नरकासुरांचे सांगाडे उचलायचे कोणी?
पालिका, पंचायती सुस्त : वाहनचालकांना धोका
पणजी : संपूर्ण गोव्यातील शहरांमध्ये तसेच गावागावांनी नरकासूर जाळून दिवाळी साजरी करण्यात आली, परंतु, नरकासुरांचे सांगाडे अनेक ठिकाणी रस्त्याच्याकडेला पडून आहेत, ते उचलायचे कोणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी पहाटे शेकड्यांनी नरकासूर जाळण्यात आले परंतु त्यांचे सांगाडे, राख व इतर साहित्य रस्त्याशेजारी पडलेले आहे. त्यास कोणीच हात लावलेला दिसत नाही. खरे म्हणजे संबंधित क्षेत्रातील पंचायती, पालिका यांची ती जबाबदारी आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. नरकासूर तयार करताना लोखंड, खिळे, तार अशा विविध साहित्याचा वापर करतात. नरकासूर जाळल्यानंतर तारा, खिळे व इतर साहित्य रस्त्यावरच पडलेले असते. आताही अनेक ठिकाणी ते साहित्य तसेच पडलेले आहे. त्याला अद्यापही कोणी हात लावलेला नाही. ती जबाबदारी कोणाची? असा प्रश्न तेथून जाणारे येणारे वाहनचालक विचारत आहेत. त्याचा त्रास रस्त्याने जाणाऱ्या - येणाऱ्या लोकांना होतो आहे. वाहनचालकांनाही अडचणी येत असून त्याचा कोणालाही धोका होऊ शकतो. म्हणून ते सांगाडे काढण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारने त्याची दखल घेऊन पंचायती, पालिकांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.