विश्वास पाटील, डोंगळे कुठे आहेत? शोधावे लागेल; आमदार सतेज पाटील यांचा टोला, महायुतीमध्ये 'कॉलर धरण्यापासून शड्डू मारण्यापर्यंतचा सुसंवाद' असल्याची टीका
कोल्हापूर: गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे पूर्वी गोकुळच्या पॅनेलमध्ये माझ्या आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शेजारी असायचे. आता ते कुठे आहेत, हे शोधावे लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. ज्येष्ठ नेत्यांचा महायुतीमध्ये किती मान-सन्मान राखला जातो, हे यावरून दिसते, असेही ते म्हणाले. आमदार सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलत होते. गोकुळ निवडणुकीतील टोकन आणि खर्चाची चर्चा महायुतीकडूनच होत असून, आमच्या पॅनलकडून कोणताही अनाठायी खर्च केला जात नसल्याचा दावाही त्यांनी केला. दूध उत्पादक स्वतःच्या हक्काच्या वाहनातून मतदानासाठी येतात.
त्यामुळे पैशांचा हा प्रकार आमच्याकडून होत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. महायुतीतील अंतर्गत वादावर पाटील यांनी टीका केली.
सहा महिन्यांपासून महायुतीतील वादावादी आणि राडा पाहत आहे. एकमेकांची कॉलर धरण्यापर्यंत आणि मनपा चौकात शड्डू
मारण्यापर्यंत त्यांचा 'सुसंवाद' पोहोचला आहे, असा टोला त्यांनी लगावला. जि. प. निधी वाटप ते घटक पक्षांतील परस्पर समन्वयापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करत महायुतीच्या एकजुटीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विशेष अधिवेशन घेण्याची मागणी
दुष्काळाच्या मुद्यावर पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली, २०१७ च्या निकषांनुसार ट्रिगर-१ जून-जुलैच्या पावसावरच जाहीर व्हायला हवा होता, आता विलंब झाला असून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली.