मद्यधुंद पार्टीतील आरोपींना अभय कोणी दिलं?
कास, कुडाळ :
जगप्रसिद्ध कास पठारच्या परिसरात मद्यधुंद पार्टीत बारबाला नाचवत रेव्ह पार्टीचं प्रकरण उघड झालं. ‘तरुण भारत’च्या रेट्यानं तकलादू गुन्हा दाखल झाला. मात्र सातारा पोलिसांनी धमक का दाखवली नाही. का कुचराई केली ? यात रावण गँग, पनवेलच्या बारबाला आणि हॉटेल मालक यांना अभय कोणी दिलं. दरम्यान, यवतेश्वर ते बामणोली याचा पनवेल-पटाया होवू पाहणाऱ्या अनेक यंत्रणांचा कंडू शमला आहे. जय मल्हार या जावली तालुक्यात येणाऱ्या हॉटेलचा प्रकार उघडकीस आला म्हणून शुक्रवारी सातारा तालुका पोलिसांनी हॉटेल व्यावसायिकांना वेठीस धरले. आग मेढ्यात लागली असताना सातारच्या तांबेंनी बंब नाचवायची गरज नव्हती.
जणु बंदोबस्तामध्ये साताऱ्यात रेव्ह पार्टी झाली. याची चर्चा खूप झाली. पोलिसांना कळूनही गुन्हा दाखल न झाल्यामुळे याला ‘पोलीस बंदोबस्तात’ असं म्हणण्यात आले.
‘तरुण भारत’ने उघड केलेल्या या प्रकाराला सूज्ञ सातारकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आणि तो सोशल मीडियावरही दिसून आला. सातारकर नागरिकांमध्ये संतापाची प्रचंड भावना आहे हे सुद्धा ‘तरुण भारत’ला व्यक्त केलेल्या भावनांवरुन दिसून येत आहे.
गुन्हा दाखल करताना कुचराई का?
साऱ्या राज्याला हादरवणाऱ्या या प्रकारानंतर सातारा पोलिसांकडून कडक आणि धडक कारवाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र यात तकलादू फेऱ्यांच्या दबावावर गुन्हे दाखल करण्यात आले. वास्तविक हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणात घटनास्थळीचा म्हणजेच हॉटेल मालक यांच्यावर 11 नंतर हॉटेल चालू ठेवले, प्रदूषण केले असले गुन्हे नाहीत. पोलिसांनी उल्लेख केलेल्या बारबालांचा शोध नाही, असे अनेक कंगोरे असताना गुन्हा दाखल करताना कुचराई का?
मेढा हे काय रावण गँगचे अंगण आहे काय?
महाराष्ट्रातील गुन्हेगारांना लपण्यासाठी जावली तालुका हे काय नंदनवन आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील कुविख्यात ‘गजा मारणे’पासून साऱ्यां गुंडांचे मेढा हे काय अंगण आहे काय? अशा गुंडांना आश्रय देणारे अधिकारी राज्य शासनाच्या यंत्रणेसमोर सापडत नाहीत काय?
‘पृथ्वीराज’ किमान ‘मेढा’ तरी सांभाळा
या प्रकरणाची संबंध जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पृथ्वीराज असे आहे. या वार्तांकनामध्ये कार्यक्षेत्र असलेल्या त्यांच्या या परिसरातील त्यांनी माहिती द्यावी. अधिकारी असताना घटना पदान्वये असते. व्यक्तीगत येताना आपणच दोषी आहे हे त्यांनी सिद्ध करू नये. बाकी साहेबांना सलाम...!