अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात
अलिबाग
उन्हाळ्यासाठी खास मागणी असणारा अलिबागचा पांढरा कांदा आता बाजारात दाखला झाला आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे हा कांदा नेहमीपेक्षा उशीराने बाजारात दाखल झाला आहे.
पांढरा कांदा उन्हाळ्यासाठी फारस औषधी आणि गुणकारी मानला जातो. या कांद्याच्या हंगामाची सुरुवात असल्याने इथून पुढे काही दिवस तरी कांद्याचे दर वाढलेले राहण्याची शक्यता आहे. कांद्याची एक माळ २५० ते ३०० रुपयांना विकली जात आहे, अशी माहीती शेतकऱ्यांनी दिली.
पांढरा कांदा हा साधारण जानेवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसातच बाजारात येऊ लागतो. चव आणि औषधी गुणधर्म असल्याने कांद्याला मागणी जास्त आहे, त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने पांढऱ्या कांद्याला दर जास्त प्रमाणात मिळतो.
अलिबाग तालुक्यातील नेहुली, कार्ले, तळवली, खंडाळे या गावांमध्ये प्रामुख्याने पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जाते. भाताची कापणी झाल्यानंतर म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटाला पांढऱ्या कांद्याची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाते. साधारण नव्वद दिवसात कांदा तयार होतो. त्यामुळे सध्या कांद्याच्या काढणीचे काम वेगात सुरु आहे. तसेच वाळलेल्या कांद्याच्या वेण्या बनवण्याचेही काम वेगाने सुरु आहे. यातून महिला वर्गालाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. पांढऱा कांदा व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन उचल करतात. त्यामुळे कांद्याला भाव चांगला मिळतो.
मागणी जास्त असल्याने आसपासच्या अनेक गावात या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यंदा पांढऱ्या कांद्याचा आकार मोठा असु शकतो, कारण पाऊस लांबल्याने पिकाला पाणी मुबलक मिळाले आहे.