Watermelon History |तुम्ही खात असलेलं लाल, रसाळ कलिंगड भारतीय नाहीच! मग ते भारताता नेमकं कुठून आलं?
उन्हाळा सुरु झाला की, सर्वांच्या नजरा शोधु लागतात ते म्हणजे कलिगंडसाठी.... लाल लाल, चवीला गोड -रसाळ लहांगा असो किंवा मोठे सगळ्यांचे फेवरेट असते ते म्हणजे कलिंगड...उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पाण्याची कमतरता भरून काढणारे कलिंगड आज आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनले आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, आज आपण जे गोड आणि रसाळ कलिंगड खातो, ते मूळचं भारतातले नाही,वाचुन धक्का बसला ना, होय जे रसरसीत कलिंगड आपण खातो ते भारतीय फळ नाहीये. या कलिंगडचा इतिहास तब्बल ५,००० वर्षे जुना आहे... ... चला तर मग जाणुन घेऊया कलिंगड भारतात कुठून , कधी आलं, त्याचा ५,००० वर्षे जुना इतिहासया लेखामध्ये...
कलिंगडचा इतिहास
इतिहासकार आणि वनस्पतिशास्त्रज्ञांच्या मते, कलिंगडाचे मूळ दक्षिण आफ्रिकेतील कलहारी वाळवंट किंवा ईशान्य आफ्रिका (सुदान-इजिप्त परिसर)मानले जाते. ५,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत आढळणारी कलिंगडे आजच्यासारखी गोड आणि लाल नसायची. ती आकाराने लहान, चवीला कडू आणि आतून पांढऱ्या रंगाची असायची. वाळवंटातून प्रवास करणारे प्रवासी पाण्याचा साठा म्हणून या फळाचा वापर करायचे.
इजिप्तमध्ये लागवड आणि गोडवा
प्राचीन इजिप्तमधील थडग्यांमध्ये कलिंगडाच्या बिया आणि भिंतींवर त्याची चित्रे सापडली आहेत. इजिप्शियन लोकांनी या फळावर विविध प्रक्रिया करून आणि निवडक लागवड करून त्याला हळूहळू गोड आणि रसाळ बनवले. राजा तुतानखामेनच्या थडग्यातही कलिंगडाच्या बिया सापडल्या होत्या; जेणेकरून परलोकाच्या प्रवासात त्याला तहान लागल्यास हे फळ उपयोगी पडावे, असा त्यांचा विश्वास होता.
भारतात कलिंगड कधी आणि कसं आलं?
भारतात कलिंगड येण्याचा प्रवास प्रामुख्याने व्यापार आणि प्रवाशांशी जोडलेला आहे. इतिहासकारांच्या मते, कलिंगड भारतात येण्याचे दोन मुख्य टप्पे सांगितले जातात काही संशोधकांच्या मते, अगदी सुरुवातीच्या काळातच आफ्रिकेतील व्यापारी आणि समुद्रप्रवाशांमार्फत कलिंगडाच्या बिया भारतीय उपखंडात पोहोचल्या होत्या.
कलिंगड भारतात नक्की कधी स्थिवायला झाले, याचे ठोस पुरावे इसवी सन ७ व्या शतकाच्या आसपास मिळतात. आफ्रिकेतून हे फळ आधी अरब देशांमध्ये गेले. त्यानंतर प्रसिद्ध 'रेशीम मार्ग' आणि सागरी व्यापारी मार्गांद्वारे ते भारतात आले. ९ व्या शतकापर्यंत भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती.
भारतातूनच पुढे १० व्या ते १२ व्या शतकाच्या दरम्यान कलिंगड चीनमध्ये पोहोचले. आज चीन हा जगातील सर्वाधिक कलिंगड उत्पादन करणारा देश आहे.
'कलिंगड' आणि 'टरबूज' नावाचा इतिहास
भारतात या फळाला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात याला आपण कलिंगड किंवा टरबूज म्हणतो.हिंदीत याला'तरबूज' म्हणतात, जो फारसी भाषेतील 'तर्बुज' या शब्दावरून आला असावा. मराठीत 'कलिंगड' हे नाव भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील प्राचीन 'कलिंग' (सध्याचा ओडिशाचा प्रदेश) प्रांतावरून पडले असण्याची शक्यता इतिहासकार वर्तवतात, कारण या मार्गानेही फळांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे.
आज जगभरात कलिंगडाच्या १,२०0 हून अधिक जाती आढळतात. आफ्रिकेच्या वाळवंटातील एक कडू फळ आज जगभराचा 'नॅचरल कुलर' बनलं आहे, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.