दैव जाणिले कुणी?
माणूस पुढच्या जगण्याचा विचार फार करतो. अध्यात्म सांगते की निर्विचार व्हाल तरच परमेश्वराचे स्मरण टिकेल. नामस्मरण करताना अहंकाराला बरोबर घेऊन आलेली कल्पना फार त्रास देते. ती नेहमी भविष्याचाच विचार करते. पू. बाबा बेलसरे म्हणतात, कल्पनेची दुसरी बाजू स्मृती आहे. स्मृती ही भूतकाळ धरून ठेवते, तर कल्पना भविष्य काळाकडे बघते. माणूस जगत असतो वर्तमान काळात, मात्र तो तिथे क्षणभरही टिकत नाही. कल्पना थांबली की भविष्याचा विचार थांबतो.
काळ वेगाने बदलतो. त्या वेगाने माणसाचे मन मात्र बदलत नाही. ते जुन्याशी संलग्न असते. कुठूनही मनाचे समाधान व्हावे म्हणून माणसाची धडपड चाललेली असते. त्यामुळेच मानवी मनाला भविष्याची ओढ असते. भविष्यात सुखसमृद्धी, शांतता मिळेल का? आयुष्याची वाट बदलेल का? हे जाणून घेण्यासाठी त्याची पावले ज्योतिषाकडे वळतात. काल-परवा गाणगापूरला गुरुप्रतिपदेनिमित्त भरलेल्या यात्रेमध्ये आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळात जुनी गोष्ट बघायला मिळाली. प्रसाद, बुक्का, हार-फुले, बेदाणे, बत्तासे या दुकानांच्या गर्दीसमोर पथारी पसरून पोपटांसह बसलेले ज्योतिषी दिसले. पायघोळ झब्बालेंगा, माथ्यावर जटा, गळ्यात निरनिराळ्या माळा, शेजारी पिंजऱ्यात पोपट आणि जवळ खूप साऱ्या चिठ्ठ्या. पोपटाच्या माध्यमातून चिठ्ठ्यांमधून माणसांचे भविष्य कथन करणाऱ्या या लोकांजवळ बऱ्यापैकी गर्दी होती, हे विशेष. तिथे थोडावेळ थबकल्यावर लक्षात आले की नेहमीच्या सवयीने पोपटाला मालकाची भाषा कळत होती. त्याप्रमाणे तो चिठ्ठी काढून देत होता. भविष्याचा वेध आणि कुतूहल बाळगून जवळ बसलेली माणसे जीवनातील परिस्थिती बदलणार का हे जाणून घेण्यास उत्सुक होती.
पोपट हा माणसाची वाणी कंठस्थ करणारा असल्यामुळे आणि माणसांमध्ये सहज मिसळून जाणारा असल्यामुळे त्याच्याकडून भविष्य जाणून घेण्याची माणसाची उत्सुकता समजण्यासारखी आहे. मात्र जंगलात वास्तव्य असणारा अवाढव्य प्राणी हत्ती हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. पू. पांडुरंगशास्त्राr आठवले म्हणतात, ‘हत्तीला जन्मजात भविष्याचे ज्ञान असते. भविष्याचे ज्ञान होते’. एक बरे आहे की हत्तीला आपली आणि आपल्याला हत्तीची भाषा येत नाही. नाहीतर काय झाले असते तर सारी दुनिया हत्तीच्या पाठीमागे वेडी झाली असती. पूर्वी एखाद्या राज्याला वारस न मिळता तो देवाघरी गेला तर एखाद्या हत्तीणीच्या सोंडेमध्ये माळ देण्यात येत असे व तिला नगरात सोडून देण्यात यायचे. हत्तींच्या गळ्यात माळ घालील तो त्या देशाचा राजा होत असे. संत ज्ञानोबा माऊलींच्या चरित्रात एक गोष्ट सुप्रसिद्ध विद्वान स. कृ. देवधर यांनी लिहिली आहे. ज्ञानदेवांसह संत मंडळी जेव्हा तीर्थयात्रेला निघाली तेव्हा काशी क्षेत्रात गंगेच्या काठावर मुद् गलाचार्यांचा एक यज्ञ चालला होता. तिथे एक वाद चालला होता की यज्ञामध्ये अग्रपूजा कुणाची करायची? तेव्हा काशी राजाकडून एक हत्तीण आली. तिच्या सोंडेमध्ये पुष्पमाळ देण्यात आली आणि ठरवले की ही हत्तीण ज्या कुणाला पुष्पमाळ घालेल त्याची अग्रपूजा करायची. हत्तीण सरळ निघाली आणि तिने ज्ञानोबा माऊलींच्या गळ्यात माळ घातली. याला काही संतमंडळींनी विरोध केला तेव्हा साक्षात शिवशंकरांनी प्रकाश दाखवून प्रचिती दिली, तेव्हा मोठ्या आनंदाने मुद् गलाचार्यांनी माऊलींची अग्रपूजा केली.
लक्ष्मीमातेचे वाहन हत्ती आहे. ती हत्तीच्या पाठीवर बसते. यामध्ये सूक्ष्म अर्थ भरला आहे. लक्ष्मीचे आगमन पुढच्या दहा पिढ्यांचा विचार करायला लावते. पू. आठवलेशास्त्राr म्हणतात, ‘वित्तवान हा दीर्घ दृष्टीचा असला पाहिजे. समाजासाठी काय करायला हवे? लक्ष्मीची शक्ती, किंमत, योग्यता ओळखून दीर्घकाळापर्यंत मानवाच्या जीवनसाधनेसाठी, उन्नतीसाठी जी लक्ष्मी वापरली जावी असे जो वागतो, करतो तो बौद्धिक श्रीमंत. स्वत:पुरते बघणारा, स्वत:च्याच भविष्याचा विचार करणारा बौद्धिक दरिद्री असतो. आपल्या ऋषीमुनींनी दोन हजार वर्षानंतरही संस्कार, पावित्र्य टिकले पाहिजे म्हणून विचारपूर्वक आचरणाचे नियम घालून दिले. अक्रोडाच्या झाडाला पन्नास वर्षांनंतर फळे येतात. अक्रोडाचे झाड माणसे पुढच्या पिढीसाठी लावतात. पूर्वजांचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. समाजाच्या समृद्धीचा विचार त्यात होता.
माणूस पुढच्या जगण्याचा विचार फार करतो. अध्यात्म सांगते की निर्विचार व्हाल तरच परमेश्वराचे स्मरण टिकेल. नामस्मरण करताना अहंकाराला बरोबर घेऊन आलेली कल्पना फार त्रास देते. ती नेहमी भविष्याचाच विचार करते. पू. बाबा बेलसरे म्हणतात, कल्पनेची दुसरी बाजू स्मृती आहे. स्मृती ही भूतकाळ धरून ठेवते, तर कल्पना भविष्य काळाकडे बघते. माणूस जगत असतो वर्तमान काळात, मात्र तो तिथे क्षणभरही टिकत नाही. कल्पना थांबली की भविष्याचा विचार थांबतो. व्यवहारात भविष्याचा विचार सुनियोजित कार्यासाठी जरूर करावा. प. पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणत की मीपणाने मरून गेले की भविष्याची चिंता, उत्सुकता काहीच उरत नाही.
मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘मनी मानव व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते । घडे भोगणे सर्वही कर्मयोगे। मतिमंद ते खेद मानी वियोगे?’ समर्थ म्हणतात, मन सारखे भूतकाळ-भविष्यकाळ असा झोका घेत असते. भूतकाळातल्या आठवणी कधी क्षोभ, तर कधी निसटून गेलेले आनंदक्षण आठवून उदास होते. माणसाचे मन वर्तमानात कधीच राहत नाही. भविष्याचा वेध घेणाऱ्या मनाला सतत वाटते की पुढे सर्व नीट होईल का? आपण कोणती वाट निवडावी, जेणेकरून आनंद मिळेल? मन व्यर्थ चिंता वाहते आणि जे घडणार असते ते अकस्मात घडून जाते. कारण कर्म, माणसाचे पूर्वसंचित, प्रारब्ध यामुळे त्याचे आयुष्य घडते. एक अमोघ शक्ती माणसाच्या आयुष्यात कार्य करत असते. जगण्यातला आनंद शोधणे म्हणजे वर्तमानात परमेश्वराचे स्मरण करणे हेच आहे.
मनाला अखंड वर्तमानात कसे ठेवायचे हे ज्ञानोबा माऊली सांगतात. ते म्हणतात, ‘माळिये जेऊते नेले तेऊते निवांतची गेले । तया पाणिया ऐसे केले । होआवे गा?’ उद्यानाची निगा राखणारा माळी बागेला पाणी देताना एकीकडचे बंद करून दुसऱ्या दिशेला वळवतो तेव्हा ते पाणी तक्रार करीत नाही. ते निवांत जाते. माऊली म्हणतात, हे जग मोठे उद्यानच आहे. त्याप्रमाणे माझे जीवन हेही उद्यान आहे. या बागेचा माळी तो परमेश्वर आहे. तो माझ्या जगण्याला, जीवनाला जिकडे न्यायचे तिकडे नेईल. माझे सद्गुरु जी वाट दाखवतील तिकडे मी विनातक्रार जाईन. सगळे जीवन त्याच्या सत्तेने, कृपेने आणि इच्छेने चालले आहे हे कळले म्हणजे भविष्याचा प्रश्न उरतच नाही.
माऊली म्हणतात की, देहाचे प्रारब्ध जसे असेल तसा तो जागोजागी जाईल. कधी रोगी, तर कधी निरोगी. कधी रिकामा, तर कधी व्यस्त. जशी परिस्थिती असेल तसा देह कुठेही गेला तरी मनाची बैठक मोडता कामा नये. ती स्थिर असावी. अर्थात कर्तेपण परमेश्वराच्या हाती सोपवले की त्याच्या इच्छेत इच्छा मिसळून आनंद मिळवता येतो. संत तुकाराम महाराज विठोबाला म्हणतात, ‘मागे पुढे राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे । योगक्षेमे ज्याचे जाणे जड भारी । वाट दावी करी धरूनिया । तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पहावे पुराणी विचारूनि?’ जिकडेतिकडे तूच सांभाळणारा ही खात्री पटली की वर्तमानातला आनंद मिळतो आणि भविष्याचा विचार उरत नाही.
-स्नेहा शिनखेडे