कोणाची किती पडली, पाडविली ?
आपल्या देशात कशालाही राजकीय रंग देण्याची परंपरा बऱ्याच काळापासून आहे. अगदी युद्धासारखे, किंवा सशस्त्र संघर्षासारखे प्रसंगही या प्रवृत्तीचे बळी ठरतात. 22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे क्रूर हल्ला केला. धर्म विचारुन 26 नि:शस्त्र निरपराध्यांची हत्या केली. तो केवळ पर्यटकांवर नव्हे, तर भारताच्या अस्मितेवरच घाला होता. त्यामुळे भारत स्वस्थ बसणार नाही, हे स्पष्ट दिसत होते. पाकिस्तानवर मोठी कारवाई होणार हे निश्चित होते. केवळ केव्हा आणि कशी हा एकच प्रश्न होता. त्याचे उत्तर 7 मे आणि 8 मेच्या मध्यरात्री मिळाले. भारताच्या वायुदलाने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य बनवून अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पाकिस्तान यावर गप्प बसला असता, तर ही कारवाई तेव्हढ्यावरच थांबली असती. पण पाकिस्तानचा त्याच्या पराक्रमावर नव्हे, तर चीन आणि तुर्कियेकडून घेतलेल्या शस्त्रास्त्रांवर गाढा (अंध) विश्वास होता. त्यामुळे त्याने भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सेनातळांवर तसेच मंदिरे आणि गुरुद्वारांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. तो भारताच्या स्वदेशनिर्मित प्रतिकार प्रणालींनी अयशस्वी ठरविला. पण पाकिस्तानच्या या मस्तीमुळे भारताला त्याला आणखी धडा शिकविण्याची संधी प्राप्त झाली. त्यामुळे भारताने क्षेपणास्त्रांचा असा प्रचंड हल्ला पाकिस्तानच्या वायुतळांवर आणि रडार यंत्रणेवर चढविला, की हे तळ, पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळले. त्यांच्यात ठेवलेली युद्ध विमाने, क्षेपणास्त्रे, अॅवॅक्स यंत्रणा, रडार आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचाही चुराडा झाला आणि पाकिस्तानच्या पदरी केवळ प्रचंड हानी नव्हे, तर मोठी नामुष्कीही पडली. पाकिस्तानची अण्वस्त्रे तरी सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही भारताच्या या हल्ल्यामुळे निर्माण झाला होता. प्रत्येक भारतीयासाठी खरे तर आपल्या सेनादलांनी केलेला हा पराक्रम, ही अभिमानाची कामगिरी आहे. पण भारताच्या सेनादलांनी गाजविलेल्या या पराक्रमामुळे काही जणांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. त्यांना, या संघर्षात भारताची किती विमाने पडली, हे जाणून घेण्यात अधिक रस आहे. त्यामुळे हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले झाले होते, तेव्हा भारताने अनुक्रमे सर्जिकल स्ट्राईक आणि विमान हल्ले पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केले होते. त्यावेळी हेच लोक असे हल्ले केल्याचे ‘पुरावे’ मागत होते. यावेळच्या ‘सिंदूर अभियाना’त सेनादलांनी कोणी विचारायच्या अगोदरच उपग्रहीय छायाचित्रांचे पुरावे सादर करुन अनेकांची तोंडे उघडण्याआधीच बंद केली. तथापि, कोणत्याही घटनेचे (घडलेल्या अगर न घडलेल्याही) राजकारण करण्याची घाई कित्येकांना इतकी असते, की, पूर्वी पाकिस्तानच्या हानीचे पुरावे द्या, असे म्हणणारे हे लोक आता भारताची किती हानी झाली, हे विचारत आहेत. या चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षात भारताची सरशी झाली, ही बाब जगाने मान्य केली आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष पाकिस्तानने आपण अंगभर मार खाल्ल्याची कबुली प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दिली आहे. तरीही आपल्याकडच्या काही लोकांना भारताची झालेली अगर न झालेली, हानी जाणून घेण्यात स्वारस्य आहे. ही बाब किती विचित्र आहे, हे क्रिकेटचे उदाहरण देऊन सांगता येते. समजा, एखाद्या क्रिकेट सामन्यात एका संघाचा विजय झाला, तर त्या संघाने धावा किती केल्या, विरुद्ध संघाचे बळी किती मिळविले, विरुद्ध संघावर विजय मिळविताना त्याच्या स्वत:च्या विकेटस् किती गेल्या, यांना फारसे महत्त्व उरत नाही. अंतिम धावफलक काय सांगतो आणि सामन्याचा ‘निर्णय’ काय झाला, हेच महत्त्वाचे असते. आपल्या किती विकेट्स पडल्या आणि आपण किती धावा जमविल्या, ही बाब प्रेक्षकांसाठी नव्हे, तर त्या त्या संघांच्या कप्तानांसाठी, खेळाडूंसाठी आणि व्यवस्थापनांसाठी महत्त्वाचा असतो. कारण, या बाबींचे विश्लेषण करुन त्यांना पुढच्या सामन्यासाठी धोरण ठरवायचे असते. जे आपल्या घरांमध्ये बसून किंवा स्टेडियममध्ये जाऊन सामना केवळ पाहतात, त्यांच्यासाठी सामन्यांचा निर्णय महत्त्वाचा असतो. निदान असावयास हवा. समजा, एखाद्या संघाने नऊ गडी राखून सामना जिंकला. तर तुमचा एक फलंदाज बाद झाला, याचा अर्थ तुम्हाला चांगले क्रिकेट खेळता येत नाही, असे म्हणता येईल काय? सशस्त्र संघर्षातही असेच असते. शत्रूची प्रचंड हानी करताना, काही हानी आपलीही होणार, हे गृहित धरावे लागते. ताबडतोब त्या हानीचा हिशेब मागितल्यास आपलीच नाचक्की होते. या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानची हानी प्रचंड प्रमाणात झाली, हे सिद्ध झाले आहे. त्याशिवाय त्या देशाने शस्त्रसंधी करण्याची विनवणी केली नसती. कारण भारताला दीर्घकाळ युद्धात अडकवून त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव करायचा, हे पाकिस्तान आणि त्याचे मित्रदेश यांनी रचलेले कारस्थान होते, हे स्पष्ट आहे. पण त्यांना यात मात म्हणा किंवा माती म्हणा, खावी लागली, हेही स्पष्ट आहे. अशा स्थितीत राजकीय नफा तोट्याचा विचार न करता संयम राखणे हे योग्य ठरते. पण हे भान कित्येकांना असत नाही. भारताच्या सेनादल प्रमुखांनी त्यांच्या विविध मुलाखतींमध्ये नेमके हेच सांगितले आहे. त्यांच्या विधानांचा अर्थ योग्यरित्या समजून घेतला पाहिजे. भारताची हानी झाली असेल, तर ती नेमकी किती, ही बाब योग्यवेळी स्पष्ट होईलच. झाली नसेल, तर तसेही स्पष्ट होईल. काहीवेळा काही विधाने ज्येष्ठ आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून विरुद्ध बाजूला बेसावध ठेवण्यासाठीही संदिग्ध पद्धतीने केली जातात. हा संघर्ष अद्याप थांबलेला नाही. केवळ शस्त्रसंधी झालेली आहे. ती किती काळ टिकते, यावर पुढच्या हालचाली अवलंबून आहेत. पाकिस्तानची प्रवृत्ती पाहता, भारताची पुन्हा कळ काढल्याशिवाय त्याला करमणार नाही. त्यावेळी भारताच्या धोरणाचा पुढचा भाग पहावयास मिळेल. भारत जिंकत असताना शस्त्रसंधी का स्वीकारली? आम्ही असतो तर असे केले नसते. असेही काही जणांचे म्हणणे आहे. पण, हा दावाही योग्य नाही. कारण 2008 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळच्या सत्ताधीशांनी काय केले, हे सर्वांना ज्ञात आहे. तेव्हा, उगाचच दुसऱ्यावर दगड मारण्यात काही अर्थ नसतो, हेच खरे.