जातनिहाय सर्वेक्षणातील तांत्रिक दोष केव्हा दूर होणार?
सर्व्हरडाऊनचा मनस्ताप शिक्षकांसोबत सर्वेक्षण करणाऱ्या कुटुंबालाही
बेळगाव : जातनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात झाली खरी. परंतु तांत्रिक अडथळे मात्र अद्याप दूर झालेले नाहीत. एका कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी तब्बल तास ते दीड तास कालावधी लागत आहे. तर ‘डेटा नॉट फाऊंड’, तसेच सर्व्हरडाऊनचा मनस्ताप शिक्षकांसोबत सर्वेक्षण करणाऱ्या कुटुंबालाही होत आहे. त्यामुळे हे तांत्रिक दोष नेमके केव्हा दूर होणार? हा प्रश्न सतावत आहे. सोमवारपासून राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मागासवर्गीय कुटुंबांची संख्या उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणाची जबाबदारी शाळा शिक्षकांवर देण्यात आली आहे. यासाठी एक पोर्टल देण्यात आले असून त्यामध्ये कुटुंबांची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती भरावयाची आहे.
पहिल्या दिवसापासूनच सर्वेक्षणामध्ये तांत्रिक दोष आढळले आहेत. गल्लीतील सलग घरांऐवजी काही मोजक्याच घरांचा समावेश पोर्टलमध्ये आहे. तर उर्वरित घरांसाठी इतर शिक्षकाला यावे लागत आहे. कुटुंबाची माहिती घेत असतानाच मधेच ‘डेटा नॉट फाऊंड’ असा मेसेज येत असून त्यानंतर सर्वेक्षण थांबले जात आहे. काहीवेळा सर्व्हरच नसल्याचा मेसेज येत आहे. या तांत्रिक दोषांमुळे सर्वेक्षण करायचे कसे? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. एका विभागातील शिक्षकाला शहराच्या दुसऱ्या भागात जनगणना देण्यात आली आहे. त्या शिक्षकाला संबंधित भागाची कोणतीही माहिती नसल्याने गणतीमध्ये अडचणी येत आहेत. याऐवजी त्याच विभागातील शिक्षकांवर जर सर्वेक्षणाची जबाबदारी दिली असती तर सर्वेक्षण करणे अधिक सुलभ झाले असते. त्यामुळे कुटुंब शोधून त्यांची जनगणना करण्यासाठी दीड ते दोन तास कालावधी निघून जात आहे.