For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित मालवीय ‘आऊट’; भाजपचे सोशल मीडिया प्रभारी म्हणून नियुक्त झालेले दीपक म्हस्के कोण आहेत?

05:24 PM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमित मालवीय ‘आऊट’  भाजपचे सोशल मीडिया प्रभारी म्हणून नियुक्त झालेले दीपक म्हस्के कोण आहेत
Advertisement

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत मोठा बदल करण्यात आला असून, पक्षाच्या समाजमाध्यम विभागाची जबाबदारी आता दीपक म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या समाजमाध्यम आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाचे नेतृत्व करणारे अमित मालवीय यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय संघटनेत दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय समाजमाध्यम संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका आणि वाढते डिजिटल राजकारण लक्षात घेता पक्षाने समाजमाध्यम धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी म्हस्के यांच्यावर विश्वास टाकल्याचे मानले जात आहे.

कोण आहेत दीपक म्हस्के?

दीपक म्हस्के हे छत्तीसगडशी संबंधित भाजपचे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम केले असून, संघटनात्मक आणि माध्यमांशी संबंधित विविध जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

Advertisement

अलीकडच्या काळात त्यांची छत्तीसगड वैद्यकीय सेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या त्यांना छत्तीसगड सरकारकडून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळालेला आहे.

तंत्रज्ञानाची जाण असलेले युवा नेते

मूळचे रायपूरचे असलेले दीपक म्हस्के हे भाजपमध्ये तंत्रज्ञानाची जाण असलेले, उत्साही आणि रणनीती आखण्यात कुशल युवा नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या डिजिटल मोहिमा आणि समाजमाध्यम विभाग अधिक मजबूत करण्यामध्ये त्यांनी यापूर्वीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता पक्षाच्या प्रचारयंत्रणेला अधिक बळकटी देण्यासाठी म्हस्के यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नितीन नवीन यांच्याशी जवळीक असल्याची चर्चा

दीपक म्हस्के आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यातील जवळीकही त्यांच्या नियुक्तीमागील महत्त्वाचा घटक मानली जात आहे. नितीन नवीन यांच्याकडे छत्तीसगडचे प्रभारीपद असताना म्हस्के यांनी त्यांना संघटनात्मक कामात सहकार्य केल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे नितीन नवीन यांच्या नव्या राष्ट्रीय संघटनेत म्हस्के यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याची चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

2015 पासून अमित मालवीयांकडे जबाबदारी

अमित मालवीय यांनी 2015 पासून भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून काम पाहिले. या काळात पक्षाचे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष बदलले, मात्र मालवीय या पदावर कायम राहिले.

मात्र नितीन नवीन यांनी नव्या राष्ट्रीय संघटनेची घोषणा केल्यानंतर मालवीय यांना समाजमाध्यम विभागाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. नव्या संघटनेत प्रीती गांधी यांची माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या संघटनेत स्मृती इराणी, राम माधव यांचाही समावेश

नितीन नवीन यांच्या नव्या राष्ट्रीय संघटनेत अनेक अनुभवी नेत्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपचे रणनीतीकार राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकूण 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांमध्ये सहा महिलांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रीय संघटनेत महिलांना जवळपास निम्मे प्रतिनिधित्व मिळाले आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेत प्रादेशिक समतोलासोबतच महिला सहभागावरही भर देण्यात आल्याचे या नियुक्त्यांमधून दिसून येते.

Advertisement
Tags :

.