For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू

06:40 AM Jul 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू
Advertisement

माउली भगवंतांचे मनोगत सांगताना म्हणतात, ज्ञानी भक्त होण्यासाठी अत्यंत खडतर वाटचाल करावी लागते. इथपर्यंत येण्यासाठी विषयाच्या दाट झाडीत लपलेल्या काम, क्रोध इत्यादि संकटांचा सामना करून भक्त त्यांच्यावर मात करतो. स्वार्थी वासनांना मागे टाकून सद्वासनेचा पहाड चढायला सुरवात करतो. मनात जरी सद्वासना उदय पावलेली असली तरी त्यानुसार कृती करण्यासाठी तो साधूंची संगत करतो. त्यांच्या संगतीने त्यांचे गुण त्याच्याही अंगी येऊ लागतात. त्या सद्गुणांच्या आधारे तो दुराचरणाच्या आडमार्गाकडे पाठ फिरवतो आणि त्यांच्यावर सरळवाट धरतो. हे सर्व सांगणारा

Advertisement

अनेक जन्म घेऊनि पावला शरणागति। विश्व देखे वासुदेव संत तो बहु दुर्लभ ।। 19 ।।

हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. माउली पुढे म्हणतात, जो साधक मोठ्या निर्धाराने ज्ञानी होण्यासाठी शेकडो जन्म अपेक्षेच्या वाहणा पायात न घालता भक्तीची वाट चालत असतो त्याला कर्मफळाचे काय कौतुक? त्याला ते कागदाच्या चिटोऱ्यासारखे वाटते आणि तो त्याकडे दुर्लक्ष करतो. याप्रमाणे फळाकडे दुर्लक्ष करत राहिल्याने त्याला शरीराने कर्म करताना केलेले कष्ट जाणवत नाहीत कारण ते शरीर तो आता आपले मानतच नसतो. आपण म्हणजे हे शरीर हे अज्ञान नष्ट झाल्याने तो निरपेक्षतेने कर्म करत असतो. त्यामुळे त्याच्या कर्मातून पापपुण्य तयार होत नसल्याने, त्याच्या जीवनात ज्ञानोदयाची पहाट होते. आता त्याला आत्मज्ञान होण्याची पात्रता आलेली आहे हे जाणून सद्गुरु त्याच्यावर कृपा करतात. त्यामुळे त्याच्या जीवनात गुरुकृपेची सकाळ उजाडते. त्याच्या ज्ञानावरील अज्ञानाचे पांघरूण दूर होते आणि समदृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते. त्या वेळी तो जिकडे पाहतो, तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही. जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू अशी त्याची अवस्था होते. तो जरी स्वस्थ बसला, तरी त्याला मीच दिसतो. फार काय सांगावे? त्याला सर्व ठिकाणी माझ्यावांचून दुसरे कांही दिसतच नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाच्या आंत व बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्यात व मी त्याच्यात असल्यासारखा असतो. त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते आणि तो जिकडे जिकडे संचार करितो, तिकडे तिकडे त्याला आपणच आहोत असे भासते.

Advertisement

माउलींच्या हे विश्वची माझे घर । ऐशी मति जयाची स्थिर । किंबहुना चराचर ।

आपणची जाहला ।

ह्या त्यांच्याच पसायदानातील सुप्रसिद्ध ओवीची तो अनुभूती घेत असतो. या सर्व विश्वात वासुदेव भरला आहे असा याचा पूर्ण अनुभव तो घेत असल्याने भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय. धनुर्धरा, ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व साठविले आहे, असा हा महात्मा फार दुर्लभ आहे. ज्ञानी भक्ताबद्दल अत्यंत प्रेमाने सविस्तर सांगितल्यानंतर पुढील श्लोकात भगवंत अन्य भक्तांबद्दल सांगत आहेत. ते म्हणतात, अर्जुना, ज्ञानी भक्त सोडून इतरही पुष्कळजण मला भजत असतात पण त्यांची भक्ती फक्त प्रापंचिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी असते. त्या त्यांना माझ्याकडून मिळतील अशी खात्री नसल्याने ते त्यासाठी अन्य दैवते शोधतात.

क्रमश:

विश्वनाथ छत्रे

Advertisement
Tags :

.