For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कॉर्पोरेट क्षेत्र कोणाबरोबर?

06:16 AM Oct 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॉर्पोरेट क्षेत्र कोणाबरोबर
Advertisement

20 वर्षांपूर्वीची गोष्ट. अनिल अंबानी हे समाजवादी पक्षातर्फे राज्यसभेचे सदस्य बनले तेव्हा कॉर्पोरेट तसेच राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. जे धीरूभाई शेकडो खासदार-आमदारांना खिशात ठेवायचे त्यांच्या मुलाने एक साधा खासदार बनणे का बरे पसंत केले? हाच प्रश्न ज्याच्या त्याच्या तोंडी होता. अनिल यांचे पुढील दोन दशकात उद्योगपती म्हणून बारा वाजले. अक्षरश: दिवाळे निघाले. त्याउलट त्याचा मोठा भाऊ मुकेश हा ‘कर लो दुनिया मूठी में’ च्या तालात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती झाला. 

Advertisement

नरेंद्र मोदी यांच्या राजकीय उदयानंतर गौतम अदानी यांच्या औद्योगिक साम्राज्याच्या  झालेल्या अभूतपूर्व भरभराटीने मुकेशभाईंना देखील ईर्षा झाली नसेल असे म्हणता येत नाही. रतन टाटांच्या निधनानंतर टाटा समूहात एक अंतर्गत वादळ उठले असून त्याच्यामागे देखील एक राजकीय हात असण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे, संशय व्यक्त केला जात आहे. देशात सर्वात जास्त प्रतिष्ठा असलेल्या या उद्योग समूहाला खाली खेचण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे असे जाणकारांना वाटू लागले आहे. अशावेळी कॉर्पोरेट क्षेत्र कोणाबरोबर? हा प्रश्न देखील चर्चिला जात आहे.

देशातील वातावरण बदलू लागले आहे. ज्या तडकाफडकी रीतीने पंतप्रधानांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना नारळ दिला त्यातून मोदींच्या नेतृत्वाचे एकीकडे अवमूल्यन झालेले आहे तर दुसरीकडे त्यांची टेफ्लॉन प्रतिमा भंग पावलेली आहे. राजधानीत ‘दुसरा स्वातंत्र्य लढा’ सुरु करण्याच्या आणा शपथा घेण्यात आलेल्या आहेत. त्याअगोदर नवी दिल्ली आणि दिल्ली शहरात देशातून येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. राजधानीची ‘जीवन दायिनी’ समजल्या जाणाऱ्या मेट्रो रेल्वेची 57 स्टेशन्स बंद ठेवण्याचा हुकूम काढण्यात आलेला आहे. जंतर मंतर आणि परिसराचे एका लष्करी छावणीत जणू रूपांतर करण्यात आलेले आहे. मोदी आणि शहा किती घाबरलेले आहेत हेच त्यावरून दिसत आहे असा विरोधकांचा दावा आहे. वादग्रस्त मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जणू गायब झालेले आहेत. एकप्रकारे विरोधकांना एकत्र करण्याचे महान काम त्यांनी केलेले दिसत आहे. या साऱ्या बदलत्या वातावरणात मोदी-शहा यांची सूत्रे सूटत चालली आहेत काय. जहाज बुडू लागले आहे की काय याची सर्वात प्रथम जाणीव ही उंदरांना होत असते. ते काहीही करून जहाजावरुन पळून जाण्याचा बेत सुरु करतात. त्यात असंख्य उंदरांना जलसमाधी देखील भेटते.

Advertisement

उडत्या पाखराचे पंख मोजण्याची कला असलेल्या उद्योगपतींना हे बदल जरा लवकर दिसतात आणि ते आपले ‘दुकान’ कोणत्याही परिस्थितीत सुरळीत चालावे यासाठी हात पाय मारू लागतात. महाकाय टाटा समूहासमोर उभी राहिलेली आव्हानात्मक स्थितीदेखील त्यांना दिसते. सरकारच्या मनात आहे तरी काय याविषयी त्यांच्या मनात शंका माजतात आणि त्याचे दृश्य-अदृश्य परिणाम हळूहळू दिसू लागतात. आता असेच घडत आहे. मुकेशभाईंच्या रिलायन्स समूहाचे खासमखास मानले गेलेले परिमल नाथवानी हे गेली चार टर्म झारखंड अथवा इतर कोणत्या राज्यातून राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात त्यांचा मुलगा धनराज हा उत्तरप्रदेशमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेवर आणला गेला त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना घडलेली ही घटना त्यामुळे जास्तच बोलकी ठरलेली आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळात समाजवादी पक्ष हा एक प्रकारे अमर सिंग यांच्या हातात होता आणि त्यामुळे अनिल यांचे पक्षातील प्रस्थ वाढले होते.

मुकेशभाईंनी समाजवादी पक्षाबरोबर केलेली ही नवीन सलगी म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्राने मोदी आणि भाजपच्या तराजूत आपली सारी अंडी न ठेवता काही अंडी विरोधी पक्षांबरोबर देखील ठेवायचे ठरवलेले दिसत आहे याचे निदर्शक आहे. मोदी पंतप्रधान असताना गेली 12 वर्षे असे काही कॉर्पोरेट क्षेत्राला वाटले नव्हते. याचा अर्थ भाजपच्या पुढचे राजकारण बघणे कॉर्पोरेट क्षेत्राने सुरु केलेले आहे असा होतो. ते किती बरोबर अथवा चूक ते येणारा काळ दाखवेल. अंबानी हे भारतातील ‘बॉस’ आहेत असे उपरोधिक उदगार गेल्याच आठवड्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी काढून आपल्या स्टारलिंक या उपग्रह दळणवळण सेवेला देशात प्रवेश करण्यासाठी तेच विरोध करत आहेत असे म्हणाले आहेत. एकाच घावात मोदी आणि अंबानी यांना त्यांनी जबाबदार धरल्याचे दिसत आहे. ‘अहो मस्कसाहेब याचा अर्थ तुम्ही दुसरा बघितलेलाच नाही’, अशा अर्थाचे राहुल गांधी यांचे विधान म्हणजे अदानी यांचे मोदी सरकारातील प्रस्थ तुम्ही ओळखलेलेच नाही असा होतो. सोशल मीडियावरील त्यांच्या नव्या पोस्टमध्ये तर मस्क यांनी मुकेशभाईंना ‘भारताचे पंतप्रधान अंबानी’ असे संबोधिले आहे. मोदीकाळात अदानी आणि अंबानी यांचे महत्त्व किती वाढलेले आहे त्याचेच हे प्रतिक होय.

काँग्रेससारखा विरोधी पक्ष देखील याच सुमारास आपल्या वागण्यात बदल करू लागला आहे हे लक्षणीय आहे. ‘मोदी यांचे बगलबच्चे म्हणजे अदानी आणि अंबानी’ हा प्रचार राहुल गांधींनी थोडा बदलवलेला आहे. आता त्यातून अंबानी यांचे नाव हळूच गायब झालेले आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी अनंत अंबानी यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्याकरता मुकेशभाई हे जातीने 10 जन पथला गेले होते आणि ती बातमी चांगली छापली जाईल याची तजवीज देखील केली गेली होती. आजच्या घडीला अंबानी हे देशातील मीडिया मालकांपैकी एक प्रमुख आहेत. कालपर्यंत अदानी आणि अंबानी यांना एकाच तराजूत तोलणाऱ्या काँग्रेसला आलेला हा सूज्ञपणा भावी काळाचे कितपत निदर्शक आहे हे पुढील सहा महिन्यात दिसून येईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची येती निवडणूक परत ‘80:20’ च्या धर्तीवर म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणावरच होईल असे छातीठोकपणे सांगितले असले तरी अखिलेश यादव यांना हलक्याने घेणे योग्य होणार नाही असे भाजपमधील एक गटच सांगत आहे. निवडणूक चुरशीने लढवायची असेल तर उद्योगपती बरोबर पाहिजेत हे अखिलेश यांनी ओळखलेले दिसत आहे.

या लढाईत मोदी आपल्याबरोबरच राहावेत आणि त्यांनी घातपात करू नये यासाठी पंतप्रधानच आपले नेता आहेत असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भासवत आहेत. मोदींना खुश करण्यासाठी योगी यांनी नोएडा येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले आहे. योगी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तर मोदींची तळी अस्थिर बनेल असे राजकीय जाणकारांना वाटते. उद्योगपती मंडळी ही कधीही एका राजकीय पक्षाची नसतात. त्यांचे हितसंबंध कोण सांभाळते त्यानुसार त्यांचे मायबाप बदलत असतात.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.