For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंद्राला जे अशक्य आहे ते भगवंताची निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांना साध्य होते

06:49 AM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंद्राला जे अशक्य आहे ते भगवंताची निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांना साध्य होते
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, ब्रह्मलोकासकट सर्व लोकांचे प्राणी पुनर्जन्म पावणारे आहेत परंतु माझ्या वैकुंठलोकापर्यंत जे येतात त्यांना पुनर्जन्म मिळत नाही. या अर्थाचा ब्रह्मादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा। माझी भेट घडे तेंव्हा जन्मणे मग खुंटले।। 16 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार वैकुंठलोक हा सगळ्यात श्रेष्ठ असून त्याखाली इतर लोक येतात. वैकुंठलोक सोडून इतर कोणत्याही लोकात पोहोचलेला मनुष्य त्याचा पुण्यासाठा संपला की, त्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. फक्त जे भगवंताची निरपेक्ष भक्ती करतात, त्यांना वैकुंठलोक प्राप्त होतो. त्यांच्या मृत्यूसमयी त्यांनी न बोलावताही भगवंत स्वत: त्याठिकाणी हजर असतात, त्यांच्या मृत्यूसमयीच्या वेदना हरण करतात, त्यांना त्यांच्या देहाचा मोह होऊ नये म्हणून त्यांचे नामस्मरण अंत्यसमयी सतत कसे चालू राहील याची काळजी घेतात आणि त्यांनी देह ठेवल्यावर त्यांना आपल्या स्वरुपात सामावून घेऊन त्यांचा पुनर्जन्म होणार नाही याची खात्री देतात.

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सर्व जगाचा माथा आणि कायम टिकणाऱ्या सर्व पदार्थांमध्ये अग्रगण्य असा सत्यलोक जरी एखाद्याला प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्ममरणांचे फेरे चुकत नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागे झाल्यानंतर स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे ईश्वरस्वरूप होतात ते पुरुष संसारबंधनात पुन्हा सापडत नाहीत.

Advertisement

ब्रह्मदेवाचा एक दिवस खूप मोठा असतो. त्याचा कालावधी लक्षात यावा म्हणून पुढील श्लोकात भगवंत सांगतात,

होतसे ब्रह्म-देवाचा सहस्र-युग तो दिन। तेवढी चि तशी रात्र कालोपासक जाणती ।। 17 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, चार युगांच्या जेव्हा हजार फेऱ्या होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. त्याच प्रमाणे हजार चौकड्या भरल्या म्हणजे तेथील एक रात्र होते. या कालावधीत जे मरत नाहीत ते खरे चिरंजीव होत. अर्थात चिरंजीव होणे हे इंद्रालासुद्धा अशक्य आहे. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात पण जे इंद्राला अशक्य आहे ते भगवंतांची निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांना मात्र साध्य होते.

यावरून भगवंतांची भक्ती करून चिरंजीव होणाऱ्या भक्तांचे महात्म्य आपल्या लक्षात येते. ते अधियज्ञ करुन, भगवंतांना सर्वस्व अर्पण करून, भगवंतांची भक्ती करतात. त्यामुळे ते वैकुंठलोकात राहून ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र सहजी पाहू शकतात. वाईट आणि काय चांगले हे ठरवणारी बुद्धी देवाने फक्त माणसाला दिलेली आहे तिचा वापर करून प्रारब्धानुसार जशा प्रकारचे आयुष्य वाट्याला येईल ते स्वीकारून, मोहाचे प्रसंग टाळून देवाची भक्ती करणे मनुष्य देहातच शक्य आहे. यावरून नरदेहाचे महात्म्य माणसाने लक्षात घ्यायला हवे. इतर योनी या भोगयोनी म्हणून समजल्या जातात पण मनुष्ययोनी ही कर्मयोनी आहे. यामध्ये निरपेक्ष कर्म करून ईश्वर प्राप्ती करून घेणे शक्य आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.