वाहने चालवायची कुठे? पार्क करायची कुठे?
वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पणजीत असह्या कोंडी : सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहतुकीचे वाजले तीनतेरा
पणजी : राजधानीत काल सोमवारी सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. शहरातील जवळजवळ सगळ्याच रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा सुरू होता. पणजी मुख्य बसस्थानक ते मनपा बाजारपर्यंत पोहोचायला तब्बल एक तासाहून अधिक काळ लागत होता. वाहतूक सुरळीत करायला वाहतूक पोलिस नव्हते. प्रत्येकाला कामावर, व्यवसायच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची घाई असल्याने मिळेल त्या जागेतून वाहने काढण्याचा प्रयत्न होत असल्याने छोटे अपघातही झाले. त्यातून भांडणेही झाली. रस्त्यावरच वाहने उभी करून चालकांमध्ये वाद होत होते. व्यवस्था नावाची कोणतीच गोष्ट दिसत नव्हती. हा प्रकार सकाळपासून, दुपार, सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.
पणजीत स्मार्ट सिटीचे काम जोरात सुरू असल्याने शनिवारपासून राजधानीतील सहा रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. मात्र पर्यायी रस्त्यांची व्यवस्था किंवा वाहतूक दुसरीकडे वळविल्याची सूचना देणारे फलकही लावलेले नाहीत. परिणामी सोमवारी दिवसभर वाहनचालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. शनिवारी व रविवारी सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने वाहतूक कोंडीची ही समस्या जाणवली नव्हती. मात्र काल सोमवार कामकाजाचा दिवस असल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले. तसेच पणजीत सध्या लोकोत्सव सुरू असून त्यासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
वाहतूक पोलिस कुठे गायब?
स्मार्ट सिटीच्या कामांसाठी काही रस्ते बंद केले असले तरी पर्यायी मार्ग कोणता ते दाखविण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पणजीत ठिकठिकाणी वाहतूक पोलिस नेमणे गरजेचे आहे. मात्र तसे चित्र दिसत नाही. वाहतूक पोलिस केवळ दंड देण्यातच व्यस्त आहेत की काय असा संतप्त प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात आला.
याकडे लक्ष द्यायचे कोणी?
काही ठिकाणी रस्त्याचे खोदकाम पार्किंगच्या जागीच सुरु आहे. त्यामुळे तेथे वाहने ठेवण्यास मिळत नाही. मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे जे रस्ते वाहतुकीस खुले आहेत त्या रस्त्यावरही वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. वाहने चालवायची कुठे? पार्क करायची कुठे? या सगळ्या गोष्टींकडे कोणी लक्ष द्यायचे, असा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला.
पोलिस कोणाचे सेवक? बड्या धेंडांचे की जनतेचे?
एखाद्या रस्त्यावरुन मंत्री, मुख्यमंत्री, पोलिस अधिकारी जाणार असतील तर वाहतूक सुरळीत ठेवण्यसाठी वाहतूक पोलिसांबरोबर अन्य पोलिसही तैनात असतात, मात्र अशा वाहतूक कोंडीच्यावेळी हे पोलिस का दुर्लक्ष करतात? याबाबत लोकांनी संताप व्यक्त केला. बड्या धेंडांसाठी पोलिस त्यांचे कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांसारखे कार्य करतात मात्र सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, असा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
या बंद रस्त्यांमुळेही होतेय वाहतूक कोंडी
महात्मा गांधी रस्त्यावरील डॉन बॉस्को ते युको बँकपर्यंत 354 मीटर लांबीचा टप्पा बंद करण्यात आला आहे. लिबर्टी शोऊम ते विनंती रेस्टॉरंट हा रस्ता बंद आहे. टी. बी. कुन्हा रस्त्यावरील कॅफे भोसले ते दयानंद बांदोडकर मार्ग जंक्शनपर्यंत 230 मीटरच्या टप्प्यात मलनिस्सारण वाहिनी घालण्यासह इतर कामे सुऊ असल्याने हा रस्ता बंद आहे. 18 जून रस्त्यावरील एनजीपीडीए ते काकुलो आयलंड दरम्यानचा 140 मीटर लांबीचा रस्ता बंद आहे. कुन्हा रिव्हेरा रस्त्यावरील विनंती रेस्टॉरंट ते दयानंद बांदोडकर रस्ता जंक्शन हा 40 मीटरचा रस्ता बंद आहे. हे रस्ते वाहतुकीस बंद असल्याने वाहन चालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिस असणे जऊरीचे असतानाही राजधानीत एकही वाहतूक पोलिस दिसत नाही.