कधी संपणार जग?
अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएकडून 50 वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत गोपनीय ठेवण्यात आलेल्या एका पुस्तकात जगाच्या अंताची एक चकित करणारी थेअरी आहे. द अॅडम अँड ईव्ह स्टोरी नावाचे हे पुस्तक 1966 मध्ये अमेरिकन वायुदलाचे माजी कर्मचारी, युएफओ शोधकर्ते आणि स्वयंघोषित सायोकि चॅन थॉमस यांनी लिहिले होते. हे पुस्तक आता सार्वजनिक झाले आहे. हे पुस्तक 2013 मध्ये आंशिक स्वरुपात डीक्लासिफाय करण्यात आले होते. परंतु याला सीआयएच्या डाटाबेसमध्येच लपविण्यात आले होते. अलिकडेच हे पुन्हा समोर आणले गेले आहे.
6500 वर्षांनी महाविध्वंसक आपत्ती
चॅन थॉमस यांच्यानुसार दर 6500 वर्षांनी एक महाप्रलय पृथ्वीवर घडत असतो. 6500 वर्षांपूर्वी ही आपत्ती नोआहचा पूर होती आणि यासाठी काही पुरातात्विक आणि भूवैज्ञानिक पुरावे देखील आहेत. पुढील महाप्रलय कुठल्याही क्षणी येऊ शकतो असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
महाविनाशाचे स्वरुप
थॉमस यांच्यानुसार पृथ्वीचे चुंबकीय स्वरुप अचानक आणि तीव्रतेने बदलेल, यामुळे पूर्ण जगात विध्वंस घडेल. कॅलिफोर्नियाचे पर्वत पानांप्रमाणे हलू लागतील आणि प्रशांत महासागर एक विशाल लाट होत पूर्वेच्या दिशेने सरकणार आहे. काही तासातच लॉस एंजिलिस, सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, डलास आणि न्यूयॉर्क सारखी शहरे इतिहासजमा होतील असे थॉमस यांनी म्हटले आहे.
3 तासांत पूर्ण नष्ट होणार अमेरिका
ही आपत्ती केवळ तीन तासात पूर्ण उत्तर अमेरिकेला नष्ट करेल आणि अशाचप्रकारे जगाचे उर्वरित हिस्सेही वाचू शकणार नाहीत. 7 दिवसांपर्यंत हा विध्वंस सुरू राहिल, ज्यानंतर पृथ्वीचा पूर्ण भूगोल बदलणार असल्याचे थॉमस यांच्या पुस्तकात म्हटले गेले आहे.
पुस्तकाच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह
सीआयएने या पुस्तकाला गोपनीय का ठेवले हे स्पष्ट नाही. परंतु या पुस्तकामुळे जनतेत भय निर्माण होण्याची भीती असल्याने हे पाऊल उचलले गेले असावे असे तज्ञांचे मानणे आहे. चॅन थॉमस यांचा संबंध मॅडॉनेल डगलस एअरोस्पेस कंपनीशी होता. जेथे त्यांनी गोपनीय प्रकल्पांवर काम केले होते. परंतु सीआयएशी प्रत्यक्ष संबंधांचा कुठलाही अधिकृत रिकॉर्ड नाही.
थेअरी वैज्ञानिक स्वरुपात योग्य की अयोग्य
नासा आणि अन्य वैज्ञानिक संस्थांनुसार पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ‘पोल रिव्हर्सल’ प्रक्रियेला सामोरे जाते. ही प्रक्रिया दर 3 लाख वर्षांनी होत असते. या प्रक्रियेत चुंबकीय क्षेत्र कमकुवत होऊ शकते, परंतु हे थॉमस यांच्या वर्णनानुसार विध्वंसक प्रभाव निर्माण करू शकत नाही. चुंबकीय क्षेत्र 90 डिग्रीत बदलणे अशक्य आहे. जर असे दर 6500 वर्षांनी होत असते, तर याचा पुरावा भूवैज्ञानिक नोंदीत अवश्य असता, असा दावा नासाचे वैज्ञानिक मार्टिन म्लिन्जक यांनी केला आहे.