इंडिया आघाडीसमोर मोदींना कोण पर्याय असेल, हाच विषय आमच्यासमोर : शरद पवार
सातारा प्रतिनिधी
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. आज दुपारपर्यंतच्या चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत आपला झेंडा फडकवला आहे . मध्य प्रदेशची सत्ता राखत राजस्थान आणि छत्तीसगडची सत्ता घेण्यात भाजपला यश आलेलं आहे. मात्र हा विजय ईव्हीएमचा विजय असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. याविषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी ४ राज्यांपैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसतोय. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. पण सध्या इंडिया आघाडीसमोर मोदींना कोण पर्याय असेल, हाच विषय आमच्यासमोर आहे,असं पवार म्हणाले आहेत. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत.
"राजस्थानमध्ये पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तिथे नवीन लोकांना सत्ता द्यावी, असा जनतेचा मूड होता. दुसरीकडे तेलंगणात सत्ताधाऱ्यांना साजेशाच मूड असतो, असं नेहमी दिसतं. पण यंदा राहुल गांधी यांची हैदरबादमध्ये सभा झाली, तिथला गर्दीचा उच्चांक बघून आम्हा लोकांची खात्री झाली की यंदा तेलंगणात सत्ताबदल होईल,असे शरद पवार म्हणाले.
भाजपच्या विजयानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप केला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. खरी माहिती मिळेपर्यंत ईव्हीएमला दोष देणार नाही". काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे असा निकाल लागला आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "खरं सांगायचं तर निवडणूक झालेल्या एकाही राज्यामध्ये मी गेलेलो नाही. त्यामुळे मला माहिती नाही"."चार राज्यांच्या निकालाचा इंडिया आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण विधानसभा आणि लोकसभेचा जनतेचा मूड वेगळा असतो. निकालानंतर उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी आम्ही इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्याठिकाणी आम्ही या सगळ्या गोष्टींचं परिमार्जन करू", असंही शरद पवार यांनी सांगितलं.