For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नेमक नडलं कोण?

06:34 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात  नेमक नडलं कोण
Advertisement

मल्लांचा संयम सुटला की पंचांचा निर्णय चुकला? राज्यभरातून आरोप प्रत्यारोपांचा धुरळा

Advertisement

फिरोज मुलाणी/  औंध

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रविवारी सायंकाळी अंतिम फेरीच्या लढतीत झालेल्या वादामुळे मोठा गदारोळ झाला होता. कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या वादामुळे आरोप प्रत्यारोपांचा धुरळा दिवसभर उडत असल्याचे दिसून आले त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नेमकं चुकलं कोण? याचे कोडे कुस्ती शौकिनांना पडले आहे.

Advertisement

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेऊन शिवराजने हुज्जत घातली. राग अनावर झाल्यामुळे मारहाणीपर्यंत मजल गेली. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत देखील महेंद्रने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मैदान सोडले, या संपूर्ण प्रकरणामुळे कुस्ती क्षेत्र ढवळून निघाले आहे. अनेकांनी पैलवानांच्या मागणीनुसार पंचांनी व्हिडिओ का दाखवला नाही याबाबत जागतिक कुस्ती संघटनेचा नियम काय सांगतो. भारतीय कुस्ती महासंघ हा जागतिक कुस्ती महासंघाचे संलग्न आहे. संपूर्ण स्पर्धा ही जागतिक कुस्ती संघटनेने बनवलेल्या नियमानुसार चालते आणि जागतिक कुस्ती महासंघाच्या आर्टिकल क्रमांक 31 नुसार आखाड्यात कुस्ती चितपट झाली असेल आणि याबाबत मुख्य पंच, दोन साईड पंच यांचे एकमत झाले तर त्या निर्णयाविरोधात मल्लाचे चॅलेंज स्वीकारले जात नाही. कालच्या स्पर्धेत देखील शिवराज चितपट झाल्याचे तीन पंचांचे एकमत झाले होते. शिवराजने चॅलेंज फेकले मात्र पंचाचे एकमत असल्याने जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार त्याचे चॅलेंज स्वीकारण्यात स्वीकारण्यात आले नसल्याचे कुस्ती क्षेत्रातील जाणकार पंचांनी सांगितले.

राज्यभरातून पडसाद

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे एकमेकांविरूद्ध भिडले. या सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. या लढतीचा निर्णय अवघ्या 40 सेकंदात झाला आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळ विजयी झाल्याचं घोषित केले. यानंतर शिवराज राक्षेने पंचांशी हुज्जत घातली. यानंतर शिवराजवर कुस्तीगीर संघाने 3 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान या सर्व प्रकराचे पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. कुस्तीत राजकारण शिरतंय असे म्हणत अर्जुनवीर काकासाहेब पवार यांनी कुस्तीगीर संघावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लाथ काय, पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरीतील या जोरदार प्रकारानंतर आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी देखील कुस्तीत हे कुठलं राजकारण शिरलंय. जे खरोखरच ताकदीचे आणि मेहनतीने पुढे आलेले पैलवान आहेत; त्यांना राजकारण करून मागे ढकलण्याचे काम सुरु असल्याची टीका केली आहे.

शिवराज गुद्यावर का आला?

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी विजेता होण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. या स्पर्धेत तो तयारीनिशी उतरला होता मात्र अंतिम फेरीत चितपट दिलेल्या निकालावर तो समाधानी दिसत नव्हता. पंचांच्या निर्णयाबद्दल आक्षेप घेऊन रिह्यू दाखवावा असा तगादा त्याने लावला होता. पंचानी दिलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे माझे आयुष्य पणाला लागले आहे. वर्षाची तपश्चर्या क्षणात मातीमोल होणार असल्याने उद्विग्न झालेला शिवराज मुद्यावरुन गुद्यावर आला असल्याची भावना त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

पंचांचा दबाव वाढला

संपूर्ण स्पर्धेचे सुखाणू पंचांच्या हातात असते स्पर्धा पुढे नेण्याचे काम पंच करत असतात. जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार पंच न्याय देण्याचे काम करतात. कालच्या घटनेत देखील पंचांना मारहाण झाल्याचा धक्का इतर पंचांना बसला होता त्यामुळे त्यांनी मारहाण करणारे पैलवानावर गुन्हे दाखल करण्यासाठी संघटनेवर दबाव वाढवला होता. पंचांनी न्यायदानाचे कामच बंद केले तर स्पर्धा पार कशा? हा संघटनेपुढे प्रश्न निर्माण झाला होता त्यानुसार संघटनेने निलंबनाचे हत्यार उपसले. पंचानी जागतिक कुस्ती संघटनेच्या बदलत्या नियमांचा अभ्यास करावा.करून संघटनेच्या हस्तक्षेपाला बळी न पडता निपक्षपातीपणे काम केले पाहिजे असे मत मल्लांनी व्यक्त केले.

जागतिक कुस्ती संघटनेचा नियम काय सांगतो

भारतीय कुस्ती महासंघ हा जागतिक कुस्ती महासंघाचे संलग्न आहे. संपूर्ण स्पर्धा ही जागतिक कुस्ती संघटनेने बनवलेल्या नियमानुसार चालते. आणि जागतिक कुस्ती महासंघाच्या आर्टिकल क्रमांक 31 नुसार आखाड्यात कुस्ती चितपट झाले असेल आणि याबाबत मुख्य पंचानी दोन साईड पंच यांचे एकमत झाले तर त्या निर्णयाविरोधात मलाच चॅलेंज स्वीकारले जात नाही. कालच्या स्पर्धेत देखील शिवराज चितपट झाल्याचे तीन पंचांचे एकमत झाले होते. शिवराजने चॅलेंज फेकले मात्र पंचाचे एकमत असल्याने जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार त्याचे चॅलेंज स्वीकारण्यात स्वीकारण्यात आले नाही.

तर एक कोटीचे बक्षीस देऊ, शिवराजच्या प्रशिक्षकांचे जाहीर आव्हान

शिवराजचा एकच खांदा खाली टेकला होता. त्यामुळे त्या लढतीचा व्हीडीओ दाखवण्याचा आमचा आग्रह होता, पण तो फेटाळला गेला, असा दावा शिवराजचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी केला. या कुस्तीचा व्हीडीओ देशाच्या कुस्ती संघटनेकडे व आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडे पाठवला जावा, त्यांनी शिवराज हरल्याचे स्पष्ट केले तर मी 1 कोटी देण्यास तयार आहे, असे आव्हानही पोंगल यांनी दिले.

अन्याय झाला तर कोणता पैलवान शांत बसेल

अन्याय झाल्यानंतर कोणता पैलवान शांत बसेल, त्यामागे वर्षभराची मेहनत आहे. त्यानंतर तो पण पंचांना काहीतरी बोलेलच ना. पैलवान काही इतका वेडा नाही, उठ सुट कोणालाही उठून बोलेल किंवा मारेल. पंच जर तशी चुकी करत असतील तर त्यानुसार पैलवान देखील त्यांना बोलणार. गरीब कुटुंबातील पैलवानावर अन्याय होतो, त्याला कोणी वाचा फोडत नाही. त्यामुळे पैलवानांचे नुकसान होत आहे. पंच सहज बोलून जातात. पण, यामागे मोठं नुकसान होतं. काल जर त्यांनी व्हिडिओ दाखवून सगळ्या गोष्टींचा निवारण केले असते, तर ही गोष्ट वाढली नसती. ज्याप्रमाणे पैलवानांवर कारवाई होते, त्याप्रमाणे पंचांवर देखील कारवाई केली पाहिजे.

शिवराज राक्षे, डबल महाराष्ट्र केसरी

पराजय स्वीकारण्याची ताकद हवी

मी पंचांच्या निर्णयावर काही बोलणार नाही. निकाल सर्वांनी पाहिला आहे. मागील वषी माझ्यावर अन्याय झाला, पण मी संयम ठेवला आणि मेहनतीच्या जोरावर यंदा विजय मिळवला. पण, कुस्तीपटूमध्ये पराजय स्वीकारण्याची ताकद हवी.

यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ

पंच दोषी आढळले तर कारवाई करु

स्पर्धेतील 105 पंचांनी आंदोलन करीत शिवराज आणि महेंद्रवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. दोघांचेही करिअर डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने गुन्हे दाखल न करता त्यांच्यावर तीन वर्षे बंदी घातली आहे. शिवराजने पंचावर देखील कारवाईची मागणी केली आहे. शिवराजचा पंचावर आक्षेप असेल तर तसा अर्ज त्याने कुस्तीकर संघाकडे करावा. अर्ज मिळाल्यानंतर स्पर्धेतील कुस्तीच्या संपूर्ण व्हिडिओची शहानिशा करून साईड पंच मुख्य पंच तर दोषी आढळले तर पंचावर देखील कारवाई करण्यात येईल.

संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

पैलवानांचे करीयर डावावर लावू नका

महाराष्ट्रातील कुस्ती वाढली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र पदकापासून मागे आहे यासाठी पैलवान घडला पाहिजे. संघटनेने कुस्तीत भेदभाव करू नये, पैलवान कुठल्या तालमीचा आहे याबाबत आकसाने न पाहता तो महाराष्ट्राचा पैलवान आहे या भावनेने पाहिले पाहिजे. संघटनेतला वाद कुस्तीत आणून पैलवानाचे करिअर डावावर लावणे चुकीचे ठरेल. पैलवानाने न्याय मागणे चुकीचे नाही. त्याची उद्विग्नता समजून घेतली पाहिजे निलंबन करणे योग्य ठरणार नाही.

अर्जूनवीर काकासाहेब पवार, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे

Advertisement
Tags :

.