच हमास-इस्त्राईल संघर्षातही त्यांना शांतता प्रस्थापित करावयाची आहे. डेमोक्रॅट परराष्ट्र धोरणाच्या अपयशावर ट्रम्प वारंवार हल्ले करीत होते. परवडणारी आरोग्य देखभाल योजना देण्यावर हॅरिस यांचा भर आहे तर ट्रम्प यांनी अन्न, औषध व आरोग्यविषयक धोरणांची पुनर्रचना करण्यावर भर दिला.
घेण्यासारखे काही?
10 सप्टेंबरच्या डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प बायडेनपेक्षा सरस ठरले आणि बायडेन यांना अक्षरश: शर्यतीतून पलायन करावे लागले. 10 सप्टेंबरच्या डिबेटमध्ये हॅरिस ट्रम्प यांच्यापेक्षा वाक्चातुर्यात सरस असल्याचे त्यांनी दाखवून दिले. दूरचित्रवाणीच्या व्यासपीठावरूनसुद्धा तेथे होणारे वादविवाद अधिक लक्षवेधक असतात. आपल्याकडे वैयक्तिक गोष्टी, अहंकार, जातपात यावर मात करून आपण विचारांच्या लढाईवर भर दिला पाहिजे. अध्यक्षीय निवडणुकीत होणारे विचारमंथन खरोखरच जगातील इतर विकसनशील लोकशाही देशांना दिशा देणारे आहे. सारेच काही अमेरिकेतील निवडणुकीचे चांगले आहे असे नाही. एकदा एन.व्ही. कामत यांनी असे लिहिले होते, तेथे जेव्हा फ्लॉरिडा राज्यात मतमोजणीमध्ये गोंधळ झाला तेव्हा कामत म्हणाले होते, की अमेरिकेसारख्या राष्ट्रानेसुद्धा भारताकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तेव्हा सारेच परदेशातले चांगले असे म्हणण्यात अर्थ नाही. प्रगतीशील तरुण तुर्क कमला हॅरिस आणि अनुभवी मुरब्बी म्हातारे अर्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढाई आहे. भविष्यात अमेरिकेच्या इतिहासात कोणते पान लिहिले जाईल आणि 2025 मध्ये अध्यक्षपदी कोण विराजमान होईल हे सांगता येत नाही. परंतु रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल या न्यायाने अमेरिकेतील लोकशाही अधिक उज्वल, प्रगत आणि प्रभावी व्हावी हीच अपेक्षा आहे. तसे झाले तर 1776 साली जन्मलेली अमेरिका 250 वर्षाच्या इतिहासात अधिक प्रगल्भ होत आहे असे म्हणता येईल.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर