पाडलोस केणीवाड्यातील कोरड्या नळाला पाणी कधी येणार?
समीर नाईक : अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटही बंदावस्थेत
न्हावेली / वार्ताहर
पाडलोस केणीवाडा येथील अनेक वर्षे रखडलेल्या नळ पाणी योजनेला सुरळीत होण्यासाठी मुहूर्त मिळेना. नळ ग्रामस्थांच्या दारात आले परंतु अद्यापही पाणी आले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे नळ पाणी योजनेच्या मीटरचे विद्युत बिलही आले मात्र ग्रामस्थांच्या घसा कोरडाच राहिला. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव त्यानंतर दिवाळीही सुरू झाली असून नेमके पाणी कधी मिळणार असा सवाल युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी केला आहे.
पाडलोस केणीवाडा येथे गेली अनेक वर्षे नळ पाणी योजनेचे काम रखडले आहे. यादरम्यान दोन आमदारकी व एक खासदारकीची तसेच ग्रामपंचायत निवडणुकाही झाल्या मात्र नळाला काही पाणी येण्याचा मुहूर्त सापडेना. ग्रामस्थांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे पाण्याची गरज ओळखून ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी समीर नाईक यांनी केली.भात बियाण्याचे रक्कम कधी मिळणार पाडलोस ग्रामपंचायततर्फे सर्व शेतकऱ्यांना भात बियाण्यांची बिले जमा करण्यास प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार गावातील शेतकऱ्यांनी लागणारी कागदपत्रे व बिल जमा केले. मुख्य बाब म्हणजे बियाणे पेरून भात कापणी सुद्धा झाली तरीही भात बियाण्याची रक्कम मिळत नसल्याने युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.