For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदाचा मान्सून कुठे हरवला? ये रे ये रे पावसा, तुला देतो ...

06:25 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
यंदाचा मान्सून कुठे हरवला  ये रे ये रे पावसा  तुला देतो
Advertisement

मे महिन्याचा शेवट जसजसा जवळ येतो, तसतशी सर्वांनाच उत्सुकता लागते ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची. मान्सून... म्हणजे मोसमी वारे किंवा हवामानाची एक सुखावणारी स्थिती. अशा या मान्सूनची प्रत्येकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आग ओकणाऱ्या सूर्यामुळं दाह क्षणोक्षणी वाढत असतानाच मान्सूनची चिन्हंसुद्धा सुखावह ठरतात, अशातच त्याच्या येण्याची साक्ष मिळणं म्हणजे एक वेगळीच अनुभती असते. मान्सून कधी येणार?  इथपासून मान्सून कुठे आला आणि मान्सून अमुक ठिकाणी पोहोचला, तमूक ठिकाणहून पुढे सरकला या सर्व चर्चांमध्ये मान्सून हा शब्द वारंवार कानांवर येतो.

Advertisement

भारतातील लोक उन्हाळी मान्सूनची आतुरतेने वाट पाहतात, कारण हा मान्सून सोबत पाऊस घेऊन येतो आणि उष्णतेपासून लोकांना दिलासा देतो. भारतीय हवामान विभागाने प्रशांत महासागरात एल निनो परिस्थिती विकसित झाल्याचे स्पष्ट केले आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सूनचे ढग गायब झाल्याने देशातील मोठ्या भूभागावर पावसाची मोठी घट पाहायला मिळत आहे. रोज सातत्याने हवामानात बदल पाहायला मिळत असल्याने पावसाबाबत दिवसेंदिवस चिंता व्यक्त होत आहे. जूनचा अर्धा महिना सरला तरी हवा तशा पावसाची दमदार सुरवात झालेली नाही, यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

सर्वात मोठी चिंता केवळ विलंबाची नाही, तर संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाची आहे. यामुळे शेतकऱ्यांपासून ते शहरी रहिवाशांपर्यंत सर्वांची चिंता वाढली आहे. भारतात, मान्सून केवळ हवामानाशीच नव्हे, तर कृषी, महागाई, वीज आणि संपूर्ण जलप्रणालीशी जोडलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतरही, नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेवर पोहोचला नाही. भारतीय हवामान विभागाने आता 23 जून दरम्यान मोसमी पाऊस सर्वत्र आपले आगमन करेल असे भाकीत केले आहे. दरम्यान, देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णता कायम आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, एल निनोमुळे हा मान्सून नेहमीपेक्षा कमकुवत असू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, संपूर्ण हंगामात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 92 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याचा परिणाम कृषी, महागाई आणि पाण्याच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. सध्या, संपूर्ण देश मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाच्या मते, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, परंतु अपेक्षित वेग अद्याप गाठला गेलेला नाही. भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील 72 तासांत परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, सागरी वाऱ्यांची दिशा आणि वातावरणातील आर्द्रतेची पातळी अद्याप पूर्णपणे अनुकूल नाही. यामुळेच मान्सूनच्या अधिकृत आगमनाला विलंब झाला आहे.

Advertisement

मान्सून हा मूळचा अरबी भाषेतील शब्द. अरबीतील ‘मौसिन’ या शब्दावरून मान्सूनची उत्पत्ती झालीय; जिथं, अरबी समुद्रात नौकांसह उतरलेल्या खलाशांनी ‘मॉवसिम’ या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. अरबी खलाशांनी समुद्रातील वाऱ्यांना त्यांनी ‘मान्सून’ म्हणण्यास सुरुवात केली. तिथं अरबी भाषिकांनी ‘मौसिन’ किंवा ‘मॉवसिम’ या शब्दांचा वापर केलेला असतानाच ब्रिटीशांनी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचंही सांगण्यात येतं. आशिया खंडात जून ते सप्टेंबर या काळात येणारा पाऊस म्हणजे मान्सून, असाही त्याचा आणखी एक अर्थ. मान्सूनची नेमकी सुरुवात कधीपासून झाली याविषयी अनेकांनी दावे केल्याचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की, मान्सून 5 कोटी वर्षांपूर्वी जन्मला आणि हा तोच काळ होता जेव्हा भारतीय उपखंड तिबेटन पठारांच्या दिशेनं पुढे सरकत होता. मान्सूनचं सध्याचं स्वरुप पाहता सर्वप्रथम तो 80 लाख वर्षांपूर्वी उदयास आल्याचं म्हटलं जातं. चीनमधील काही रोपं आणि जीवाश्मांच्या निरीक्षणाच्या बळावर काही तज्ञ मंडळी मान्सून ही संकल्पना दोन कोटी वर्षे जुनी असल्याचं सांगतात.

आज जगभरात हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर आणि उष्णतेच्या लाटा यामुळे मानवाचे जीवन विस्कळीत होत आहे. यामध्ये “एल निनो” ही नैसर्गिक हवामान प्रक्रिया विशेष चर्चेत आहे. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने एल निनो निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम भारतातील मान्सूनवर होतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पाऊस उशिरा येणे किंवा काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे एल निनोमुळे मान्सून कमकुवत झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पिकांचे उत्पादन घटते, पाण्याची टंचाई निर्माण होते आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता वाढते. याशिवाय पशुधन, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. हिमालयातील बर्फ जलद गतीने वितळत असून समुद्राची पातळी वाढत आहे. जंगलतोड, प्रदूषण आणि वाढती औद्योगिक वाढ यामुळे हवामान बदल अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षारोपण, पाण्याची बचत, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रा.डॉ.गिरीश नाईक

Advertisement
Tags :

.