राज्यप्राणी ‘गव्या’ला रस्त्यावर कुणी आणले?
काही दिवसांपूर्वीची घटना. फोंडा शहरालगत बेतोडा-बोरी बगलरस्त्याजवळ गव्यारेड्याच्या हल्ल्यात एका गृहरक्षकाचा बळी गेला. त्याच भागात रस्ता ओलांडताना अशाच एका गव्याची, धावत्या कारगाडीला धडक लागली. त्यात सुदैवाने पती-पत्नी बचावले. रानात फिरणारे गवे आता शहरात आणि घराशेजारील बागायतीमध्ये फिरकताना आढळतात. ओंकार हत्ती अधूनमधून पेडणे तालुक्यात दर्शन देतो. वन्यप्राणी व मानवी संघर्ष हा केवळ गोव्यातच दिसत नसून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पट्टेरी वाघ व बिबट्याकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या सातत्याने कानावर पडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा लोकवस्ती व शहरी भागाकडे वाढता संचार हा, चिंता आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे.
अधूनमधून घडणाऱ्या या घटनांतून, कधी वाघ, कधी हत्ती, कधी अस्वल तर कधी गवारेडा हा खलनायक ठरतो. त्यामागील खरी परिस्थिती मात्र लपविली जाते. मुळात या वन्यप्राण्यांना रस्त्यावर कुणी आणले? या प्रश्नाला बगल देता येणार नाही. ज्या बेतोडा-बोंडबाग भागात सध्या या गव्याचा वाढता संचार सर्वत्र आढळतो तेथून गेलेला बगलस्ता या वन्यप्राण्यांच्या अधिवासाआड आलेला आहे. वाढती रहदारी, औद्योगिक दळणवळण यासाठी महामार्गांचा विस्तार व बगलरस्ते ही काळाची गरज आहे. जेथून बगलरस्ते व महामार्ग जातात, तेथे नवीन लोकवस्त्या आणि व्यावसायिक बांधकामे तेवढ्याच झपाट्याने उभी राहतात. त्यासाठी पहिला बुलडोझर शेती, बागायती व आसपासच्या रानांवर फिरतो. बेतोड्यासह राज्यातील अन्य भागात सध्या हेच चित्र दिसते. महामार्गांसाठी जेथे माणसांची घरे आड येतात, तेथे अशा प्रकल्पांना विरोध होतो. संघर्ष उभा राहतो. वन्य प्राण्यांचा अधिवास आणि संचारक्षेत्रे या विकासाच्या आड केव्हा भकास होतात, ते कळतही नाही.
बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंती, वन्य प्राण्यांच्या भ्रमण क्षेत्रात अडथळा ठरत असल्याचे आता जाणवू लागले आहे. परिणामी गवेरेडे व अन्य प्राणी एकाच बाजूला अडकून पडले आहेत. तेथून बाहेर पडताना गजबजलेली लोकवस्ती वा भर शहरामधून वाट शोधण्याची नामुष्की या प्राण्यांवर ओढवली आहे. हे केवळ एका विशिष्ट प्राण्याबाबत घडत नसून इतर वन्यप्राण्यांचीही अवस्था या दुष्टचक्रात अडकून सैरभैर झाली आहे. वनखाते, सार्वजनिक बांधकाम खाते व अन्य संबंधित खात्यांना या प्राण्यांचा विचार करणे, हे आपले उत्तरदायित्त्व वाटत नाही. बगलरस्त्यांपर्यंत विकासाचा विचार ठीक आहे पण खासगी बांधकामे व व्यावसायिक हव्यासापोटी गवेरेडे व अन्य प्राण्यांचे अधिवास विकण्याची घाई, या समस्येचे मूळ कारण आहे. त्याला जेवढे जमीनमालक तेवढेच वनखाते व शासनही जबाबदार ठरते.
गवारेडा हा गोव्याचा राज्यप्राणी असून त्याच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी वनखात्याची आहे. या जबाबदारीचे भान सोडाच साधी संवेदनाही दिसत नाही. गोव्याच्या रानात पट्टेरी वाघच नाहीत आणि बेतोड्यात गृहरक्षकावर केलेला हल्ला गव्याचा मुळीच नाही, असे बेधडकपणे सांगून हात झटकणाऱ्या वनखात्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवायच्या. वन्यप्राण्यांचा लोकवस्तीमध्ये वाढता संचार व माणसांवर होणारे हल्ले, यामागील विविध कारणांपैकी हे एक कारण असले तरी इतर गोष्टींकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये तापमानातील उष्मा वर्षागणिक उच्चांक गाठत आहे. अगदी फेब्रुवारीपासून उष्णता वाढत आहे. सध्या तापमान 38 ते 40 डिग्रीपर्यंत वाढले असून माणसाला हे वातावरण असह्या झालेले असताना वन्यप्राण्यांचे काय हाल होत असतील? शेवटी पर्याय एकच उरतो, ओसाड जंगले सोडून पाणी आणि खाद्याच्या शोधात लोकवस्तीजवळील शेती-बागायतीचा. सरकारच्या ताब्यात असलेल्या खासगी वनक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या या माफक गरजा भागविण्याची क्षमता उरलेली नाही. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात झाडे लावून वनीकरणाचे धोरण आखले तेव्हा गोव्यातील जंगले निऊपयोगी वृक्षलागवडीने सजली. त्यात वन्यप्राण्यांची गरज भागविण्याची तरतूद कुठेच नव्हती. ही गोष्ट बऱ्याच उशिरा लक्षात आल्यानंतर पाणथळांचे जतन व जनावरांच्या खाद्यासाठी उपयुक्त झाडांच्या लागवडीचे उपक्रम सुरू झाले. सांगे व धारबांदोडा तालुक्यातील खाण उद्योग, चिरेखाणी, खडी क्रशरनी वन्यप्राण्यांचे अधिवास तोडले. रानात ससेहोलपट झाल्याने गावात आणि शहराकडे येण्याच्या जनावरांच्या वाटा बंद करणे अवघड बनले आहे. हा संघर्ष अजून वाढणार आहे. पण त्यात भरडला जाणार तो अन्नदाता शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा घटक असलेले वन्यप्राणी...!
सदानंद सतरकर