मंदिरांना ‘लक्ष्य’ बनविणारे गुन्हेगार कोण?
पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त : पंधरवड्यात तीन मंदिरांत चोरी, एकाही प्रकरणाचा तपास नाही : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. याबरोबरच गुन्हेगारांनी बेळगाव येथील मंदिरांना लक्ष्य बनविले आहे. केवळ पंधरवड्यात बेळगाव शहर व तालुक्यातील तीन मंदिरे फोडण्यात आली आहेत. मंदिरात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. याआधीही मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. अलीकडे पुन्हा अशा घटना वाढीस लागल्या आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर खानापूर तालुक्यातील मंदिरेही गुन्हेगारांच्या ‘रडार’वर आहेत. केवळ पंधरवड्यात बेळगाव शहर व तालुक्यातील 3 व खानापूर तालुक्यातील एक अशी चार मंदिरे चोरट्यांनी फोडली आहेत.
देव, धर्म, मंदिरांचा विषय आला की कोणीही धार्मिक ठिकाणावर गुन्हे करण्याचा धाडस करीत नव्हते. आता धार्मिक ठिकाणांनाच गुन्हेगारांनी लक्ष्य बनविले आहे. पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या बंदोबस्तात मग्न आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. मंदिरांना लक्ष्य बनविणारे गुन्हेगार स्थानिक आहेत की परप्रांतीय आहेत. याविषयीचा उलगडा झाला नाही. देव-देवतांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, तांबे, पितळी भांडी व दानपेटी पळविण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी मंदिरांना लक्ष्य बनविणारी टोळी बेळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. त्यानंतर धार्मिक स्थळांवरील चोऱ्या थांबल्या होत्या. आता घरफोड्यांच्या बरोबरीने धार्मिकस्थळांना लक्ष्य बनविण्यात येत असून या प्रकारांनी भाविक थक्क झाले आहेत.
16 सप्टेंबर रोजी वडगाव येथील श्री महादेव मंदिराचा कडी-कोयंडा तोडून पाऊणलाखाचे साहित्य चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले आहे. एक आठवड्यानंतर शनिवारी संबंधितांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. देसूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर फोडण्यात आले आहे. 21 सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. कडोली येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. गुरुवार दि. 21 सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सुमारे 50 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. लोकोळी (ता. खानापूर) येथील श्रीलक्ष्मी मंदिरात चोरी झाली आहे. 11 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
चोरट्यांनी 26 ग्रॅम सोने, 50 ग्रॅम चांदीचे दागिने पळविले आहेत. केवळ 15 ते 20 दिवसांत बेळगाव व खानापूर तालुक्यातील चार मंदिरे फोडण्यात आली आहेत. यापैकी एका प्रकरणाचाही छडा लागला नाही. गेला महिनाभर पोलीस यंत्रणा गणेशोत्सव व त्यानंतर ई-ए-मिलादच्या बंदोबस्तात व्यस्त होती. हे दोन्ही बंदोबस्त संपल्यानंतर आता दसऱ्याची तयारी सुरू आहे. दसऱ्या पाठोपाठ 1 नोव्हेंबर त्यानंतर दिवाळी बंदोबस्त येतो. दिवाळी संपल्यानंतर सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्ताची तयारी करावी लागते. बेळगाव पोलीस आयुक्तालयावर बंदोबस्ताचा ताण आहे. याच परिस्थितीचा फायदा गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत. सततच्या बंदोबस्तामुळे गुन्हेगारी प्रकरणांचा तपास रखडला आहे.
सहा महिन्यांपूर्वी बस्तवाड, बिजगर्णी, मास्तमर्डीसह तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील मंदिरांमध्ये झालेल्या चोरी प्रकरणांचा अद्याप तपास लागला नाही. दि. 27 जुलै 2024 रोजी मास्तमर्डी येथील श्रीलक्ष्मी मंदिरात चोरी झाली होती. चोरट्यांनी देवीच्या अंगावरील सुमारे 1 लाख रुपये किमतीचे दागिने पळविले होते. या प्रकरणाचाही अद्याप तपास लागला नाही. भरवस्तीतील मंदिरांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. अनेक मंदिरात तर मध्यरात्रीपर्यंत भजन चालते. भजनानंतर मंदिरात चोरीचे प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत. पोलिसांनी मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी केली जात आहे. अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, खबऱ्यांची कमतरता, सततचा बंदोबस्त, त्यासाठी होणारी धावपळ आदी कारणांमुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलीस दलाला शक्य होत नाही, अशी स्थिती आहे. पोलीस बलाबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मंदिरातील चोऱ्यांचा छडा लावण्याची मागणी केली जात आहे.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार
यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या पंधरवड्यात तीन मंदिरांमध्ये चोरी झाली आहे. ही गोष्ट खरी आहे. गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या बंदोबस्तातून आम्ही मोकळीक झालो आहोत. मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
- पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस