नूतनीकरणावर नियंत्रण कोणाचे?
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये सुरू असलेल्या डागडुजी, नुतनीकरणांतर्गत काही ठिकाणी नवीन बसवलेल्या फरशा निखळल्या आहेत. गिलाव्याचे ढपले पडू लागले आहेत. याबाबत सीपीआरमधील कर्मचाऱ्यांनी अधिष्ठात्यांकडे तक्रार दिली आहे. डागडुजीच्या कामावर शंका उपस्थित केली असून कामाचा दर्जा तपासण्याची मागणी होत आहे.
सीपीआरमध्ये अनेक विभागात बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी सिमेंट, विटा, फरशी, सळी व वाळू अस्ताव्यस्त पडली आहे. सिमेंटची पोती घट्ट होऊन पडली आहेत. सिमेंटच्या पोत्यावरूनच नागरिकांची ये-जा सुरू आहे. घट्ट झालेले सिमेंट खराब होत असून या बदल्यात बांधकामासाठी कुठले सिमेंट वापरले जाते? कमी पडलेल्या सिमेंटची भरपाई कोठून केली जाते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुतनीकरणाचे काम सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी म्हणावे तितके काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कामाला गती देण्याची गरज आहे.
‘सीपीआर’मधील नुतनीकरणाच्या कामाची मुदत 30 महिन्यांची आहे. यातील 6 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. दोन वर्षात याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकाच वेळी सर्व विभागातील डागडुजीचे काम सुरू असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. स्वच्छतागृहाच्या पाईप फुटल्या असून यातील पाणी सर्वच विभागासमोरून वाहत आहे. ड्रेनेज लाईनही तुंबून मैलमिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा रूग्ण, नातेवाईक, डॉक्टर, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, निवासी डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे.
जुन्या इमारतींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. सुमारे 140 वर्षापुर्वीच्या इमारतीमधींल शौचालये, स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. ड्रेनेजलाईन व स्वच्छतागृहांच्या जुन्या पाईप फुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी वैद्यकीय निधीतून तब्बल 46 कोटींचा निधी प्राप्त करून दिला. यातून जुन्या फरशा बदलणे, आधुनिक तंत्रज्ञ विकसित करणे, डागडुजीकरण आदी कामे सुरू आहेत. सहा महिन्यांपासून येथील नुतनीकरणाचे काम सुरू आहे. सध्याच्या कामाची गती, त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात असून प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक विभागासमोर खरमाती व धुळ
सीपीआरमध्ये सर्वच विभागातील डागडुजीकरण सुरू आहे. यातून पाडापाडी केलेले साहित्य तसेच पडून आहे. क्षय व उरोरोग विभागासमोर फरशी कटींगचे काम सुरू असल्याने येथे धुळ असते. भोगावती, वारणा, दुधगंगा, कोयना या इमारतीसमोर खरमातीसह अस्ताव्यस्त साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. काम सुरू होऊन निम्मे वर्ष होत आले तरी अजून 25 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. काम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. काम पूर्ण होण्यास 2 वर्षाच्या कालावधीची मुदत असली तरी कामाची स्थिती पाहता काम पुर्ण होण्यास नेमका किती वर्षाचा कालावधी लागेल, असा प्रश्न केला जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे
नुतनीकरण व डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते. अडीच वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण होण्याची मुदत आहे. अजून दोन वर्षाचा कालावधी असला तरी कामाला गती येणे आवश्यक आहे. कामाचा दर्जा तपासणे व साहित्यांच्या वापराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे अपेक्षित आहे. रूग्णांना बांधकामाचा त्रास होणार नाहाहृ याची दक्षता निश्चितच घेतली जाईल.
डॉ. सत्यवान मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर
‘सीपीआर’ची स्थिती
एकूण इमारती : 18
एकूण वॉर्ड : 36
बेडची संख्या : 800
रोज येणारे रूग्ण : 1 हजार ते 1500
रोज अॅडमिट रूग्ण : 250