दैव जाणिले कुणी...
कोणाचे भाग्य कधी फळफळेल आणि कोठे फळफळेल हे समजणे अशक्य आहे. राजस्थानमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नुकताच असा अनुभव आला आहे. या कर्मचाऱ्याचे नाव अनिल कुमार असून तो काही दिवसांपूर्वी पंजाबमधील लुधियाना शहरात काही कामानिमित्त आला होता. लुधियाना येथे एका लॉटरीच्या दुकानातून त्याने 10 कोटी बक्षिसाची चार लॉटरी तिकिटे खरेदी केली.
ही खरेदी त्याने सहज म्हणूनच केली होती. हा एक बंपर ड्रॉ होता. ही तिकिटे लागतील अशी त्याला अपेक्षाही नव्हती. पण कित्येकदा अनपेक्षितरित्या भाग्य आपला दरवाजा ठोठावते. असाच प्रकार त्याच्याही संबंधात घडणार होता. तिकिटे काढल्याचे तो कालांतराने विसरुनही गेला होता. पण ही लॉटरी फुटल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने खरेदी केलेल्या चार तिकिटांपैकी एका तिकिटाला दुसऱ्या क्रमांकाचे 1 कोटी रुपयांचे बक्षिस लागले होते. एक सर्वसामान्य काम करणारा सरकारी नोकर अचानकपणे कोट्याधीश झाला होता. ही सर्व ‘बाबा खाटू श्याम’ यांची कृपा आहे, अशी अनिल कुमार यांची श्रद्धा आहे.
मुख्य म्हणजे, अनिल कुमार यांच्यावर मोठे कर्ज होते. ते कसे फेडायचे याची चिंता त्यांना नेहमी लागलेली असे. नोकरी सरकारी असली तरी त्यांचे वेतन बेताचेच आहे. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी राहते घर विकण्याचाही विचार ते करीत होते. तथापि, अचानक लुधियानामध्ये त्यांचे भाग्य त्यांच्या साहाय्याला धावले आहे. आता त्यांचे सारे कर्ज तर फिटणार आहेच. पण ते फेडूनही बरीच मोठी रक्कम त्यांच्या हाती उरणार असून त्यातून त्यांच्या मुलांची शिक्षणे आणि इतरही सांसारिक उत्तरदायित्वे त्यांना उत्तम रितीने निभावता येणार आहेत. मुख्य बाब अशी की लुधियाना शहरात नेहमीच अशा मोठ्या रकमेच्या लॉटऱ्यांचे बंपर ड्रॉ फुटत असतात. या शहराने आजवर अनेक भाग्यवंतांना कोट्याधीश बनविले आहे. विशेषत: कुमार यांनी ज्या दुकानातून लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती, त्या दुकानाची तर या संदर्भात ख्यातीच आहे. अनेकांसाठी हे दुकान ‘लकी’ ठरले आहे. त्यामुळे तेथे लॉटरी तिकिटे खरेदी करणाऱ्यांची नेहमी गर्दी असते.