Satara News | सातारा-सांगली विधान परिषद: "भाजपला गॅसवर ठेवता का?" शंभूराज देसाईंच्या 'त्या' उत्तराने राजकीय वर्तुळात खळबळ!
सातारा : सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणूकीत मतदान कोणाला करायचे याचे सर्वाधिकार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आले असून ते जे आदेश देतील त्या उमेदवारास आम्ही मतदान करु अशी एकमुखी मागणी शिवसेनेच्या बैठकीत मतदारांनी केली. तसा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवणार आहोत, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एका ठिकाणी गोपनीय ठिकाणई शिवसेना सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, शरद कणसे, एकनाथ ओंबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांनी आपल्या भावना मांडताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी जो प्रकार घडला त्यामुळे मतदान कोणाला करायचे याचे सर्व अधिकार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहेत. त्यांनीच आदेश द्यावेत, कोणाला मतदान करावे, त्यानुसार आम्ही मतदान करु अशी मते मांडली. तब्बल तासभर ही चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीनंतरपत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, या बैठकीला नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते.
त्यांनी आपल्या भावना मांडल्या असून शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाबाहेर कोणी नाही, असे सांगून सर्व सदस्यांच्या भावना मी आणि कणसे साहेब दोघे मिळून शिंदेसाहेबांकडे पोहचवणार आहोत, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. त्याचबरोबर ते म्हणाले, भाजपा बहुमताच्या जवळ आहे, त्यांना गॅसवर ठेवता का?, असे विचारले असता त्यांच्या विरुद्ध बोलून उपयोग नाही, आम्ही काळजीपूर्वक पाऊल टाकतोय, असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेतल्या वादावरील प्रश्नावर ते म्हणाले, वाद मिटलेला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या कमिटीला निर्णय दिलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.