हिजबुल्लाहचे नेतृत्त्व कोणाकडे?
सैफिद्दीनचे नाव आघाडीवर : इस्लामची शिकवण देणारा कासिमही शर्यतीत
वृत्तसंस्था/ बेरूत
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह इस्रायली हल्ल्यात ठार झाल्यानंतर आता या संघटनेचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. या हल्ल्यात नसराल्लाहशिवाय हिजबुल्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. यामध्ये हिजबुल्लाहच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कराकीही ठार झाला. त्यानंतर आता संघटनेचे नेतृत्त्व सांभाळणाऱ्यांच्या शर्यतीत हाशेम सैफिद्दीन आणि नईम कासिम यांची नावे आघाडीवर आहेत.
हिजबुल्लाह प्रमुख पदासाठी मुख्य दावेदार हाशेम सैफिद्दीनचे नाव हिजबुल्लाह प्रमुखाच्या पुढील महासचिवपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तो हिजबुल्लाहच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य आणि हसन नसराल्लाहचा चुलतभाऊ आहे. तसेच हिजबुल्लाहचा डेप्युटी सेव्रेटरी जनरल नईम कासिम हादेखील संघटनेचा प्रमुख बनण्याच्या शर्यतीत आहे. कासिम हा शिया चळवळीचा नंबर 2 आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह असल्याचेही म्हटले जाते. कासिम अनेक दशकांपासून बेरूतमध्ये धार्मिक शिक्षण देत आहे. तो 1991 मध्ये हिजबुल्लाहचा उपमहासचिव झाला. तो हिजबुल्लाहच्या सुरा कौन्सिलचा सदस्यही आहे.
नसराल्लाहच्या हत्येनंतर हिजबुल्लाहचे महासचिव (संघटन प्रमुख) हे पद रिक्त आहे. नसराल्लाह 1992 मध्ये संघटनेचा प्रमुख बनला. तो लेबनॉनमधील शिया चळवळीतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होता. तीन दशकांपासून हिजबुल्लाहचा सर्वात महत्त्वाचा चेहरा असलेल्या नसराल्लाहच्या मृत्यूने संघटनेला मोठा धक्का बसला आहे. नसराल्लाह आणि कारकी यांच्या व्यतिरिक्त, हिजबुल्लाहचा सर्वोच्च लष्करी कमांडर फुआद शुकर आणि एलिट कमांडो युनिटचे संस्थापक इब्राहिम अकील देखील मारले गेले आहेत.