For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पास्टबुक चाळताना...

06:51 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
पास्टबुक चाळताना
Advertisement

त्या दिवशी पंकज आणि प्रिया भेटायला आले होते. लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. अगदी तरुण जोडपं..

Advertisement

मॅडम वर्षभरापूर्वी आमचं लग्न झालं. अॅरेंज मॅरेज. आमचं दोघांचही छान पटतंय त्यासंदर्भात तसा कोणताच प्रॉब्लेम नाही. परंतु हल्ली प्रिया आपल्याच विचारात असल्यासारखी वाटते आणि तशी वागते. मुळात तिचा स्वभाव तसा शांतच आहे. सुरवातीला मला वाटलं की नवीन घर, नवीन माणसं यामुळे असं असेल. परंतु हल्ली काहीवेळा ती फारच अस्वस्थ असल्याचं जाणवतं. मधेच कधीतरी म्हणते अस्वस्थ वाटतं. गेले चार पाच दिवस तर मी ऑफिसमध्ये असताना दर तीन तासांनी फोन करते. कसा आहेस विचारते, दोन मिनीटे बोलुन फोन ठेवते.

खरंतर तिचा इतर कसलाच त्रास नाही. पण हे वागणं थोडं वेगळं वाटतंय. गप्पा मारताना मी तिला यासंदर्भात विचारायचा प्रयत्न केला पण त्यावर ती काहीच बोलत नाही. मला काळजी वाटली. कुठेतरी काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून आलो. तुमच्याजवळ काही बोलते का पहा...मी ठीक आहे म्हटलं आणि पंकजला बाहेर बसण्याची विनंती केली.

Advertisement

शांत माणसांना बोलतं करणं म्हणजे एकप्रकारे तुमचं कौशल्य पणाला लावण्यासारखंच असतं. काही वेळा अगदी साध्या पद्धतीने संवाद साधत गाडी मूळ प्रश्नाकडे वळवावी लागते.

सुरवातीला प्रियाचं शिक्षण, तिचं माहेर, कुटुंबातील माणसं, आवड हे जाणून घेत संवाद साधायला सुरुवात केली. ती थोडी रिलॅक्स झाल्यावर म्हटलं, ‘पंकज जे म्हणत होते तशा प्रकारे तुला काही त्रास होतो आहे का?’

प्रिया- हो..हो मॅडम. खूप त्रास होतोय हल्ली

बरं..त्रास म्हणजे काय होतंय?

प्रिया- खूप अस्वस्थ वाटतं, भीती वाटते. मॅडम..माझा नवरा खूप चांगला आहे. आमच्यात छान मैत्री आहे. अगदी छान नातं आहे आमचं! पण कधीतरी वाटतं हा आपल्यापासून दुरावला तर?

तू म्हणतेस तुमचं नातं छान आहे, मग तो दुरावेल असं का वाटतं?

प्रिया-‘मृत्यू’ मॅडम ‘मृत्यू’....असं म्हणत ती एकदम हमसून हमसून रडू लागली. आठ दहा मिनीटांनी शांत झाल्यावर मी म्हटलं मला सांग प्रिया ही भीती तुला सर्वांच्या बाबतीत वाटते का?

नाही मॅडम..फक्त त्याच्याबाबतीतचवाटते.

हे जोडलेलं नातं आहे ना..जोडलेली नाती लाभत नाहीत मला. असं म्हणून ती पुन्हा रडू लागली. पाच मिनीटांनी तिने स्वत:ला सावरलं. नियती वाईट आहे हो...

असं का म्हणतेस?

मॅडम, सुरुवातीपासूनच माझं कुटुंब हेच माझं विश्व! आमच्या घरी खूप मोकळं आणि हसतं खेळतं वातावरण! फार मित्र मैत्रीणींची गरजच वाटली नाही कधी!कॉलेजमध्ये माझं सर्वांशी पटायचं. पण खास मित्र मैत्रीण असं कुणी नव्हतं. तेरावीला असताना सृष्टी आणि मिनू यांच्याशी खूप छान मैत्री झाली. खूप घट्ट मैत्री. एकही दिवस एकमेकींसोबत जेवल्याखेरीज गेला नाही म्हणा! आमच्या घरांच्याचीही छान मैत्री झाली. फॅमिली फ्रेंडसच् झालो सगळे!

ट्रीपलाही कित्येक वेळा एकत्र जायचो, गेट टुगेदर व्हायचं खूपदा. सगळं छान चाललं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या रिझल्टच्या आधी सृष्टी आणि मिनू कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. माझी तब्येत बरी नसल्याने मी त्यांच्यासोबत नव्हते. परत येताना त्यांचा अपघात झाला. कसलीच संधी मिळाली नाही. दोघीही कायमचं सोडून गेल्या

मॅडम....प्रिया पुन्हा रडू लागली. मी ही तिला मोकळं होऊ दिलं.

मॅडम त्यानंतर मी फारशी कुणाजवळ अॅटॅच झालेच नाही. लग्न झालं. नवरा, सासू, सासरे सगळे खूप चांगले आहेत. माझा नवरा तर नवऱ्यापेक्षा मित्रच आहे म्हणा! तो नेहमी म्हणतो आपल्यातलं नातं मैत्रीचं हवं..त्यांनी तसं ते जपलंयही. पण मैत्री म्हटली की मला त्या दोघी आठवतात. वेगवेगळे विचार मनात येतात. भीती वाटते, अस्वस्थ वाटतं. वाटतं हा ही आपल्याला सोडून गेला तर? कळतं की हा विचार ठिक नाहीये पण मी स्वत:ला थांबवू शकत नाही. मग मी तो ठीक आहे ना हे पहायला फोन करते. मला थोडं रिलॅक्स वाटतं. गेले दहा बारा दिवस हे असंच होत आहे.

प्रियाला घडलेली घटना, त्या अनुषंगाने तिचं असणारं स्वगत, तिच्या धारणा पडताळायला लावणं गरजेचं होतं. भूतकाळ, वास्तवाची जाणीव, दृष्टीकोनातील बदल या साऱ्या गोष्टी आवश्यक होत्या. काही भेटीनंतर तिची गाडी रुळावर आणण्यात यश आले होते.

आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक चांगल्या वाईट घटनांचा, प्रसंगांचा आपल्याला सामना करावा लागतो. एखादी घटना घडल्यानंतर वेळीच तिच्यातून बाहेर पडता आलं नाही. त्या संदर्भातलं स्वगत सतत मनाशी घोळवत राहिलं तर मात्र सारंच उघडून बसतं! प्रियाच्या बाबतीत घडलेला प्रसंग तर वेगळाच परंतु अनेकांना खूप छोट्या-छोट्या गोष्टी त्या संदर्भातले विचार घोळवत ठेवायची सवय असते. काही वेळा हे विचार एखाद्याच विषयाशी संबंधित असू शकतात किंवा वेगवेगळ्या विषयांशी देखील!

खरंतर भूतकाळात घडलेल्या दु:खद घटना, अपमानकारक प्रसंग, कुत्सीत शेरेबाजी हे आज आठवून उपयोग नसतो उलट त्यावेळी अनुभवलेल्या त्रासदायक भावनांची तेवढ्याच तीव्रतेने नव्याने अनुभूती होऊन अस्वस्थता वाढते. आजच्या समस्येसाठी भूतकाळातील घटना, अनुभवच कारणीभूत आहेत अशी जर धारणा झाली तर ते विचार आपल्या वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही प्रभावित करत राहतात.

वास्तविक भूतकाळात उत्पन्न झालेल्या एखाद्या समस्येचे परिणाम आजही टिकून असल्याचे कारण ती घटना नव्हे तर त्या घटनेसंदर्भातील मनात घोळवत ठेवलेले ‘स्वगत’ असते. जेवढा जास्त काळ त्या विघातक भावना मनात फिरत राहतील तितकी ती व्यक्ती मनोविकाराकडे वळण्याची शक्यता वाढू लागते. आपण माणसं आहोत म्हटल्यावर भूतकाळातील आठवणी, भविष्याची काळजी हे असणारच आहे परंतु जसे आपण पासबुक उघडून जमाखर्चाचा हिशोब पाहतो तसे आयुष्याचे पास्टबुक पाहू लागलो आणि वारंवार ते उघडून पाहण्याची सवय झाली तर मात्र त्या पास्टबुकचं ओझं व्हायला लागतं. मनात येणाऱ्या विचार, भावनांच्याबाबतीत सजग राहणं, साक्षी भावानं त्या न्याहाळणं गरजेचं आहे.

पहा..उदाहरण घ्यायचं झालं तर कॉम्प्युटरचे देता येईल.

समजा आपण लॅपटॉपवरती काम करत असताना काही विंडोज उघडलेल्या आहेत परंतु गरजेच्या नसलेल्या विंडोज मिनिमाइज करून आपलं काम सुरू असतं. काहीवेळा अचानक सिस्टीममध्ये काहीतरी गडबड होते आणि एखादी विंडो पटकन उघडते. परंतु आपण हातातलं काम टाकून लगेच त्याच्या मागे लागत नाही तर ती विंडो परत मिनीमाइज करतो. गरज असेल तर क्लोज करतो आणि पुन्हा कामाला सुरुवात करतो. अगदी तसंच विचारांच्याबाबतीत सरावाने हे तंत्र अवगत करता येतं. अर्थात त्यासाठी सराव मात्र गरजेचा आहे.

आयुष्याची वाटचाल करत असताना भूतकाळातील आठवणी, अनुभव यांचे ‘पास्टबुक’ हे असणारच आहे परंतु मिळालेले अनुभव हे शिकवण न बनता ओझं बनवून अस्वस्थ करू लागले तर मात्र त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आपणच आपल्या मनाची सजगतेने मशागत करून विचार, भावना आणि वर्तन ही साखळी सुसंबद्ध कशी राहील याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे हे मात्र खरं!

अॅड. सुमेधा देसाई

Advertisement
Tags :

.