‘टोपी नेमकी कुणाची उडाली’
नितीन गडकरी यांनी मिश्किलपणे काढले राजकारण्यांना चिमटे
संदीप कांबळे/पणजी
राज्यात रिंगरोड होणार म्हटल्यावर आता अनेक राज्यकर्त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. रिंगरोडच्या परिसरात जागा खरेदी करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागलेले आहेत. याबाबतची माहिती बहुदा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहचली आहे. म्हणूनच की काय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिखली येथील ‘वेधशाळा मनोऱ्याच्या’ भूमिपूजन सोहळ्यात आपल्या मिश्किल शैलीतील भाषणात राज्यकर्त्यांना घेरले. मंत्री गडकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याने ‘टोपी नेमकी कुणाची उडाली’ अशा राज्यभर खमंग चर्चा सुरू आहे. सामाजिक माध्यमावरही याची चर्चा जोरात सुरू आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याच्या विकासावर भाष्य करताना रिंगरोडच्या बाबतीत रस्त्याची अलायमेंट गुप्त ठेवल्याचे सांगून राज्यकर्त्यांना अगोदर रिंग रोडच्याबाबतीत झोन डिक्लेअर करण्याची सूचना केलेली आहे. वास्तविक गोव्याच्या विकासाच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गंभीर आहेत. त्यामुळेच त्यांनी रिंग रोड परिसरातील जागा लोकप्रतिनिधींनी खरेदी करू नये, याचसाठी अलायमेंट गुप्त ठेवला आहे.
चिखली येथील भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “निश्चितपणे येणाऱ्या काळात सगळ्या रस्त्यांमुळे गोव्याचा विकास होईल. आता जो रिंग रोड होणार आहे तो महाराष्ट्र सीमेवरून डायरेक्ट गोव्याच्या सीमेतून बाहेर जाणार आहे. प्रमोदजी माझी विनंती आहे, त्याची अलायमेंट करण्याच्या आधी तुम्ही अलायमेंट निश्चित करा कारण नेते लोक हुशार आहेत. माझ्याकडे सगळ्या पक्षाचे लोक येतात त्यांना मी म्हणतो, पहिल्यांदा तुमची अलायमेंट दाखवा ते याकरिता की आम्ही रस्ता करायच्या आधी नेते सगळ्या जागा विकत घेतात. गोव्यातल्या नेत्यांना चुकून ‘टोपी फेक’ बसली तर ते मनावर घेऊ नका. मला इकडचे काही माहिती नाहीय. त्यामुळे मी अलायमेंट गुप्त ठेवली आहे. म्हणून ही अलायमेंट दाखवून तुम्ही त्याचदिवशी तो रिंग रोडबाबतचा झोन डिक्लेअर करा आणि एक नवीन गोवा त्या बाजूला तुम्ही सुंदर विकसित करा. तुम्हाला एवढे पैसे मिळतील आणि गोव्याच्या जनतेचा त्यातून एवढा विकास होईल की, मला विश्वास आहे या रस्त्यावरची सर्वच वाहतूक कोंडी दूर होईलच. मी 15 ते 20 हजार कोटी ऊपये खर्च करून रिंगरोड बांधणारा. त्यामुळे त्याचा फायदा गोवा सरकारने घेतला पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. म्हणून जरूर आपण या बाबतीमध्ये विचार करा. निश्चितपणे येणाऱ्या काळात सगळ्या रस्त्यांच्यामुळे गोव्याचा विकास होईल.” मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांना दिलेला हा सल्ला म्हणजे रिंगरोड होणाऱ्या परिसरातील जमिनीवर ज्या राजकारण्यांचा डोळा आहे, त्याच्या जिव्हारी नक्कीच लागले असावे. कारण ज्यावेळी केंद्रीय मंत्री रिंगरोडबाबतच्या भूमिकेविषयी मिश्किलपणे भाष्य करीत होते, त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही आपल्या चेहऱ्यावरील हास्य लपवता आले नाही.