For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईव्हीएम असो, बॅलेट पेपर असो, जनतेचा विश्वास भाजपवरच!

03:05 PM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
ईव्हीएम असो  बॅलेट पेपर असो  जनतेचा विश्वास भाजपवरच
Advertisement

जि. पं. जिंकल्यानंतर मुखमंत्री सावंत यांचा विरोधकांना टोला : ग्रामीण जनताने भाजपला कौल दिल्याबद्दल मानले आभार

Advertisement

पणजी : भारतीय जनता पक्ष हा सामान्य जनतेचा आणि कैवाऱ्यांचा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, म्हणून गरळ ओकणाऱ्या विरोधकांना मतदारांनीच त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे यापुढे विरोधकांनी ईव्हीएम मशिनमुळेच भाजप जिंकत असल्याच्या वल्गना करू नयेत. त्यांचे आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे आता मतदारांनीच दाखवून दिले आहे. देशातील इतर राज्याप्रमाणेच गोव्यातील जनतेचाही भाजपवरच विश्वास आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पणजी येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला एकहाती विजय मिळाल्याने मतदारांचे आभार मानले.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, केवळ गोवाच नव्हे, अख्या देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. त्याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत आलेला आहे. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला 80 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. काही ठिकाणी अवघ्या मतांनीच भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत, अन्यथा भाजपला बहुतांश जागा मिळाल्या असत्या. भाजप-मगो युतीचा हा विजय असून, जनतेला ह्या युतीवर विश्वास असल्याचा दावाही मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

Advertisement

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी चांगला धडा शिकवला आहे. भाजप हा कोणत्याही निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडणुकीस तयार आहे. कारण जनता भाजपच्या पाठिशी आहे. काँग्रेसने आता ईव्हीएमवरून भाजपवर आरोप करून थांबवावे, त्याचशिवाय लोकांमध्येही भ्रम पसरवू नये. मतदारांनी, जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे. यापुढेही नाकारले जाईल, हा आमचा जनतेवर विश्वास आहे, असेही दामू नाईक म्हणाले.

‘माझे घर’ योजना जनतेसाठीच

जिल्हा पंचायत निवडणुकीत आम्ही वावरताना जनतेतून सरकारला आशीर्वाद मिळत होते. कारण आज गावातील घरांचा जो विषय आहे, तो खूप वर्षांपासूनचा आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. ‘माझे घर योजना’ ही जनतेसाठीच आहे आणि ते मतदारांनाही पटल्यानेच त्यांनी भाजपवर विश्वास दाखवला, असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

Advertisement
Tags :

.