For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचे राजकीय शत्रू कोण ?

06:50 AM Aug 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपचे राजकीय शत्रू कोण
Advertisement

भाजप हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा पक्ष आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला मोठं करायचं आणि कोणाला संपवायचं हे सगळं भाजपच्या ध्येय धोरणावर आणि राजकारणावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर, महायुतीत सारे काही आलबेल असल्याचे दिसत नाही, एकीकडे उध्दव ठाकरे हे भाजपच्या जवळ येत असल्याच्या चर्चा घडत असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय होण्याची चर्चा घडताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीपूर्वी मोठा भूकंप घडणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात भाजपला 2029 च्या विधानसभा निवडणूका स्वबळावर लढवून सत्ता आणायची आहे, त्यासाठी लवकरच मिनी विधानसभा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये भाजपला आपले वर्चस्व सिध्द करायचे आहे.

Advertisement

महाराष्ट्रात भाजपने कितीही बेडक्या फुगवल्या तरी महाराष्ट्रात उध्दव ठाकरे आणि शरद पवार या दोन राजकीय घराण्याशिवाय भाजपला कोणी टोकाचा विरोध करताना दिसत नाही. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत या दोन नेत्यांनी भाजपला वेठीस धरले आहे. उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतफत्वालाच सरळ लक्ष्य करताना दिसत आहेत. शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जात होते, मात्र आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. पवारांच्या राजकारणाचा अंदाज भल्याभल्यांना येत नव्हता, पहाटेचा शपथविधीबाबत अजूनही पवारांकडे शपथ घेणारे दोन्ही नेते बोट दाखवतात.

दोनच दिवसापूर्वी शरद पवारांनी आपणच वसंतदादांचे सरकार पाडल्याचे सुतोवाच पहिल्यांदा केले. दुसरीकडे त्यांचे पुतणे अजित पवारांनी रोहीत पवार यांना निवडून आणण्यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न केल्याचे ते वारंवार सांगतात, कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीने युतीधर्माचे पालन केले नसल्याचा आरोप राम शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निकालानंतर केला होता. दोन्ही पवारांची भूमिका ही नेहमी धनगर नेत्यांच्या विरोधात राहीली आहे. म्हणून राम शिंदेंना पाडले तर महादेव जानकरांना परभणीत धाडले, त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र भाजपच्या उमेदवारांना शिवसेनेच्या कोट्यातील जागा दिल्या. नव्हे त्यांना निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न केले, अंधेरी (पूर्व) मुरजी पटेल या मूळ भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेने तिकीट दिले, तर मुंबादेवी मतदार संघातून शायना एनसी यांना उमेदवारी दिली. एनसी यांचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना शिंदे गटाने मोठी संधी दिली, त्यांची शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

Advertisement

दुसरीकडे अजित पवारांकडून मात्र युतीधर्माचे पालन होताना दिसत नाही. देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांना फ्रि हॅन्ड दिला जात आहे, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची कोंडी होत असल्याचे दिसत आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अचुक संधी साधणारे नेते म्हणून ओळखले जातात. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर ते लक्ष ठेवून आहेत, गणपतीत मराठा समाजाचा मोठा मोर्चा हा मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी पवार हे महायुतीतील एकनाथ शिंदे यांचे महत्त्व वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यामुळे प्रवक्ते सुरज चव्हाण याचे आधी निलंबन केले. त्यानंतर त्याचे प्रमोशन केले, त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात मराठा समाजाचा रोष आहे. शरद पवारांचा पाया हा भाजपविरोधी राजकारणाचा राहिला आहे. गेल्या चार वर्षात उध्दव ठाकरे आणि शरद पवारांनी काँग्रेसला मागे टाकत भाजपविरोधी पक्ष म्हणून राज्यात स्वत:ला सिध्द केले आहे.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते, तर एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्याबाबत बोलताना शरद पवारांनी शिंदे हे कमी बोलतात मात्र ते योग्य वेळी निर्णय घेतील असे सुतोवाच करताना काही संकेत देण्याचा प्रयत्न केला, तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी मुंबईत फक्त उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची ताकद असल्याचे बोलल्यानंतर पवारांनी मुंबईत मोठ्या इमारती असल्या तरी त्यात मराठी माणूस नसल्याचे सांगत ठाकरे यांची हवा काढली. शिवसेना फुटीनंतर उध्दव ठाकरे यांनी खरी शिवसेना कोणाची हा अजेंडा घेत भाजपविरोधी राजकारण अग्रस्थानी ठेवलं, तर शरद पवारांनी मात्र खरी राष्ट्रवादी कोणाची हा अजेंडा घेतल्याचे दिसत नाही.

अजित पवारांनी आपली धर्मनिरपेक्ष भूमिका सोडली नाही, अधूनमधून काका-पुतणे एकत्र येतात, तर कधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होतात. मात्र त्या तुलनेत शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा होत नाहीत, कारण राष्ट्रवादीतील वाद हा घरगुती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला रोखण्याची ताकद ही शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यात आहेत. भाजपची खरी डोकेदुखी हे दोन नेते आहेत, विरोधकांना एकत्र ठेवण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे तर उध्दव ठाकरे यांच्याकडे असलेला शिवसेनेचा पारंपारिक मतदार हा महायुतीकडे वळविण्यात भाजपला यश मिळताना दिसत नाही.

शिवसेना हा भाजपचा गुलाम नाही हा संदेश ठाकरेंनी लोकांपर्यत पोहोचवला आहे. त्यामुळे भाजपचा प्रमुख विरोधीपक्ष म्हणून शिवसेनेने आपली जागा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे जातीय राजकारणावर शरद पवारांची पकड आहे, त्यामुळे भाजपने कितीही मित्रपक्ष बदलले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे हेच भाजपचे खरे राजकीय शत्रू असणार आहेत.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.