For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाजनांवर आरोप तर मुनगंटीवारांची नाराजी कायम

06:55 AM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाजनांवर आरोप तर मुनगंटीवारांची नाराजी कायम
Advertisement

भाजपच्या मंत्र्यांवरील आरोपाची मालिका थांबायचे नाव घेत नाही. जयकुमार रावल, जयकुमार गोरे यांच्यानंतर आता संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आयएएस महिलेशी संबंध असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे तर दुसरीकडे मंत्रीमंडळात समावेश करण्यात न आल्याने नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप स्थापना दिनाचा चंद्रपुरात स्वतंत्र कार्यक्रम घेतल्याने भाजपची अंतर्गत नाराजी बाहेर आली आहे. त्यामुळे एकीकडे महाजनांवर झालेले आरोप तर मुनगंटीवार यांच्याकडून वारंवार व्यक्त केली जाणारी नाराजी यामुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

जयकुमार गोरे, जयकुमार रावल आणि आता भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणूकीनंतर महायुतीला पाशवी बहुमत मिळाले, नागपूर येथील सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विनासायास पार पडले. मात्र मंत्र्यांची नियुक्ती आणि खातेवाटप झाल्यानंतर झालेल्या मुंबईतील पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट गेली तर माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपाने अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले. आता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आणि भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि महाजन यांचे जळगाव जिह्यातील पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपाने एकच खळबळ माजली आहे. महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी थेट पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे महाजन -खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. महायुतीतील राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे, तर माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे सरकार स्थापन होऊन अजुन 6 महिने होत नाहीत तोवर पाच मंत्र्यांवर आरोप झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रीमंडळात समावेश न झाल्याने मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचा विरोधीपक्ष नेत्यांची भूमिका बजावली, जिथे संधी मिळेल तिथे मुनगंटीवार यांनी सरकारच्या मंत्र्यांना खडेबोल सुनावले, हे विधानभवन नसून हे लक्षवेधी भवन असल्याचा आरोप त्यांनी अधिवेशनात केला. मात्र अधिवेशनानंतरही त्यांनी आपला हा पवित्रा कायम ठेवला असून दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल, असे वक्तव्य गेल्या आठवड्यात भाजपचे मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसच्या नवख्या प्रतिभा धानोरकर यांनी 2024 च्या लोकसभा निवडणूकीत पराभव केला. लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे सुधीर भाऊंनी सांगितले होते. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत चंद्रपुर या एकमेव लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी पराभव केला होता. 2019 ला भाजपच्या विद्यमान खासदारांपैकी चंद्रपूर या एकमेव भाजप खासदाराचा त्यातही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाल्याने हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे 2024 ला ही जागा पुन्हा भाजपला मिळेल या हेतूने सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने मैदानात उतरवले होते, मात्र भाऊंनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यात बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे प्रतिभा धानोरकर यांना मिळालेली सहानूभुती यामुळे प्रतिभाताईंनी ज्येष्ठ सुधीरभाऊंचा सहज पराभव केला. त्यानंतर 6 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत सुधीरभाऊ निवडून आले, मात्र त्यांना शेवटच्या क्षणी मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. सध्या चंद्रपूरात भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षाकडून बळ देण्याचे काम सुरू आहे. 2019 ला अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या किशोर जोरगेवार यांनी 2024 ला भाजपमध्ये प्रवेश केला, निवडणूक लढविली आणि विजय मिळवला. सध्या चंद्रपूरात भाजपकडून जोरगेवार यांना बळ दिले जात आहे तर दुसरीकडे नाराज असलेले सुधीर भाऊ पक्षाला घरचा आहेर देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. रविवारी भाजप स्थापना दिनाच्या कार्यक्रमात किशोर जोरगेवार आणि भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थितीत एक तर सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दुसरा कार्यक्रम जिह्यात झाल्याने भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपमध्ये आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी पक्षाला आव्हान देण्याचे काम केले त्यांचा पध्दतशीर कार्यक्रम केला आहे. भाजपकडून पंख छाटण्याचे काम केल्यानंतर पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. 2019 ला एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांना विधानसभा निवडणूकीचे तिकीट कापत भाजपच्या तत्कालीन शिर्ष नेतृत्वाने कार्यक्रम केला होता. त्यातील खडसे यांनी आपला नाराजीचा पवित्रा कायम ठेवला होता, मात्र बावनकुळे आणि तावडे यांनी काळाची पावले ओळखत ‘थंडा कर के खाओ’ हे ओळखल्याने आज बावनकुळे यांच्याकडे पहिल्या पाच खात्यातील महत्त्वाचे महसुल खाते तर विनोद तावडे यांनी राष्ट्रीय राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. 2014 ला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात असणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वत:ला सुपर सीएम समजत असत, त्यानंतर खडसे यांना भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही खडसे यांनी आपला पक्षविरोधी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्याने पक्षाने खडसेंना अलगद बाजुला करत गिरीश महाजन यांना बळ देताना खडसे यांचा करेक्ट कार्यक्रम केला. भविष्यात सुधीर मुनगंटीवार यांनी देखील आपला नाराजीचा पवित्रा कायम ठेवल्यास मुनगंटीवारांचा खडसे होण्यास वेळ लागणार नाही.

प्रवीण काळे

Advertisement

Advertisement
Tags :

.