बिहारचा कौल कोणाला
बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. बिहार भाजप प्रणीत एनडीएच्या ताब्यात राहतो, नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेतात की त्यांचा महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच बरोबर कॉंग्रेस महाआघाडी व प्रशांत किशोर यांना बिहारमधून कशी साथ मिळते हेही औत्सुक्य आहे. दुसऱ्या टप्प्यात विक्रमी मतदान झाले, तेव्हा मतदानोत्तर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यामध्ये एनडीए सरकार पुन्हा बहुमताने येणार असे दिसते आहे. महागठबंधन व प्रशांत किशोर सत्ताप्राप्तीसाठी अपयशी ठरणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेकदा असे अंदाज चुकीचे ठरले आहेत. ओघानेच 14 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणीतून कोणता निकाल बाहेर येतो हे बघावे लागेल. बिहार विधानसभा निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले तर पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी झाले होते. निवडणूक निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होतील. या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात प्रमुख लढत आहे. तिसरा पक्ष म्हणजे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष. प्रशांत किशोर या निवडणुकीत प्रथमच नवा पक्ष स्थापन करुन रिंगणात उतरले आहेत पण अंदाज व्यक्त झालेत त्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल असे दिसले आहे. एनडीए आघाडीत पाच पक्षांचा समावेश आहे. 243 जागांची बिहार विधानसभा निवडण्यासाठी भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 29 जागांवर आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) व हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत. महागठनबंधनमध्ये मोठा घोळ आणि एकवाक्यता नव्हती. ओघानेच जागा वाटपाची अधिकृत घोषणा झाली नाही. प्रचारात सुसुत्रताही नव्हती. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, सीपीआय (एम-एल), सीपीआय आणि विकासशील इंसान पार्टी (वीआयपी) यांचा समावेश होता. आरजेडी 143 जागांवर, काँग्रेस 61 जागांवर, सीपीआयएमएल 20 जागांवर, वीआयपी 13 जागांवर, सीपीआय (एम) 4 आणि सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवत होती. बिहार निवडणुकीत मतदान संपल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल्स येऊ लागले आहेत, यात बहुतेक एक्झिट पोल्समध्ये एनडीए आघाडीच्या विजयाचे दावे करण्यात आले आहेत. अनेकदा एक्झिट पोल्स आणि अंतिम निकालांमध्ये फरक दिसून आलेला आहे. त्यामुळे हे कल म्हणजे अंतिम निकाल नाहीत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना यशस्वी ठरली तशी बिहारमध्ये महिलांना नुकत्याच झालेल्या निवडणूक काळापूर्वी, नितीश कुमार यांच्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत सुमारे 25 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये हस्तांतरित केले. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात आली. एकूण सुमारे रुपये 2,500 कोटींचे वाटप करण्यात आले. ही योजना महिलांना स्व-रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ओघानेच या योजनेची हवा झाली आहे. त्याच जोडीला जंगलराज नको हा प्रचारही जोर धरून होता. या वेळच्या बिहार निवडणुकीचे वैशिष्ट्या म्हणजे भाजपने जोरात ताकद लावली असली आणि मतदारयादी व्यवस्थापन नेटके केले असले तरी एनडीएचा निवडणूक चेहरा म्हणून नितिशकुमार यांनाच प्रोजेक्ट केले होते. कदाचित केंद्रसरकारमधील नितिशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज हे कारण असू शकेल, पण भाजप अन्य सर्व निवडणुकांत मोदी विरुद्ध विरोधक असे चित्र उभे करते आणि मोदीचा चेहरा प्रचारात ठळक वापरते. तसे यावेळी दिसले नाही. भाजपाने पक्ष म्हणून आपले सारे बळ प्रचारात उतरवले होते. स्वयंसेवकही मदतीला होते आणि न•ा, मोदी, फडणवीस, राजनाथसिंह ते देवेंद्र फडणवीस व योगीपर्यंत सारे एका सुरात भाषणे देत होते. त्यांचा प्रभाव दिसला. तुलनेने महाआघाडीत सुसुत्रता आणि सुसंवाद दिसला नाही. बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी सुमारे दहा टक्के मतदान जास्त झाले आहे आणि महिलांनी मतदान मोठ्या प्रमाणात केले आहे. हा वाढीव दहा टक्के हिस्सा कुणाच्या पारड्यात पडतो, यावर बिहारचा कौल निश्चित होईल असे मानले जात असले तरी 25 लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटप हेच यामागचे कारण आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. बिहारमध्ये जातीय समीकरणे विजयासाठी महत्त्वाची असणाऱ्यात मुलगी आणि मत जातीतच द्यावे असे बोल तेथे ऐकू येत होते. देशभर सगळीकडेच हेच सुत्र ठळक होते आहे. 14 तारखेला पहिले पंतप्रधान, कॉंग्रेस नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंतीदिन आणि बालदिन आहे. कॉंग्रेस महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला तर त्याचे राजकीय परिणाम देशभर उमटतील, कॉंग्रेसला नेतृत्व आणि दिशा यावर विचार करावाच लागेल आणि भाजपाला मित्रपक्षांना चांगली साथ देत देशाचा आणि राज्याचा कारभार नेटका करावा लागेल. निवडणूक पूर्व लाडकी बहिण टाईप योजना राबवण्याची वेळ पुन्हा येता कामा नये. भक्कम अर्थव्यवस्था, तगडी पक्षबांधणी आणि रोजगार, कायदा-सुव्यवस्था व प्रगती या बळावर निवडणूक जिंकता आली पाहिजे. भाजप व मित्राची एनडीए महायुती जिंकणार, सत्ता राखणार, नितिशकुमार बिहार मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणार असे तर्क आज लढवले जात आहेत. एनडीएला 138 ते 169 जागा दाखवण्यात आल्या आहेत तर महागठबंधनला 90 ते 108 जागा दाखवण्यात आल्या आहेत. भाजप हा 65 ते 70 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि प्रशांत किशोरांचा पक्ष जेमतेम खाते उघडेल असे अंदाज व्यक्त झाले आहेत. विविध एक्झिट पोल त्यांची सॅम्पल्स यांचा या तर्कामागे आधार आहे. आता 14 तारखेला प्रत्यक्ष निकाल काय येतो हे महत्त्वाचे. चाचण्या, अंदाज व तर्क अनेकदा फसतात, मतदार नेहमीच चकवा देतात. त्यामुळे निकाल काय येतो यावर पुढची सारी गणिते ठरतील. मोदींनी मी शपथविधी समारंभाला येणार अशी घोषणा प्रचार समाप्ती सभेत केली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशात मतचोरी आणि निवडणूक आयोग यासंदर्भात आरोप, मोर्चे यांनी रान तापवले गेले आहे. बिहारचा कौल एनडीएच्या बाजूने आला तर हा आवाज मोठा होईल पण लोकशाहीत हे चालणारच. निकालासाठी आता शुक्रवारपर्यंत प्रतिक्षा केली पाहिजे.