विधानपरिषद निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांकडून व्हिप जारी
7 जागांसाठी 8 उमेदवार : क्रॉस वोटिंगची शक्यता
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षात तीव्र चुरस निर्माण झालेल्या विधानपरिषदेच्या 7 जागांसाठी आज गुरुवार, 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात असल्याने सातव्या जागेवर कोणाची सरशी होणार, याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
काँग्रेस, भाजप आणि निजद पक्ष विधानपरिषद निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहेत. तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना व्हिप जारी केले असून क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत कसरत करत आहेत. भाजपला क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे.
राजकीय रणनीती म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मंगळवारी सकाळीच रामनगरमधील खासगी रिसॉर्टमध्ये हलविले होते. हे आमदार गुरुवारी सकाळी रिसॉर्टमधून मतदानासाठी थेट विधानसौधमध्ये दाखल होतील. विधानसौधमध्ये सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल तर सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार मतदान करतील. विधानसभेतीस सदस्य बळानुसार काँग्रेसला चार, भाजपला दोन जागा सहज मिळतील. भाजपच्या पाठिंब्यात सातवी जागा मिळविण्यासाठी निजदने प्रयत्न आहेत. तर दुसरीकडे निजदला शह देण्यासाठी अपक्ष तसेच भाजपमधून हकालपट्टी झालेल्या दोन आमदारांच्या मदतीने पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली आहे. काँग्रेस पक्षातून पाचवा उमेदवार असणारे विनय कार्तिक आणि निजदचे गोविंदराजू यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल, हे गुरुवारी सायंकाळी निकालानंतर स्पष्ट होईल.
विधानसभेत एकूण मतदारांची (आमदार) संख्या 222 इतकी आहे. (काही आमदारांची अपात्रता आणि मृत्यूमुळे दोन जागा रिक्त) जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 28 मतांची आवश्यकता आहे.
केवळ आकड्यांचा खेळ नव्हे!
ही निवडणूक केवळ आकड्यांचा खेळ नाही तर राजकीय रणनीतीची कसोटी आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवून मते फुटू नयेत याची खबरदारी घेतली आहे, तसेच संभाव्य परिस्थितीचा विचार करून मतदानाचे प्रात्यक्षिकही घेतले आहे. निजद पक्ष आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपची अतिरिक्त मते आणि इतर पक्षातील नाराज आमदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. भाजप-निजद युती असून देखील काही राजकीय बदलांमुळे क्रॉस वोटिंगची शक्यता वाढली आहे.
अपक्ष आमदारांची सावध भूमिका
अपक्ष आमदारांची आणि भाजपमधून हकालपट्टी झालेल्या आमदारांची मते विधानपरिषदेत निर्णायक ठरणार आहेत. या आमदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप व निजद या दोन्ही पक्षांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. व्हिप जारी असला तरी क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही. मागील इतिहास पाहता यावेळीही अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील एकूण आमदार 222
काँग्रेस 137
भाजप 64
निजद 18
अपक्ष 3
रिक्त जागा 2
उमेदवार
काँग्रेस : बी. के. हरिप्रसाद, तिप्पण्णप्पा कमकनूर, पी. व्ही. मोहन, शिवण्णा मळवळ्ळी, विनय कार्तिक
भाजप : रघु कौटिल्य, लिंगराज पाटील
निजद : गोविंदराजू
भाजपमधून हकालपट्टी झालेले आमदार काँग्रेसच्या गोटात...
सातत्याने काँग्रेसच्या बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावल्याने आमदार शिवराम हेब्बार आणि एस. टी. सोमशेखर यांची भाजपमधून हकालपट्टी झाली होती. या आमदारांनी बुधवारी काँग्रेसचे आमदारांचे वास्तव्य असलेल्या बिडदी येथील रिसॉर्टला भेट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाचवा उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला ही बाब लाभदायक मानली जात आहे.