अयोध्येचा बाण कोणाचा छेद घेणार?
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूका सहा महिन्यांवर आल्या असताना अयोध्येतील राम मंदिरातील दक्षिणा चोरीचे भयानक कांड कोणाच्या अंगलट येणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या नसत्या तरच नवल होते. भव्य मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ, मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले होते. त्याच पंतप्रधानांनी या एव्हढ्या गंभीर प्रकरणावर अजून अवाक्षर देखील उच्चारले नाही आहे. यावरून सत्ताधाऱ्यांच्या मनातील भीतीच व्यक्त होत आहे.
ज्याभगवान रामाचे नाव पुढे करून भाजप देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली त्याच्याच मंदिरातील राजरोस चोरी म्हणजे हिंदू भाविकांच्या श्रद्धेवरच आघात होय. अयोध्या मुद्दा इतका पेटला की त्याने निर्माण झालेली राम लहर साऱ्या देशभर विशेषत: उत्तर भारतात पोहोचली. ‘सौगंध राम की खाते हैं, मंदिर वही बनायेंगे’, ‘ढांचा गिरावो बाबर का, तेल लगाओ डाबर का’, अशा घोषणांनी हिंदुज्वर पोहोचवला गेला.
ज्या भाजपला जातीयवादी आणि सांप्रदायिकतावादी म्हणून हिणवले जाऊन वाळीत टाकले गेले होते तोच कालांतराने मुख्य पक्ष झाला. एव्हढेच नव्हे तर आता तो स्वत:ला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून गौरवितो आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिदीच्या विध्वसानंतर देशाच्या राजकारणाने जी पलटी खाल्ली त्याचेच पर्यवसान काँग्रेस रसातळाला जाण्यात झाले आणि भाजपला सत्तेची चावी सापडली. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी पायाचा दगड बनले तर मोदींनी त्यावर भव्य इमारत बांधली. ज्या वाजपेयींनी दोन दशकांपूर्वी ‘परशुरामाची’ भूमिका स्वीकारून अडवाणी हे पुढील राम आणि प्रमोद महाजन यांना ‘लक्ष्मण’ म्हणून संबोधिले होते. पण झाले भलतेच. राजकारण पार बदलले. असो. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे भाजप करता ‘राम’ कसा केंद्रबिंदू आहे.
आता राम मंदिराची धुरा सांभाळणारे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांवरून राजीनामा दिला असला तरी हे वादळ शमण्याची अजिबात चिन्हे नाहीत. जरी त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना अजूनपर्यंत अटक का बरी केली गेलेली नाही? योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या घरांवर अजून बुलडोझर का बरे घातलेला नाही? असे एकानेक प्रश्न विरोधी पक्ष विचारू लागले आहेत. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन, असे काहीसे गैरभाजप पक्षांचे झालेले आहे.
राम मंदिरातील झालेली चोरी म्हणजे श्रद्धेवरीलच डाका होय असा त्यांचा प्रचार सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडत आहे. एका निवडणूकीचा सर्वे करणाऱ्या संस्थेने केलेल्या पाहणीत या चोरीमुळे लोकांमध्ये भयंकर संताप आलेला आहे असा निष्कर्ष काढलेला आहे. मोदींच्या जवळचे समजले जाणारे पंतप्रधान कार्यालयातील माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा हे देखील या प्रकरणात ओढले जाऊ शकतात. मंदिर व्यवस्थापनाच्या तसेच बांधकामाच्या कामात त्यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे, बाबरी मशीद आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्या जवळच्या अधिकारी वर्तुळातील असलेल्या मिश्रा यांनी कारसेवकांवर गोळी झाडण्याचे आदेश दिलेले होते. त्यांना मंदिराची जबाबदारी द्यायलाच नको होती. आता त्यांना नारळ द्या असा प्रचार सुरु झाला आहे.
पंतप्रधान कार्यालयातील संलग्न व्यक्ती तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांचीदेखील याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे कारण जे पाप घडलेले आहे ते अक्षम्य आहे. त्यामुळे चौकशीच्या ससेमिऱ्यातून कोणी सुटू शकत नाही असा विरोधी पक्षांचा तर्क आहे. गेली तीन वर्षे दक्षिणाचोरीचे हे प्रकरण राजरोस सुरु होते असे आरोप करून भाजप विरोधक हे सरकार आणि भाजप इतकी वर्षे झोपली होती का? असा प्रश्न विचारत आहेत. हे प्रकरण हाताळण्यात संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजपमध्ये एक अजब बेबनाव दिसून आला आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे. चंपत राय हा त्यांचा खास माणूस असूनदेखील त्याने राजीनामा देण्यासाठी जेव्हढे आढेवेढे
घेतले, त्यावरून हे दिसून आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरता सर्वोच्च न्यायालयांच्या देखरेखीखाली एक खास तपास पथक नेमले गेले पाहिजे या मागणीचा पाठपुरावा गैरभाजप पक्ष करत आहेत, या साऱ्या प्रकरणाने सर्वात कोण हैराण झाले असेल तर ते अयोध्यावासी. प्रभू रामाच्या मंदिरात असा कसा बरे डाका पडला त्याने ते अस्वस्थ झाले आहेत. अब्रह्मण्यम! अब्रहमण्यम! असा त्यांचा सूर आहे. कोणतेतरी मोठे संकट येणार आहे अशी त्यांची भीती आहे.
झाल्या प्रकरणाचा फायदा उपटण्यासाठी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे आसुसलेले आहेत. आपण सुरु केलेली सारी विकासकामेच भाजप आपल्या नावावर दाखवून त्यांचे श्रेय उपटू पाहत आहे असा त्यांचा नेहमीचा दावा आहे. बदललेल्या परिस्थितीत काँग्रेस स्वत:ला ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या न्यायाने मोठी समजत आहे. या दोन पक्षांची सरतेशेवटी युती होणार आहे पण काँग्रेसकडून आत्ताच थोडे आढेवेढे घेणे सुरु झाले आहे की ज्यामुळे बऱ्यापैकी जागा त्याच्या पदरात पडतील. अशावेळी भाजप समाजवादी पक्षाच्या संसदीय दलात फूट पाडण्याच्या कामाला लागली आहे अशा वावड्या उठत आहेत.
राजकीय वर्तुळातील एक गट मात्र असे मानतो की अयोध्येतील एव्हढे भयानक कांड असो अथवा इतर कोणताही मुद्दा असो त्याचा उत्तरप्रदेशच्या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. या गटाच्या अनुसार भाजपने येन केन प्रकारेण निवडणूक जिंकायचे तंत्र इतके आत्मसात केलेले आहे की साम, दाम, दंड, भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्याला आवरण्याची कोणात हिम्मत नाही. ज्या प्रकारे बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना चांगली मतसंख्या मिळाली तरी त्यांच्या पक्षाचा पालापाचोळा करण्यात आला तद्वतच इतर प्रादेशिक पक्षांचा भाजप खात्मा करणार असा होरा लावला जात आहे.
एव्हढे मोठे कांड होऊनदेखील पंतप्रधान गप्प का आहेत: त्यांनी अजून देशाची जाहीर माफी का बरे मागितली नाही? त्यांच्या आदेशानेच मंदिराचा ट्रस्ट स्थापन झालेला होता आता तेथील झालेल्या कांडाला कोण जबाबदार आहे? असे एकानेक सवाल विरोधकांकडे आहेत आणि येत्या 20 तारखेला सुरु होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा जोराने मांडण्यासाठी त्यांची रणनीती आखली जात आहे. अशामध्येच उत्तर प्रदेशची येती निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावरच लढवली जाईल असे भाजपला जाहीर करावे लागले आहे. गेल्या निवडणूकीत योगी मुख्यमंत्री असूनही त्यांना भाजपने आपला चेहरा घोषित केलेला नव्हता.
संसदेच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीदेखील सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे, ज्या प्रकारे वन संवर्धन मंत्री भूपेन्द्र यादव यांच्या व्यक्तिगत स्टाफ वरील चारी व्यक्तींना तडकाफडकी काढण्यात आले त्याने ‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेचे बारा वाजले आहेत. या धक्कादायक प्रकाराबाबत खुद्द मंत्री महोदय अथवा सरकारने अवाक्षर देखील काढले नसल्याने हे गूढ अजूनच वाढलेले आहे. सरकारला घायाळ करण्यासाठी विरोधकांच्या भात्यात असे बरेच बाण आहेत त्याने येते अधिवेशन गाजणार अशी चिन्हे आहेत.
सुनील गाताडे