महिला स्वच्छता कामगारांच्या आडून कोण खातयं मलई
सातारा :
सातारा शहरात रस्ते सफाई करण्यासाठी ठेका पद्धतीने काही महिला कर्मचारी घेण्यात आल्या होत्या. त्यातील काही महिला मंगळवारी पालिकेत आल्या होत्या. त्यांना आरोग्य विभागाकडे दोन महिन्याचा पगार मिळाला नाही अशी काहीतरी कैफियत मांडली गेली आहे. मात्र, त्यांच्या आडून अन्य कोणीतरी लोण्याचा गोळा खाण्याच्या बेतात असल्याची चर्चा असून एक वर्षापूर्वीच संबंधित ठेकेदाराचा ठेका संपला असून आता त्या महिलांच्या पगाराचे निमित्त नेमके आताच पुढे कसे आले असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सातारा नगरपालिकेत ठेका घेणारा ठेकेदारही होणाऱ्या त्रासामुळे काम अर्ध्यात सोडून जाण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामध्ये पाणी पुरवठ्याचे काम करणारा ठेकेदार असेल किंवा भुयारी गटरचे काम करणारा ठेकेदार असेल किंवा घंटागाड्या चालवणारा ठेकेदार असेल. त्यातच मंगळवारी काही महिला नगरपालिकेत आल्या होत्या. त्या झाडू कामगार होत्या. त्या कॉन्ट्रक्ट बेसवरच्या होत्या. त्यांना दोन महिन्याचा पगार मिळाला नाही असे त्या सांगत होत्या. त्यांनी पालिकेत बसून निवेदन लिहले अन् ते निवेदन पालिकेतल्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्याबाबत पालिकेत चर्चा होती की त्यांचा आताचा पगार अडकला नाही तर मागच्या वर्षीचा पगार राहिला आहे. मागच्या वर्षी दुसरा ठेकेदार होता. त्या ठेकेदाराने त्यावेळी त्यांचे पैसे अडकवले तर त्या तब्बल एक वर्षांनी पालिकेत कशा आल्या आहेत. त्या कॉन्ट्रक्ट बेसवरच्या महिला कामगारांच्या आडून नेमकं कोण लोण्याचा गोळा खातयं याचीच चर्चा पालिकेत सुरु होती. त्या ठेकेदारास झालेल्या त्रासामुळे पुन्हा पालिकेकडे नको रे बाबा अशी त्याची मनोमन इच्छा झाली असावी त्यातच हा नव्याने गुंता काय हेही त्याला वाटू लागले असावे.
दरम्यान, या झाडू कामगार महिलांना नेमका कोणी पगार अडवला मग, त्यांना गतवर्षी का सुचले नाही. यावर्षीच त्या पालिकेत कशा काय पोहोचल्या?, याचीच उलटसुलट चर्चा सुरु होती.