योगनिष्णात कुणाला म्हणावे?
अध्याय सहावा
साधक योगनिष्णात कसा होतो ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, कोणत्याही मोठ्या साध्याची सुरवात ही छोटीच असते, त्याप्रमाणे योगमार्गाची सुरवात ही निरपेक्षपणे केलेल्या कर्मातून होते. कर्ममार्गाने जाणारा, यमनियमरूपी टप्प्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो. ज्ञानेंद्रियांवर त्याचा पूर्ण ताबा आला की, तो प्रत्याहाररुपी कडा चढून जातो. इच्छा होणे बंद झाल्याने ब्रह्मैक्य होऊन त्याची समाधी लागते. तो विषय आणि कर्मांचे ठिकाणी आसक्त होत नसल्याने त्याच्या कर्मफलाच्या इच्छेचा त्याग होऊन तो योगारूढ होतो. सर्वसामान्य माणसाचे मन प्राप्त झालेल्या सुखदु:खामुळे हेलकावे खात असते परंतु योगारूढ माणसाचे मनाला सुखदु:खांनी धक्के दिले तरी त्याचे निक्रिय झालेले मन जागे होत नाही. विषय अगदी जवळ आले तरी ते काय आहेत हे त्याला आठवत नाहीत. तो देहधारी असल्याने जागा असल्याप्रमाणे सर्व व्यवहार करीत असला तरी निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य असतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात होय.
हे सर्व ऐकून अर्जुनाने विचारले, कृष्णा, तुझे हे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. त्याला अशी ही योग्यता कोण मिळवून देते ते मला सांग? अर्जुनाच्या प्रश्नाचे उतर देताना पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, ही योग्यता त्याने स्वत: मिळवलेली असते. आपला उद्धार आपणच करायचा असतो ह्यावर त्याचा ठाम विश्वास असतो. माणसाने आत्म्याला कधी खचू देऊ नये कारण तोच आपला बंधू आणि शत्रू दोन्ही असतो.
उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी । आत्मा चि आपुला बंधु आत्मा चि रिपु आपुला ।। 5 ।।
देवांनी माणसाला चांगले काय, वाईट काय हे ठरवण्याची बुद्धी दिलेली आहे व त्यानुसार कसे वागावे हे तो ठरवू शकतो. जीवनात प्रारब्धानुसार कर्मे, प्रसंग वाट्याला येत असल्याने ती कोणती कर्मे करावी लागतील किंवा त्याच्यावर कोणते प्रसंग ओढवतील हे जरी माणसाला माहीत नसले तरी त्या त्या प्रसंगी कसे वागावे हे तो ठेवू शकतो. चांगले, वाईट हे जरी मनुष्य विवेकाने ठरवू शकत असला तरी स्वार्थ अडवा येत असल्याने मनुष्य चांगले वागेलच असे सांगता येत नाही. मात्र ज्याला स्वत:चा उद्धार करून घ्यायचा आहे तो परिणामांची तमा न बाळगता चांगलेच वागतो. त्यात त्याचे व्यावहारिक नुकसानही होऊ शकते, समाजाची निंदानालस्ती सोसावी लागते. ज्याला स्वार्थ साधायचा असतो तो मात्र वाईट वागून हवे ते मिळत असेल तर त्याप्रमाणे वागायला हयगय करत नाही. अर्थातच असा मनुष्य योगी होऊ शकत नसल्याने भगवंताशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना योगी होऊन आत्म्याचा उद्धार करून घ्यायची योग्यता आपली आपण मिळवायची असते. ज्याला स्वत:चा उद्धार करून घ्यायचा आहे तो परिणामांची तमा न बाळगता चांगलेच वागतो. ज्याला स्वार्थ साधायचा असतो तो मात्र वाईट वागून हवे ते मिळत असेल तर त्याप्रमाणे वागायला हयगय करत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, जो कठीणप्रसंगी नितीन्यायाने वागतो तो स्वत:चा उद्धार करून घेतो. असे वागत असताना त्याच्या वागणुकीमुळे समाज त्याला वेड्यात काढतो. कारण भगवंताच्या सांगण्यातले मर्म त्यांना समजलेले नसते. ते समजून त्यानुसार वागणारे फार थोडे म्हणजे जवळजवळ नाहीतच.