For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोणते मंत्री स्पर्धेत...

06:12 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कोणते मंत्री स्पर्धेत
Advertisement

अमित शहा  केंद्रीय गृहमंत्री

Advertisement

गेली पाच वर्षे अमित शहा केंद्रात गृहमंत्री आहेत. महत्वाच्या दृष्टीने त्यांचे स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खालोखालचे मानण्यात येते. ते गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. हा मतदारसंघ 2019 मध्येही जिंकला आहे. 1989 पासून सलग हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे. यंदाही त्यांना स्पर्धा सोपी असल्याचे दिसत आहे.

ज्योतिरादित्य सिंदिया  नागरी विमानवाहतूक मंत्री

Advertisement

काँग्रेसचे हे नेते 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात आले. ते नागरी विमानवाहतूक मंत्री आहेत. ते मध्यप्रदेशातील गुणा मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. हा मतदारसंघ त्यांनी काँग्रेसचे उमेदवार या नात्याने चार वेळा जिंकलेला आहे. तथापि, 2019 मध्ये त्यांचा भारतीय जनता पक्षाकडून पराभव झाला होता. आता ते येथूनच स्पर्धेत आहेत.

नारायण राणे  केंद्रीय अवजड उद्योग मंत्री

नारायण राणे सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून स्पर्धेत आहेत. या मतदार संघात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रथमच स्पर्धेत आहे. राणे प्रथम एकत्र शिवसेनेत होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते भारतीय जनता पक्षात आहेत. नारायण राणेही लोकसभेची निवडणुकीत प्रथमच स्पर्धेत आहेत. त्यामुळे मोठी उत्सुकता आहे.

एस. पी. सिंग बघेल  केंद्रीय कायदा राज्यमंत्री

उत्तर प्रदेशच्या आग्रा मतदारसंघातून बघेल स्पर्धेत आहेत. त्यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षाने पूजा अमरोही यांना आणि समाजवादी पक्षाने सुरेश चंद यांना उभे केले आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक बघेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने जिंकली होती. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बसप यांची युती होती. पण यावेळी अशी युती नाही.

श्रीपाद नाईक केंद्रीय पर्यटन, बंदरे, जलमार्ग आणि जहाजवाहतूक राज्यमंत्री

उत्तर गोवा मतदारसंघातून नाईक सलग सहाव्यांदा स्पर्धेत आहेत. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. अनेक केंद्रीय विभागांचा पदभार त्यांनी आतापर्यंत सांभाळला आहे. गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते म्हणून त्यांचा आदराने उल्लेख केला जातो.

पुरुषोत्तम रुपाला  केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुसंगोपन, दुग्धोत्पादन मंत्री

गुजरातच्या राजकोट मतदारसंघातून त्यांना यावेळी दोनवेळचे खासदार मोहन कुंडारिया यांच्या स्थानी उमेदवारी दिली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना 2022 ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने विक्रमी पद्धतीने जिंकली होती. त्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले.

मनसुख मांडविया  केंद्रीय आरोग्य मंत्री

केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून कोरोना काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ते प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत आहेत. त्यांना गुजरातच्या पोरबंदर मतदारसंघातून मागच्या निवडणुकीतील यशस्वी रमेशभाई धादुक यांच्या स्थानी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने ललित वसोया यांना उतरविलेले आहे.

देवू सिंग चौहान केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री

गुजरातच्या खेडा मतदारसंघातून ते गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा याच मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 पासून ते केंद्रात मंत्री आहेत. काँग्रेसने त्यांच्या विरोधात कालूसिंग डाभी यांना उतरविले आहे. चांगली कामगिरी केलेल्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये देवू सिंग चौहान यांचा समावेश केला जातो.

भगवंत खुबा  केंद्रीय खते, रसायने आणि पुनउपयोगी ऊर्जा राज्यमंत्री

कर्नाटकच्या बिदर लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवार असून ते या मतदारसंघातून सलग दोनदा निवडून आलेले आहेत. 2019 पासून त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आलेले आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात सागर खांड्रे यांना उमेदवारी दिली आहे. मंत्री म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट मानली जात आहे.

प्रल्हाद जोशी केंद्रीय सांसदीय व्यवहार, कोळसा आणि खाणी मंत्री

कर्नाटकच्या धारवाड-हुबळी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी हा मतदारसंघ  सलग तीनवेळा जिंकला आहे. 2014 पासून ते केंद्रात मंत्री असून त्यांनी सांसदीय व्यवहार मंत्री म्हणून उत्तर कामगिरी केली असल्याचे दिसून येते. लोकसभेत महत्वाच्या विधेयकांवेळी त्यांचे व्यवस्थापन वाखाणले गेले आहे.

चार माजी मुख्यमंत्री...

जगदीश शेट्टर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. ते मूळचे धारवाड येथील असून तेथून त्यांनी अनेकदा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना प्रथमच उमेदवारी देण्यात आलेली आहे.

बसवराज बोम्मई

कर्नाटकातील हवेरी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली असून ते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचे पिता एस. आर. बोम्मई हे देखील कर्नाटकचे माजी दिवंगत मुख्यमंत्री होते. सध्या बसवराज बोम्मई कर्नाटक विधानसभेचे शिग्गाव मतदानसंघातून सदस्य आहेत.

दिग्विजय सिंग 

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांना काँग्रेसने याच राज्यातील राजगढ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते दोनदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने रोडमल नागर यांना उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पक्षानेही येथे उमेदवार दिला आहे.

शिवराजसिंग चौहान 

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना त्याच राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. चौहान 15 वर्षे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठा विजय मिळविला आहे.

Advertisement
Tags :

.