गोकुळच्या विजयाचा चक्रव्यूह कोण भेदणार ?
इकबाल रेठरेकर
कोल्हापूर: जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. जागावाटपाचा तिढा सुटून महायुतीचे उमेदवार निश्चित झाले असले, तरी या प्रक्रियेत काही इच्छुकांचा पत्ता कट झाला, तर काही राजकीय गटांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जागावाटपातून कोणाचे राजकीय वजन वाढले, कोणाच्या महत्त्वाकाक्षांना लगाम बसला आणि कोणाला सत्तेच्या समीकरणात दुय्यम स्थान मिळाले, याची चर्चा रंगू लागली आहे.
उमेदवारीच्या गणितातून आकाराला आलेली ही नवी समीकरणे आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी निवडणुकीत कोणते वळण घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता प्रचाराच्या रणांगणात या राजकीय पेचांना कोण कशी मात देणार आणि गोकुळच्या सत्तेचा विजयमार्ग कोण शोधणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या चारपक्षांनी एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी जागावाटपात प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षांना मुरड घालावी लागली. महायुतीकडे तीन मंत्री, खासदार आणि अनेक आमदारांचे बळ आहे. मात्र, या राजकीय ताकदीचे प्रतिबिंब उमेदवारीच्या अंतिम यादीत कितपत उमटले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महायुतीच्या जागावाटपातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांना उमेदवारी न मिळणे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या वजनदार नेत्यालाही स्वतःच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला उमेदवारी मिळवून देता आली नाही. नाथाजी पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेली 'निष्ठा हरली' ही भावना भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेचे प्रतीक ठरली आहे. तर दुसरीकडे काही माजी आमदार, राजकीय नेत्यांचे वारसदार आणि कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या संधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनाही जागावाटपात अपेक्षित यश मिळाले नसल्याची चर्चा आहे. दीपक भरमू पाटील यांच्या रूपाने एकच जागा मिळाल्याने त्यांच्या गटाच्या वाट्याला मर्यादित प्रतिनिधित्व आले.
शिवसेनेच्या वाट्याला सात जागा आल्या असल्या, तरी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटांच्या प्रतिनिधित्वाबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाला मिळालेल्या चार जागांचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकीकडे महायुतीसमोर जागावाटपानंतरची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे समविचारी आघाडीला या नाराजीचा फायदा उठवण्याची संधी आहे.
सतेज पाटील यांच्यासमोर नाराजांना जोडण्याची संधी
महायुतीतील जागावाटपावरून नाराजीचे सूर उमटत असताना आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची मोट बांधली आहे. महायुतीतील नाराज गटांना आपल्याकडे वळवण्यात समविचारी आघाडीला कितपत यश मिळते, हे या निवडणुकीतील महत्त्वाचे समीकरण असेल. महायुतीकडे सत्तेचे आणि संख्याबळाचे पाठबळ असले, तरी स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेत्यांचे व्यक्तिगत प्रभावक्षेत्र आणि ठरावधारकांशी असलेले संबंध हे घटकही तितकेच निर्णायक ठरणार आहेत.
'मनपा त्रिकुटाच्या राजकीय वजनाची चर्चा
एकेकाळी गोकुळच्या राजकारणावर प्रभाव राखणाऱ्या महाडिक, नरके आणि पाटील या 'मनपा' त्रिकुटाच्या ताकदीची चर्चा यंदाच्या निवडणुकीत सुरु आहे. स्व. पी. एन. पाटील गटाला राहुल पाटील, अरुण नरके गटाला डॉ. चेतन नरके, तर महाडिक गटाला शौमिका महाडिक यांच्या रूपाने प्रत्येकी एक जागा मिळाली. जुन्या राजकीय समीकरणांमध्ये या त्रिकुटाचे मोठे वजन होते. मात्र, यंदाच्या जागावाटपात या गटांना मिळालेले मर्यादित प्रतिनिधित्व पाहता, गोकुळच्या राजकारणातील प्रभावाची समीकरणे बदलत असल्याची चर्चा आहे.
