For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीचा मालक कोण? फैसला जनतेच्या हाती!

06:04 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीचा मालक कोण  फैसला जनतेच्या हाती
Advertisement

दिल्लीचा मालक कोण? फैसला जनतेच्या हाती!

Advertisement

राजधानी दिल्ली हे एक अजब शहर आहे. ते नेहमी जेत्याच्या बरोबर राहिले आहे. कोणाला आवडो अथवा नावडो, दिल्लीची हीच जातकुळी आहे, ओळख आहे. काही इतिहासकार तर दिल्ली ही गणिकेसारखी आहे असे म्हणतात. जो कोणी शासक असेल अथवा होईल त्याच्याशी एकनिष्ठ राहणे, रोटी-बेटी व्यवहार करणे ही दिल्लीची ओळख आहे. हा तिचा केवळ इतिहास नाही तर वर्तमान आणि भविष्य सुद्धा आहे. दिल्लीचे रंग बदलतात, निष्ठा बदलतात. सत्तेत असताना ‘जी हुजुर’ करणारे सत्ता जाताच क्षणार्धात पाठ फिरवितात. दिल्लीचे इमान सत्तेशी आहे जसे गणिकेचे पैशाशी असते तसे.

ते झपाट्याने बदलते. कालचा राज्यकर्ता आज गायब होत जातो एवढेच नव्हे तर दिल्ली त्याला, पूर्णपणे विसरते. भले भले आले आणि गेले पण दिल्लीवर कोणीही  कायम राज्य करू शकले नाही. इंग्लंडच्या ज्या राजकर्त्यांना गर्व होता की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नसे त्यांना त्यांच्या ‘कोहिनूर’ वर, भारतावर, दीडशे वर्षेच राज्य करून परतावे लागले. महात्मा गांधींनी जी आंधी आणली त्यात ते उडून गेले.

Advertisement

दोन दिवसांपूर्वीच राजधानीतील सात लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. जर शितावरून भाताची परीक्षा बरोबर असते, तशी दिल्लीवरून देखील देशात काय वारे चालले आहे त्याचा पत्ता लागतो. जर यंदा देखील दिल्लीच्या सातही मतदारसंघात भाजप यशस्वी ठरली तर मोदी यांना तिसरी टर्म कोणीच नाकारू शकत नाही. पण जर का राजधानीने सत्ताधाऱ्यांना इंगा दाखवला तर देशात इतरत्र त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल हे जणू विधिलिखित आहे. याला कारण असे की ‘मिनी भारत’ समजल्या जाणाऱ्या दिल्लीत जो पक्ष देशात सत्तेत येतो तो सातही जागा जिंकतो, बहुतांशी दिमाखाने जिंकतो असे गेल्या पंचाहत्तर वर्षात दिसून आले आहे. थोडक्यात काय तर राजधानी दिल्ली हे देशातील राजकीय तापमानाचा तापमापक (बॅरोमीटर) राहिला आहे. 2014 आणि 2019 मध्ये येथील भाजपचे सात उमेदवार दिमाखाने विजयी झाले होते.

यावेळी चित्र बदललेले आहे. आपल्या सातपैकी सहा खासदारांची तिकिटे कापून भाजपने दिल्लीत आपल्याला आव्हान आहे अशीच अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे, अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने काँग्रेसबरोबर केलेला समझोता हा  जमिनीवर काम करताना दिसत आहे. भाजप प्रचंड मताधिक्याने गेल्या दोन वेळा दिल्लीत आली असली तरी यावेळी प्रत्येक मतदारसंघात तिला जोरदार सामना द्यावा लागत आहे. राजधानीत आप-काँग्रेसने सातपैकी चार अथवा त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्या तर केंद्रात भाजपला कठीण काळ येणार असे जाणकार सांगत आहेत. केजरीवाल यांचे राजधानीतील काम हा विरोधकांना मोठा मुद्दा बनलेला आहे आणि त्यांना कालपरवापर्यंत तुरुंगात ठेवल्याने तो आता मोठा राजकीय मुद्दा बनलेला आहे.

आतापर्यंत 400 पेक्षा जास्त मतदारसंघात निवडणूक पार पडली असल्याने आपण ही निवडणूक आताच जिंकलेली आहे असे दावे भाजप आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी करत आहे. जर इंडिया आघाडीने बाजी मारली तर मल्लिकार्जुन खर्गे हे राहुल गांधींचे ‘मनमोहन सिंग’ असतील असे आताच राजधानीच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. खर्गे हे जुनेजाणते नेते असल्याने आणि निष्ठावंत म्हणून प्रसिद्ध असल्याने ते या शर्यतीत पुढे राहू शकतात असे मानले जाते. राहुल यांना कोणत्याही सत्तेच्या पदाचा मोह नाही आणि ते फक्त किंगमेकरच राहू इच्छितात असे सांगितले जाते. भाजपचा पाडाव झाला तर चार जूननंतर तीन दिवसात विरोधक आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवतील असे काँग्रेस प्रवत्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

‘बदले की आग’ चा जणू ट्रेलर

4 जूनला निकाल लागत असलेल्या या निवडणुकीची जातकुळी देखील थोडी वेगळी आहे. आतापर्यंत कोणत्याच निवडणुकीत तशी बघायला मिळाली नव्हती. 1977 च्या ऐतिहासिक निवडणुकीत तिची चुणूक बघायला मिळाली होती.   तेव्हा आणीबाणीत इंदिरा गांधींनी साऱ्या विरोधकांना तुरुंगात टाकले होते तरी देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आत्ताइतकी कटुता आली नव्हती असे जाणकार सांगतात. तळपता सूर्य आग ओकत आहे. अशातच सुरु असलेली ही निवडणूक म्हणजे ‘बदले की आग’ सारख्या सूडाच्या चित्रपटाचा ट्रेलर तर नाही ना अशी शंका यावी अशा परिस्थितीत पार पडत आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर दोन मुख्यमंत्रांची झालेली अटक ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील एक अजब घटना मानावी लागेल. गेल्या सत्तर वर्षात असे कधी झाले नव्हते. त्यामुळे आत्ताच हे घडले त्यात खरे ते काय आणि काळेबेरे ते किती अशी शंका यायला भरपूर वाव आहे.

त्यातील एका मुख्यमंत्र्याने-दिल्लीच्या अरविंद केजरीवाल यांनी राजीनामाच न देऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्यांचे गणितच बिघडवले. एकदा का केजरीवाल आत गेले तर मग लवकर बाहेर येणार नाहीत आणि दिल्लीतील निवडणूक आपण सहजासहजी मारू असे भाजपला वाटले नसेल असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.

केजरीवाल यांनी गुन्हा केला आहे की नाही हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत आताच बोलणे योग्य ठरणार नाही. पण मुख्यमंत्र्यास आताच तुम्ही का बरे अटक केली कारण निवडणूका तोंडावर आलेल्या तुम्हाला माहित नव्हत्या का? अशा स्वरूपाची न्यायालयाने केंद्राला केलेली विचारणा बरेच काही बोलून जाते.

केजरीवाल हे सरळ साधे नाहीत असा शोध त्यांचे गुरु अण्णा हजारे यांना दहा वर्षानंतर आताच लागावा यालादेखील काय योगायोग समजावा.

तात्पर्य काय तर आपल्या विरोधकांना निपटण्यासाठी तुरूंगासह सर्व युक्त्या आणि क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. केजरीवाल यांनी अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारखा निष्णात वकील देऊन तुरुंगातून आपली तात्पुरती सुटका करून घेतली आणि ते प्रचाराला मोकळे झाले. विरोधी पक्षातील केजरीवाल हे मुलुखमैदान तोफ झालेले आहेत. राजकारणात अचानक अपघात होत नसतात आणि त्यांच्यामागे काहीतरी कार्यकारण भाव असतो. केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गलिच्छ

जे स्वाती मालिवाल प्रकरण झाले त्यात हात कोणाचा व कसे? व त्याला कोण जबाबदार? हे यथावकाश बाहेर येईल. परंतु या साऱ्या प्रकाराने

विरोधकांची कोंडी झालेली आहे असे चित्र दिसत नाही आहे. ‘मी जर मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला असता तर माझ्यानंतर केंद्र ममता बॅनर्जी आणि केरळच्या पिनारायी विजयनच्या मागे लागून भाजपने विरोधक मुक्त राज्ये असे अभियान चालवले असते असा केजरीवाल यांचा दावा आहे. भाजपने त्यास पत्रास घातलेली नाही. एकमात्र खरे, की राजकारण हे दिवसेंदिवस जास्त गलिच्छ होत आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण त्यानंतरदेखीलही ते थांबणार नाही असे संकेत आताच मिळत आहेत.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.