For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पर्धा परीक्षांत कोकणचे टॅलेन्ट जाते कुठे?

06:54 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्पर्धा परीक्षांत कोकणचे टॅलेन्ट जाते कुठे
Advertisement

यावर्षी मे महिन्यामध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालात सलग 14 व्या वर्षीसुद्धा कोकण बोर्डाचा निकाल राज्यात अव्वल राहिला आहे. या निकालातून कोकणातील मुलांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सातत्य टिकवून ठेवले आहे. याबद्दल या मुलांचे कौतुकच आहे. परंतु, संपूर्ण राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असणारी ही मुले पुढे करतात काय? स्पर्धा परीक्षेमध्ये ही मुले का टिकत नाहीत? याची मात्र खंत आहे. म्हणूनच या मुलांचे टॅलेन्ट जाते कुठे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कोकणमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रे सुरू करून टॅलेन्ट सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Advertisement

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी व दहावी परीक्षेचा निकाल मे महिन्यामध्ये जाहीर झाला आहे. कोकणातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दहावी व बारावी परीक्षेत कोकणचाच झेंडा डौलाने फडकवला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखली आहे. कोकण बोर्डाने सलग 14 व्या वर्षी राज्याच्या निकालात बाजी मारतानाच त्यामध्ये मुलींचा निकाल हा सुद्धा राज्यात अव्वल राहिला आहे. त्यामुळे राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत गौरवास्पद कामगिरी राखणाऱ्या कोकणातील सर्व विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालक वर्गाचे कौतुक आहे.

शिक्षणामध्ये सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी आजकाल फार मोठी चढाओढ लागलेली असते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही आपल्या मुलाला सर्वाधिक गुण मिळविण्यासाठी धडपडत असतात आणि त्यासाठी वेगवेगळे अभ्यासवर्ग लावलेले असतात. मात्र ग्रामीण भागात अभ्यासवर्ग किंवा इतर सुविधांचा अभाव असतो किंवा सुविधा असून सुद्धा परिस्थितीमुळे क्लासेस लावता येत नाहीत. असे असून सुद्धा शिकण्याची जिद्ध आणि चिकाटीच्या जोरावर व परिस्थितीवर मात करीत ग्रामीण भागातील मुलांनीही गुणवत्ता सिद्ध करीत दहावी, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

Advertisement

कोकण बोर्ड स्थापन होण्यापूर्वी पुणे व कोल्हापूर बोर्डाला रत्नागिरी जिल्हा जोडलेला होता. परंतु स्वतंत्रपणे कोकण बोर्ड स्थापन झाला नव्हता. त्यामुळे स्वतंत्र कोकण बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी होऊ लागली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही मागणी मंजूर केली. त्यानंतर स्वतंत्रपणे कोकण परीक्षा बोर्ड स्थापन झाले आणि 2012 पासून कोकण बोर्डामार्फत परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. कोकण बोर्डामार्फत परीक्षा सुरू झाल्यावर पहिल्याच वर्षी कोकण बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षेत आघाडी घेत गुणवत्तेत अव्वल स्थान पटकावले आणि त्या वर्षापासून आजपर्यंत सलग 14 वर्षे दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात अव्वल स्थान राखण्यात यश मिळविले आहे.

यावर्षी बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 96.74 टक्के लागला. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 98.74 टक्के, रत्नागिरी जिल्ह्याचा 95.67 टक्के निकाल लागला. दहावीच्या परीक्षा निकालात राज्याचा 94.10 टक्के निकाल लागला असून त्यात कोकण विभागाचा 98.82 टक्के निकाल लागला आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक 99.32 टक्के व रत्नागिरी जिल्ह्याचा 98.58 टक्के निकाल लागला आहे.

मुळातच कोकण हा प्रदेश हुषार व्यक्तींचा मानला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोकणातील लोक चमकलेले आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेतूनही ते सातत्याने दिसून येत आहे. सलग 14 वर्षे दहावी व बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची परंपरा कायम राखणे तसे सोपे नाही. त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेली मेहनत फार महत्त्वाची आहे. म्हणूनच 14 व्या वर्षीही राज्यात शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. साहित्यिक आणि इतर विविध क्षेत्रात चमकणारे लोक कोकणातीलच आहेत. दोन्ही जिल्हे ग्रामीण भागात मोडणारे असले, तरी कोकणातील शाळा पाहिल्या तर अतिशय सुसज्ज, चांगल्या सुविधा असणाऱ्या आहेत. शिक्षकही दर्जेदार शिक्षण देत आहेत. प्राथमिक शाळांमधून शिक्षणाचा पाया भक्कम केला जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षेत विद्यार्थी यश मिळवत आहेत.

दहावी-बारावीनंतर हीच मुले कुठे जातात, हा प्रश्न पडतो. स्पर्धा परीक्षांमधून दिसत नाहीत. मग कोकणचं टॅलेन्ट जातंय कुठे, हा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये ही मुले न टिकण्यासाठी पायाभूत सुविधा कोकणमध्ये आवश्यक आहेत. या सुविधा नसल्याचेच प्रमुख कारण आहे.

2023 मध्ये युपीएससी परीक्षेमध्ये तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवले होते. हे यश कोकणच्या दृष्टीने आशादायी असले, तरी त्यामध्ये सातत्य दिसून आलेले नाही. हे प्रमाण सुद्धा फारच अत्यल्प आहे. युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेमध्ये कोकणातील मुले जास्तीत जास्त पुढे येणे आवश्यक आहे. तरंच खऱ्या अर्थाने दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केलेल्या मुलांचे नाणे स्पर्धा परीक्षेमध्येसुद्धा खणखणीत वाजू शकते.

दहावी-बारावीचा निकाल पाहता कोकणातील मुलांमधून ठासून गुणवत्ता भरलेली आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेतून ते सिद्ध करीत असतात. हीच चिकाटी किंवा मेहनत स्पर्धा परीक्षांमधून दिसून येत नाही. केवळ युपीएससी किंवा एमपीएससी परीक्षाच नाही, तर तलाठी किंवा पोलीस भरतीमध्ये सुद्धा कोकणातील मुले मागे पडताना दिसतात. शैक्षणिक गुणवत्तेत कोकणातील मुले सरस आहेत, असे असूनही स्पर्धा परीक्षांमधून पुढे येत असल्याने मुंबई-पुणेसारख्या शहरांमधील खासगी कंपन्यांमध्ये छोट्या-मोठ्या पगारावर काम करताना दिसतात. कोकणात रोजगाराचे मोठे साधन नसल्याने किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने कोकणातील अनेक मुले मुंबई, पुणे, गोवा यासारख्या शहरांच्या ठिकाणी कुच करतात. खरं तर कोकण प्रदेश हा समृद्ध कोकण असं म्हटलं जात असलं, तरी या ठिकाणी रोजगाराची साधने फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळेच शैक्षणिक गुणवत्तेत सरस ठरणारी मुले स्पर्धा परीक्षांना सामोरे न जाता रोजगाराच्या पाठी लागतात आणि मिळेल त्या कामासाठी शहरात जातात.

कोकणात रोजगार निर्माण न करणे हे खरे तर लोकप्रतिनिधींचे मोठे अपयश आहे. रोजगार द्यायला जमत नसेल तर किमानपक्षी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कोकणात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रे सुरू केली पाहिजेत व त्यासाठी त्या केंद्रांवर दर्जेदार प्रशिक्षक आणले पाहिजेत. तरंच शैक्षणिक गुणवत्तेत पात्र ठरणारी कोकणातील मुले स्पर्धा परीक्षांतही वरचढ ठरतील आणि शिक्षणात पुढे असणाऱ्या मुलांचे टॅलेन्ट जाते कुठे, याचं खरं उत्तर मिळू शकेल.

संदीप गावडे

Advertisement
Tags :

.