ढसाळ कोण? जाणण्याची हिंमत आहे?
दलित पॅंथर आणि युवक क्रांती दल चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या ‘चल हल्लाबोल’ या लोकांचा सिनेमा चळवळ संस्थेच्यावतीने लोकसहभागातून निर्माण करण्यात आलेल्या चित्रपटाला खो घालण्याचे काम सेन्सॉर बोर्डाने केले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांबरोबरच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पुढील कविता - दलित अन्याय अत्याचाराची मालिका कधीच खंडित होत नाही... स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे.... कधीच इथं नांदत नाही... पुरोगाम्यांचे बुरखे कधीच फाटलेत या कविता हटवण्याबरोबरच त्याला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासही नकार दिला आहे. या विषयावर समोरासमोर चर्चेच्या वेळी बोर्डाच्या सदस्यांनी कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही! अशी भाषा केली आहे अशी माहिती चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मराठी माणसांच्या संतापाचा उद्रेक लक्षात घेऊन आता सेन्सर बोर्डाने आपल्यातील एकाला घरचा रस्ता दाखवला आहे. पण, ज्याच्याकडे जबाबदारी दिली त्याने सुद्धा गेले आठ महिने या चित्रपटाला अधांतरी ठेवण्याचे काम केले असल्याने या बोर्डाच्या विरोधातच हल्लाबोल करण्याचा निर्धार आता साहित्य क्षेत्राबरोबरच आंबेडकरी जनतेतूनही व्यक्त होत आहे. नामदेव ढसाळ कोण? हे सेन्सर बोर्डाला माहीत नाही असे होऊ शकत नाही. त्यांना केवळ त्यांना आणि त्यांच्या विचारांना नाकारायचे होते म्हणून ते त्या वाट्याला गेले. खरोखरच त्यांना ढसाळ जाणून घ्यायचे असतील तर त्यांची तितकी हिंमत आहे का? ढसाळ पेलण्याची आणि त्यांना पचवण्याची ताकद आहे का? याचा एकदा विचार केला पाहिजे. हे ते ढसाळ आहेत ज्यांच्या कविता बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात गौरवल्या गेल्या, अमेरिकेत तिचे कौतुक झाले, इंग्रजी, फ्रान्स, जर्मन सह जगातील अनेक भाषांत त्यांच्या कवितेचे आणि साहित्याचे भाषांतर झाले. साहित्य अकादमीला 2005 साली ज्यावेळी अखिल भारतीय स्तरावर सर्व प्रांतातून एका कवीला पुरस्कार द्यायचा होता तेव्हा त्यासाठी त्यांना केवळ नामदेव ढसाळ हेच योग्य वाटले. मुंबई ज्या कष्टकरी वर्गाने या तळहातावर पेलली त्या वर्गाचे अधोविश्व म्हणजेच अंडरवर्ल्डचे दर्शन नामदेव ढसाळ यांच्या साहित्यातून जगाला पहिल्यांदा झाले. इथल्या पारंपरिक साहित्यिकांच्या मर्यादित कल्पना विश्वाच्यापलीकडे एक वास्तव जग त्यांच्या जगाच्याही तळाशी चालते, ज्याच्या जीवावर ते महानगर चालत होते, त्यांच्या दु:खाचा ढसाळ आवाज बनले. हे ढसाळ जाणून घेणे इतके सोपे नाही. ढसाळांच्या वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी गोलपिठा हा त्यांचा पहिला आणि जगभर गाजलेला काव्यसंग्रह अनिरुद्ध पुनर्वसू यांच्या पुढाकाराने प्रकाशित झाला. त्या पुढचे त्यांचे सगळे लेखन जागतिक पातळीवर नोबेल मिळवण्याच्या दर्जाचे होते आणि मराठीत त्यांची यथायोग्य समीक्षा झाली नाही हे इथल्या साहित्य विश्वाने कधीचेच मान्य केले आहे. मात्र सेन्सॉरच्या फडताळात बसलेल्या ढेकणांना ज्या रक्ताच्या वाट्याला जावे वाटले ते असे सहजसाध्य नव्हते. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता शहराशहराला आग लावत चला... अशी हाक देणारे ते ज्वालामुखी पेलणारे रक्त आहे याची कदाचित त्याला तोंड लावायला जाऊन जळलेल्यांना कल्पना नसावी. त्यांच्यासाठी गोलपिठाला प्रस्तावना लिहिणाऱ्या आणि त्या काळात प्रक्षोभक व बंडखोर नाटककार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विजय तेंडुलकर यांना त्यांची कविता आवडली. पण त्यातील शब्दांचे शब्दश: अर्थ जाणून घेण्यासाठी एक रात्री ढसाळ यांच्यासोबत गोलपिठाला भेट दिल्यानंतर जे उमगले ‘तें’ त्याबद्दल लिहितात.... पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लँड’ - निर्मनुष्य प्रदेश- जेथून सुरू होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यदेहांचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाऱ्या तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापासूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे, दर्ग्यांचे आणि क्रुसांचे, कुरकुरणाऱ्या पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोपऱ्यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे....पुढेही तेंडूलकर ढसाळांचे शब्द उसने घेऊन व्यक्त होत राहतात आणि आपल्या शब्दात म्हणतात.... पांढरपेशा थराने दिमाखाने अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो, निर्दयपणे तिची मोडतोड करतो. त्याच्या कवितेतल्या आशयासाठी हे सारे त्याला आवश्यक वाटते. हे करताना भाषेचे पारंपरिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजले आहे याचेही पुरावे तो मधूनच देतो. या अशा गंगाजमनी, विद्रूप, मोडक्यातोडक्या परंतु अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ याचे जगणे एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेते. या जगण्यातला असह्य दाह कवितारूप होतो. या जगण्यातल्या अदम्य संतापाचा उकळता लाव्हा सुस्थित, संभावित जगावर चौफेर भिरकावीत नामदेव ढसाळ यांची कविता जेव्हा ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना’ हाकारीत, ‘अंधारयात्रिक’ होण्याचे नाकारीत, ‘शहराशहराला आग लावण्या’चे पुकारे देत सुसाट निघते, तेव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचित आढळणाऱ्या खऱ्याखुऱ्या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययाने मी दिपून जातो. या प्रकारचे जे कवी ढसाळ याने लिहिले आहे, ते चुकूनही प्रचारकी झालेले नाही, हे विशेष. ही बंडखोरी आत्म्याची आहे, कंठाळी नाही. या बंडखोरीला-
कवितेपुरते तरी- राजकीय रंग नाहीत, ती अधिक मूलभूत स्वरूपाची आणि म्हणूनच अस्सल आहे. ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे’, ‘पंधरा ऑगस्ट एक संशयास्पद भगोष्ट’, असे म्हणण्याचा छातीठोक निर्भयपणा तिच्यात आहे.... सेन्सॉर बोर्डाकडे तितका निर्भयपणा असेल तर त्या वाटेला जावे किंवा चुपचाप शेपटी पायात दुमडून बाजूला व्हावे.