4 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर घाऊक महागाई
मार्च महिन्यात घाऊक महागाई दर 2.05 टक्क्यांवर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्च महिन्यात घाऊक महागाई दर कमी होत 2.05 टक्क्यांवर आला आहे. हे प्रमाण 4 महिन्यांमधील नीचांकी ठरले आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात महागाई दर 1.89 टक्के राहिला होता. तर फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाई दर 2.38 टक्के होता.
दैनंदिन गरजांच्या सामग्रीच्या किमती कमी झाल्याने घाऊक महागाई दरात घट झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी यासंबंधीचे आकडे जारी केले आहेत. घाऊक महागाईमध्ये निर्मित उत्पादनांची हिस्सेदारी 63.75 टक्के, प्रायमरी आर्टिकल्स म्हणजेच अन्नधान्याची हिस्सेदारी 22.65 टक्के आणि इंधन तसेच ऊर्जेची हिस्सेदारी 13.15 टक्के आहे. निर्मित उत्पादनांच्या किमती कमी अधिक होण्याचा सर्वाधिक प्रभाव घाऊक महागाईवर होत असतो.
दैनंदिन गरजांच्या सामग्रीचा महागाई दर 2.81 टक्क्यांवरून कमी होत 0.76 टक्के झाला आहे. तर अन्नधान्याचा महागाई दर 5.94 टक्क्यांवरुन कमी होत 4.66 टक्के झाला आहे. इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर उणे 0.71 टक्क्यांवरून वाढत 0.20 टक्के राहिला. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर 2.86 टक्क्यांवरून वाढत 3.07 टक्के राहिला आहे.
घाऊक महागाई दर दीर्घकाळापर्यंत वाढत राहिल्यास बहुतांश उत्पादन क्षेत्रावर याचा प्रतिकूल प्रभाव पडतो. जर घाऊक महागाई दर अधिक काळापर्यंत उंच स्तरावर राहिले तर उत्पादक याचा भार ग्राहकांवर टाकत असतात. सरकार केवळ कराच्या माध्यमातून घाऊक महागाई दर नियंत्रित करू शकते.
किरकोळ महागाई दरातही घट, 6 वर्षांच्या नीचांकी स्तरावर
किरकोळ महागाई दर फेब्रुवारीमधील 3.61 टक्क्यांच्या तुलनेत मार्च महिन्यात किरकोळ स्वरुपात कमी होत 3.34 टक्क्यांवर आला आहे. मंगळवार जारी शासकीय आकडेवारीत याची पुष्टी करण्यात आली आहे. भाज्या आणि प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाई दर 6 वर्षांचा नीचांकी स्तर 3.34 टक्क्यांवर आला आहे.
किरकोळ महागाई दर मागील वर्षी मार्च महिन्यात 4.85 टक्के राहिला होता. मार्च 2025 मध्ये किरकोळ महागाई दर ऑगस्ट 2019 नंतर सर्वात कमी राहिला आहे. त्यावेळी हा दर 3.28 टक्के इतका होता. यंदाच्या मार्च महिन्यात किरकोळ खाद्य महागाई दर 2.69 टक्के राहिला.