For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमानातले सर्वात सुरक्षित आसन कुठले ?

06:22 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
विमानातले सर्वात सुरक्षित आसन कुठले
Advertisement

अलिकडच्या काळात विमान अपघाताची वृत्ते सातत्याने वाचावयास मिळत असून त्यामुळे एकप्रकारचे चिंतायुक्त कुतूहल जागृत झाले आहे. अनेकांना विमान प्रवासाचीच भीती वाटू लागली आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाच्या एका विमान अपघाताचे वृत्त प्रसारित झाले होते. त्या अपघातात विमानातील 179 प्रवासी प्राणास मुकले होते. तथापि, जणू चमत्कारानेच दोन प्रवाशांचे प्राण वाचले होते. तेव्हापासून विमानातील सर्वात सुरक्षित आसन कोणते, या विषयावर चर्चा केली जात आहे. अर्थातच, विमान अपघातून कोण वाचणार, हे विमानाला कोणत्या प्रकारचा अपघात झाला आहे, यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते.

Advertisement

फोर्ब्ज या संस्थेच्या एका अहवालानुसार आपण जेव्हा विमान प्रवासासाठी आसन आरक्षित करतो, तेव्हा आपली प्राथमिकता विमानात सुलभतेने चढता येईल आणि त्यातून उतरता येईल, अशा स्थितीतील आसनाला असते. तथापि, काही तज्ञांच्या मतानुसार विमानात काही आसने इतर आसनांपेक्षा अधिक सुरक्षित असतात. आपल्याला असे सुरक्षित आसन मिळाले असेल आणि विमानाला अपघात झाला, तर अशा आसनांवर बसलेल्या व्यक्ती वाचण्याची शक्यता अधिक असते.

तज्ञांनी विविध विमान अपघात आणि त्यांच्यातून वाचलेले प्रवासी यांचा अभ्यास हे प्रवासी बसलेल्या आसनांशी सांगड घालून केला. या अभ्यासात असे आढळले आहे, की विमानाच्या पुढच्या भागात असलेल्या आसनांवर बसलेल्या व्यक्तींची वाचण्याची शक्यता 49 टक्के आहे. तर जे प्रवासी विमानाच्या मागच्या भागात असतात त्यांची वाचण्याची शक्यता 59 टक्के इतकी मोठी असते. अमेरिकेच्या राष्ट्रीय विमानप्रवास व्यवस्थापनाने हा अभ्यास 1985 ते 2000 या काळातील विमान अपघातांसंबंधी केला आहे. जे लोक विमानाच्या मागच्या भागाच्या मधल्या भागातील आसनांवर बसले होते, त्यांचा अपघाती मृत्यूदर केवळ 28 टक्के इतका होता. याचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. मागच्या भागातील मधल्या आसनांच्या पुढे आणि मागे प्रवासी असतात. यामुळे जखम होण्याची शक्यता कमी असते. अर्थातच, विमानाला अपघात कशा प्रकारचा होतो, यावर वाचण्याची शक्यता अवलंबून असते. विमान समुद्रात कोसळले किंवा डोंगराळ भागात कोसळले तर कोणीही वाचण्याची शक्यता दुरापास्त असते. त्यामुळे यासंबंधात केलेले अभ्यास आणि त्यांचे निष्कर्ष हे मर्यादित अर्थानेच खरे असतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.