Gokul मध्ये सहकारी आघाडी की पक्षीय राजकारण?, महायुतीला मोट बांधण्यात यश मिळणार?
ज्यांच्याकडे गोकुळची सत्ता, त्यांचीच जिह्याच्या राजकारणावर पकड असल्याचे आजतागायतचे चित्र
By : कृष्णात चौगले
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी वर्षातील जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या पूर्वार्धात ही निवडणूक होणार आहे. तरी डिसेंबर महिन्यातच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ठरावांची जुळवाजुळव होणार आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून पुन्हा सहकार आघाडी माध्यमातून लढविण्यासाठी आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि विनय कोरे आदी नेत्यांचे प्रयत्न राहतील. पण ‘महायुती’ च्या झेंड्याखालीच गोकुळची निवडणूक लढवावी, यासाठी विरोधी महाडिक गटाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी प्रसंगी राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघ म्हणजे जिह्यातील प्रमुख आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्र आहे. ज्यांच्याकडे गोकुळची सत्ता आहे, त्यांचीच जिह्याच्या राजकारणावर पकड असल्याचे आजतागायतचे चित्र आहे. त्यामुळेच माजी आमदार महोदवराव महाडिक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिह्यावर राज्य केले. महाडिक गटाचे हे शक्तिस्थान हस्तगत करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी काही वर्षांपूर्वीच चंग बांधला होता. त्यानुसार गोकुळच्या 2016 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार पाटील यांनी विरोधी आघाडी तयार केली.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊन रणजितसिंह पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेला शब्द पाळला होता. पण त्यानंतर मल्टिस्टेट विरोधातील लढाईत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत मंत्री मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आदी तत्कालीन महाडिक विरोधी यंत्रणा एकवटली. गोकुळ बचाव समितीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या विविध निर्णयांविरोधात त्यावेळी आवाज उठवला. प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत हा लढा जिवंत राहिल्यामुळे 2021 साली झालेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीला त्याचा मोठा फायदा झाला. ‘गोकुळ’ साठी बांधलेली सहकार आघाडीची ही मोट गेल्या चार वर्षात कायम राहिली आहे.
महायुतीची मोट बांधण्यास यश मिळणार काय?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिह्यातील सर्व दहा मतदारसंघात महायुतीचे आमदार झाले असून महाविकास आघाडीचे पानिपत झाले. जिह्यात महायुतीचे प्राबल्य असताना मग गोकुळची निवडणूक महायुतीच्या बॅनरखाली का लढवू नये? असे मत खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे.
ही बाब त्यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर देखील घातली आहे. त्यामुळे भविष्यात महायुतीची प्रबळ मोट बांधली जाणार की सहकार आघाडीच वरचढ ठरणार हे आगामी काळात समजणार आहे. मे महिन्यात होणाऱ्या गोकुळ अध्यक्ष फेरबदलाच्या प्रक्रियेवरही आगामी निवडणुकीच्या राजकारणाचा प्रभाव राहणार आहे.
सत्ताधारी सहकार आघाडी कायम राहण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘गोकुळ’ पेट्रोलपंपाच्या उद्घाटनादरम्यान चेअरमन अरुण डोंगळे यांनी आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचा कारभार चांगला चालला असून आगामी कालावधीतही या दोघांनी गोकुळची धुरा सांभाळावी, असे नमूद केले होते. अरुण डोंगळे, विश्वास पाटील या दोन संचालकांकडे ठरावधारकांची मोठी संख्या आहे. सध्या डोंगळे यांच्यावर मंत्री मुश्रीफ यांचा प्रभाव आहे. तर विश्वास पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे नेतृत्व मान्य करतात. परिणामी गोकुळच्या आगामी निवडणुकीत पुन्हा सहकार आघाडी होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरेंची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच महाडिक यांच्याकडून प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, चंद्रदीप नरके आदी नेत्यांना एकत्र करून गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली कशी लढविता येईल यासाठी चाचपणी सुरु आहे.
1200 हून अधिक नवीन दूध संस्था सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर
गतनिवडणुकीत निर्विवाद यश मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच सत्ताधारी संचालक आणि नेत्यांनी पुढील निवडणुकीचे नियोजन सुरु केले. पहिल्या तीन वर्षात ज्या नवीन संस्था होतील, त्यांनाच पुढील निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळणार असल्यामुळे सन 2023 पर्यंत सत्ताधाऱ्यांकडून सुमारे 1200 हून अधिक नवीन संस्थांची नोंदणी केली.
त्यापैकी निवडणुकीनंतर अवघ्या 14 महिन्यातच जिह्यात 477 नवीन प्राथमिक दूध संस्था झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात एकूण 1200 पेक्षा जास्त संस्थांची नोंदणी झाली. गतनिवडणुकीत सभासद संख्या 3 हजार 764 इतकी होती. वाढीव सभासद संख्येमुळे पुढील निवडणुकीपर्यंत ही संख्या सुमारे 5 हजारांच्या घरात जाणार आहे. ही वाढीव सभासद संख्या सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणार असून विरोधकांसाठी अडचणीची ठरणार आहे.
विरोधी महाडिक गटाकडून महायुतीची मोट बांधण्याची तयारी सुरु
- . मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची प्रबळ सहकार आघाडी
- . ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु
- . ‘चेअरमन’ फेरबदलाला आगामी निवडणुकीची किनार