गोव्याच्या अब्रूची चिंता कुणाला?
कसली अब्रू अन् कसले काय, राजकारणात अब्रूची चिंता आहे कोणाला? अब्रूचे घेऊन बसल्यास सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण तरी कसे होणार. शिवाय राजकारणाचा धंदाही करता येणार नाही. खालच्या पातळीचे हनन होऊनही राजकारणात ते गांभीर्याने घेतले जात नाही. एखाद्याने न्यायालयाची वाट धरली तरी पुढे फारसे काही बिघडत नाही ही वस्तुस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींची शंभर कोटींची अब्रूनुकसानी झाली आहे. त्यांनी आपच्या नेत्याविरूद्ध शंभर कोटींचा दावा गुदरला आहे. बिचाऱ्या गोव्याच्या अब्रूला मात्र, किंमतच राहिली नसल्याचे दिसते. खरा प्रश्न गोव्याच्या अब्रूहानीचा आहे, नेत्यांचा नव्हे. गोव्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्यांविरूद्ध दावा कोण ठोकणार?
सुंदर, शांत अन् निसर्गरम्य गोवा भविष्यात विविध प्रकारच्या कांडांमध्येच तर हरवणार नाही अशी चिंता गोव्यावर प्रेम करणाऱ्यांना वाटू शकते. नोकरी फसवणूक कांड, भू बळकाव कांड, अश्लील व्हिडिओ कांड, कॅसिनो, सनबर्न, ड्रग्जकांड, वेश्या व्यवसाय अशा अनेक कांडांनी गोवा हल्ली देशात गाजत आहे. गोव्याच्या जमिनींचा सौदा करायला भलतेच लोक पुढे सरसावलेले आहेत. जो तो गोव्याच्या जमिनेंवर तुटून पडत आहे. त्यामुळे भू बळकाव, फसवणूक, हल्ले, अपहरण अशा घटनांची गोव्यात कमी राहिलेली नाही. पोलीस खात्यालाही घरघर लागलेली आहे. कारण आहे राजकारण आणि धंदा. या सर्व गैरकांडांमुळे गोव्याची बदनामी होत आहे. गोव्याच्या अब्रूचेच धिंडवडे निघत आहेत याचेच चिंतन व्हायला हवे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला आपल्या अब्रूनुकसानीची चिंता असणे योग्यच आहे परंतु सद्यस्थितीत प्रश्न केवळ एखाद्या नेत्याच्या पत्नीच्या अब्रूचा राहिलेला नाही. आता भीती निर्माण झाली आहे गोव्याच्या अब्रूच्या रक्षणाची. काय घडत नाही आज गोव्यात, कुठले कांड घडत नाही या इवल्याशा गोव्यात आणि भविष्यात काय काय घडू शकते, याचाही विचार आपल्या अब्रूहानीचा विचार करणाऱ्यांनी करावा. सनबर्न नावाची संस्कृती गोव्याच्या कुठल्याच कोपऱ्याला नको आहे. सर्वसामान्य गोमंतकीयांना ती गोव्याची बदनामी वाटतेय. निवडक लोक खोऱ्याने पैसा ओढतील. इतरांना कुठल्याच दृष्टीने तो उत्सव हिताचा वाटत नाही. परंतु सरकारला हवे असेल तर सनबर्न अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होईल यात संशय नाही. ज्यांना सनबर्न कोणत्याही परिस्थितीत हवा आहे. त्यांनी धारगळवासियांचा अर्धा विरोध मोडून काढलेलाच आहे. हळूहळू सर्वांनाच हात टेकण्यास भाग पाडले जाईल. जनतेची विरोधाची मागणी मान्य करून कोटी कोटींच्या कमाईवर पाणी सोडण्याची तडजोड करण्याचे धाडस कुणी करणार नाही. गोव्याच्या बदनामीची चिंता कुणीच करणार नाही. सरकारने सनबर्न प्रकरणात गोव्याच्या अब्रूची चिंता नाही केली, निदान सरकारने गृहखात्याच्या अब्रूची चिंता करायलाच हवी. कोण कुठला सुलेमान गोमंतकीयांची झोप उडवतोय. कोठडीतला गुन्हेगार पोलिसालाच आपल्यासोबत घेऊन सन्मानाने पसार होतोय, शिवाय मुक्कामी पोहोचल्यानंतर सत्ताधारी आमदार आणि पोलिसांविरूद्ध नानाविध आरोप करून मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यालाच आव्हान देतोय. ही गोव्याची बेअब्रू नव्हे तर दुसरे काय म्हणावे?
भू बळकाव प्रकरणासह विविध गुन्हेगारी प्रकरणातील निर्ढावलेला गुन्हेगार सुलेमान सिद्धीकी खान याने इतर राज्यांच्याही पोलीस कोठडीचा पाहुणचार घेतलेला आहे. तो काही सहजासहजी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दोन वर्षांहून अधिक काळ त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. अशा गुन्हेगाराला एका कॉन्स्टेबलच्या पहाऱ्यात ठेवून बिनधास्त राहणे बड्या पोलीस अधिकाऱ्यांना धोक्याचे का वाटले नाही. एवढ्या सहज पोलीस कोठडीतून बाहेर पडता येत असेल तर ती पोलीस कोठडी की गेस्ट हाऊस असा प्रश्न उपस्थित होतो. फिल्मी स्टाईलने कोठडीतून पसार होण्याचा गोव्याच्या इतिहासातील हा पहिलाच प्रकार गोवा सरकारच्या इज्जतीचे धिंडवडेच काढणारा ठरला आहे. गोव्यातील जनतेने आता कोणाविरूद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकावा याचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने दिले तर अधिक बरे होईल.
सौ. सावंत यांच्यावर नोकरीकांडात सहभाग असल्याचे आरोप विरोधकांनी केले. त्यामुळे त्यांच्या अब्रूची नुकसानी झाली असा त्यांचा दावा आहे. नाहक आरोप कुणी सहन करूच नयेत. परंतु उठसूठ कुठल्याही थराला जाऊन आरोप करणे ही आजच्या राजकारणाची रीत बनलेली आहे. ती कुणी फारसे गांभीर्याने घेते असेही नाही. सौ. सावंत यांनी आपल्यावरील आरोप गांभीर्याने घेतले हे त्यांनी योग्यच केले. एखाद्याची बेइज्जती करण्यासाठी, त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यासाठी हल्ली सोशल मीडिया हेही आयते माध्यम उपलब्ध आहे. राजकारणात या माध्यमाचा गैरवापर होतोय. आपल्या मंत्री, आमदारांना या माध्यमाने कितीतरीवेळा बदनाम केलेले आहे आणि पुढेही धोका आहेच. तरीही कायदा करणारे आणि कायद्याचे रक्षक म्हणवणारेही हतबल झालेले आहेत. पुरावे नसताना ताळतंत्र सोडून आरोप करणे हा आता राजकारणातील खेळ झालेला आहे. प्रकरण अंगलट आले तर फार फार तर माफी मागितली जाते किंवा अशी प्रकरणे हवेतच विरली जातात. गोव्यात खरेतर सद्यस्थितीत एखाद्या नेत्याच्या अब्रूचा प्रश्न फार गंभीर राहिलेला नाही. प्रश्न राहिला आहे गोव्याच्या इभ्रतीचा.सुलेमान सिद्दीकी प्रकरणाने गोव्याच्या अब्रूनुकसानीचा कहरच केला आहे. हा कोटी कोटींचा बादशहा आहे याची प्रचिती त्याच्या व्यवहारांवरून पोलिसांनाही आलेलीच असेल. त्यामुळे त्याने दाखवलेल्या मोहाला अमित नाईक हा पोलीस बळी पडला असेल तर नवल नाही. कोठडीतल्या चोराने पळून गेल्यानंतर पोलीस आणि राजकारण्यांविरूद्ध व्हिडिओ काढून आपली मुजोरीही दाखवली. त्याचे आरोप खोटे असतील तर आता राजकारण्यांनी आणि पोलिसांनीही सुलेमानविरूद्ध अब्रू नुकसानीचा खटला गुदरता येईल का पहावे. गोवा हुबळीचे नाते आता बरेच पुढे गेलेले आहे. अनेक सुलेमान गोव्यात धुडगूस घालत आहेत. गोव्याची हवी तशी बेअब्रू करीत आहेत. सरकारने या अब्रूनुकसानीची चिंता जरूर करायला हवी.
सुलेमान कोठडीतून पोलिसासह पळून गेला हा खाकी वर्दीला लागलेला कलंक आहे यात संशय नाही. त्यामुळे या घटनेचे विरोधी नेत्यांनी राजकारणासाठी भांडवल करणे यात गैर काही नाही. पळून गेल्यानंतर राजकारणी आणि पोलिसांविरूद्ध त्याने केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी ही मागणीही योग्यच आहे. मात्र, त्यासाठी ज्यांना सुलेमानचा व्हिडिओ उपलब्ध झाला, त्यांनी पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करणेही अपेक्षित आहे. पोलिसांनी त्या व्हिडिओचा पाठलाग करावाच आणि गुन्हेगाराला पुन्हा शोधून काढावे व पोलीस खात्याची शान राखावी. तेवढीच अब्रूनुकसानी टळेल.
अनिलकुमार शिंदे